सीकेटी कॉलेजचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉ. विजय नारखेडे यांची लाभली प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)मध्ये पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.15) करण्यात आले होते. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण विभागाचे कोकण विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे उपस्थित होते.
या सोहळ्यास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ.एस.टी. गडदे, भागुबाई चांगू काना ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सानवी देशमुख, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, अ‍ॅड. विनायक कोळी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. पाटील, विविध विद्याशाखांचे व विभागांचे प्रमुख मंचावर उपस्थित होते. एनसीसीच्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रमुख पाहुणे डॉ. विजय नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून घेणे हे त्यांच्यासाठी भाग्यवंताचे लक्षण आहे. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाबरोबर विज्ञान आणि कौशल्याची कास धरून प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे सांगून भाषणात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी सांगितलेल्या एका वाक्यावर भर देत उपजिवेकेसाठी शिक्षण घेऊन थांबू नका; तर साहित्य, खेळ, संगीत या क्षेत्रांमध्येसुद्धा आवड निर्माण करा, असे आवाहन केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षणाचा वापर आपल्यासह समाजासाठी कसा होईल याचा विचार करीत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा, असे सूचित केले तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य एस.के. पाटील यांनी महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. या सोहळ्यात पदवी तसेच विद्यावाचस्पतीप्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परीक्षा नियंत्रक डॉ.एस.आय. उन्हाळे, विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्ष डॉ.एम.ए. म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.आर.व्ही. येवले, प्रा.ए.व्ही. पाटील व डॉ. गीतिका तंवर यांनी केले; तर डॉ. उन्हाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply