Breaking News

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेली इंडिया आघाडी यांच्यात असला तरी खरी लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधक अशीच आहे. चारशे पार बहुमतासह पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधण्याचा निर्धार मोदी व भाजपने केला आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी कसोटी मानली जात आहे.
सन 2014मध्ये काँग्रेस आघाडीचे (यूपीए) सरकार उलथवून केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आणि 2019मध्ये दुसर्‍यांदा सत्ता स्थापन केली. या दहा वर्षांच्या काळात सरकारने विविध योजना तसेच नोटाबंदी, कलम 370 रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांसारखे धाडसी निर्णय घेतले. आता सलग तिसर्‍या वेळी हे सरकार पूर्ण ताकद व अनुभवानिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. वाजपेयी-अडवाणी यांच्या काळात अवघ्या दोन खासदारांपासून सुरू झालेला भाजपचा हा प्रवास पंतप्रधान मोदींनी तीनशेच्या पुढे (303) नेला तो आपल्या वेगळ्या अशा कार्यपद्धतीने, किंबहुना भारतीय राजकारणाचा बाज त्यांनी बदलून टाकला. मेहनत आणि शिस्त भाजपमध्ये आधीपासून होती. त्यास कार्यकुशलता आणि मुत्सद्देगिरीची जोड देत यशात सातत्य कसे टिकवायचे हे पंतप्रधान मोदींनी पक्षाला शिकवले. आज सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष म्हणून भाजप हा केवळ देशातच नव्हे; तर जगात अव्वल क्रमांकावर आहे.
यंदा विरोधकांनी आपल्या संयुक्त पुरोगामी आघाडीला इंडिया आघाडी असे नवे नाव देऊन मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये विविध पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला, पण या आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात पक्षाचे सर्व उमेदवार जाहीर करून ’एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे, तर आघाडीतील आम आदमी पक्षानेही स्वबळाचा सूर आळवला आहे. आता उर्वरित पक्ष एकत्र राहणार की जागावाटपावरून आणखी कुणी वेगळी चूल मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
काँग्रेससाठी तर या वेळची निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. एकेकाळी संपूर्ण देशावर अधिराज्य गाजवणारा हा पक्ष आता आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी अक्षरशः झगडताना दिसतो. काँग्रेसने ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष करून घराण्याबाहेरील व्यक्तीला हे महत्त्वाचे पद दिले असले तरी आजही पक्षावर कमांड गांधी परिवाराचीच आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे पक्षाच्या वतीने प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळत आहेत, मात्र त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. त्यांनी दोन पदयात्रा करून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेली कर्नाटक विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली. त्यामुळे राहुल गांधींसह काँग्रेसला हुरूप आला. खरंतर कर्नाटकमध्ये स्थानिक पातळीवर भाजपची रणनीती आणि उमेदवार निवड चुकली होती, जे त्यांनी निकालाअंती मान्य केले. यानंतर लोकसभेची सेमी फायनल म्हणून पहिल्या जाणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन प्रमुख राज्ये जिंकून जोरदार मुसंडी मारली आणि देशात आपलीच हवा कायम असल्याचे दाखवून दिले.
वास्तविक, दोन मोठ्या लोकसभा पराभवांनंतर पक्ष संघटना बळकट करून नियोजनबद्ध तयारीने वाटचाल करणे काँग्रेससाठी क्रमप्राप्त होते, पण त्याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. परिणामी हा पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होताना पहावयास मिळते. दुसरीकडे सर्वकाही आलबेल असूनदेखील भाजप पूर्ण तयारीनिशी व अधिक जोमाने मैदानात उतरला आहे. हाच या दोन प्रमुख पक्षांतील फरक आहे. जागावाटपातही भाजपने आघाडी घेत एकूण 543 जागांपैकी निम्म्याहून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. महायुतीतील भाजप आणि महाआघाडीतील काँग्रेस यांनी आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत, तर सहकारी पक्षांचे उमेदवार घोषित होणे अद्याप बाकी आहे. त्या दृष्टीने दोन्हीकडे चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आणखी एक भिडू सहभागी होण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास मनसेला पहिला खासदार मिळू शकतो, तर मनसेच्या समावेशामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाआघाडीला प्रामुख्याने शिवसेनेला शह देण्यास मदत होऊ शकते. महाआघाडीतही काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी सहभागी होऊ पाहत आहे. जागावाटपाच्या कळीच्या मुद्द्यावरून मात्र त्यांचे घोडे काही पुढे सरकत नाहीए.
निवडणूक जवळ येत असल्याने जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या आठवड्यात हे चित्र स्पष्ट होऊ शकते. प्रमुख पक्षांचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यावर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. त्यानंतर राजकीय ‘मत’संग्रामाला खर्‍या अर्थाने रंगत येणार आहे.
-समाधान पाटील, पनवेल

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply