Breaking News

पुलाच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना!, जिल्हा परिषद व स्थानिक लोकप्रतिनिधींची नेरळमध्ये उदासीनता

कर्जत ़: बातमीदार

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांना जोडणारा पूल मार्च 2018 मध्ये कोसळला आहे. त्या ठिकाणी नवीन पूल निर्मितीसाठी नेरळ विकास प्राधिकरणाने निधी दिला आहे, येथे नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल दोनवेळा भूमिपूजने करण्यात आली आहेत, मात्र अद्याप त्या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरण विरुद्ध आदिवासी लोक एकवटले असून त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मानवाधिकार संस्थेचे कार्यकर्ते गोरख शेप यांनी दिली.

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील नेरळ येथील  लहान पूल 24 मार्च 2018 रोजी कोसळला होता. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील सात आदिवासी वाड्या आणि मोहाचीवाडी भागातील रहिवासी यांचा घरी जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुलाची तात्काळ निर्मिती केली जाईल, असे जाहीर केले होते. पण पुलाच्या बांधकामाचा नारळ एका वर्षानंतर फोडण्यात आला होता. मात्र अजूनही नवीन पुलाच्या बांधकामाला सुरूवात झालेली नाही. 

या पुलाच्या निर्मितीसाठी आवाज उठविणारी मानवाधिकार संघटना आता अधिक आक्रमक झाली आहे. स्थानिक आदिवासी लोक आणि मोहाचीवाडी ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन लोकप्रतिनिधी यांना घेराव घालण्याचे मानवाधिकार संघटनेने ठरविले आहे. त्यासाठी आम्ही सर्वत्र  बैठका घेत आहोत, अशी माहिती गोरख शेप यांनी दिली आहे.

‘तो‘ पाहाणी दौरा स्टंट

या पुलाबाबत नेरळमधील जनतेने आपली नाराजी व्यक्त करीत सोशल मीडियावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रायगड जिल्हा परिषद यांची हुर्यो उडविण्यास सुरुवात केली आहे. ही बाब लक्षात येताच जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी या पुलाच्या कामाची पाहणी केली. मात्र तो पाहणी दौरादेखील एक स्टंट ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षांनी पाहणी दौरा करून महिना उलटायला आला तरी पुलाच्या कामासाठी खड्डेदेखील खोदले गेले नाहीत. ही बाब नेरळमधील आदिवासी समाजाच्या जिव्हारी लागली असून, आदिवासी समाजाचे नेते  वामन ठोंबरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी कोंबलवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात ही नाराजी व्यक्त करण्यात आली.

नेरळ येथील पुल कोसळलेला पुल पुन्हा बांधण्यासाठी  जिल्हा परिषद निधी जाहीर करते, मग कामे का होत नाहीत, हे न समजण्यासारखे आहे. जनतेला उल्लू बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांनी आमचा अधिक अंत पाहू नये.

-प्रवीण मोरगे, उपाध्यक्ष,

मानवाधिकार संघटना

या पुलाच्या निर्मितीसाठी प्राधिकरणमधून 40 लाखाचा निधी दिला आहे.  पुलाचे काम करण्यासाठी माती आणून टाकली आहे. लवकरच काम सुरू करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात येतील.

-प्रवीण आचरेकर, उप अभियंता,

नेरळ विकास प्राधिकरण

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply