महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याने या काळात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचे राज्य देशाच्या नकाशावर अस्तित्वात आले. हुतात्म्यांचे बलिदान विसरून महाराष्ट्र दिन चिरायू होऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी आजच्या दिवशी राज्याने गेल्या साठ वर्षांत जी प्रगती केली आहे. ती देशात अग्रेसर आहे, असे निश्चितच म्हटले पाहिजे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराच चव्हाण ते आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या मुख्यमंत्र्यांपर्यंतचा प्रवास राज्यात आतापर्यंत राहिला आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य सेवा, शेती, सहकार, सिंचन, दळण वळण, मूलभूत पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. कोयना, उजनी ही महाकाय धरणे, हरितक्रांती, मराठवाड्याचा दुष्काळ गोदावरीवर जायकवाडी धरण यापासून आजच्या कोरोना काळात उभ्या राहिलेल्या आरोग्य सोयीपर्यंत असे खूप काही सांगता येईल.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत, पण यंदा या उत्सवावर कोरोना संकटाचे सावट आहे. मागील काही वर्षांत महाराष्ट्राने अनेक संकटांशी दोन हात केले. भीषण दुष्काळ, चक्रीवादळे, महापूर, भूकंप अशी अनेक संकटे महाराष्ट्राने पाहिली. सध्या एका अदृश्य शत्रूशी महाराष्ट्र दोन हात करीत आहे. कोरोनाच्या पहिले लाटेचा सामाना महाराष्ट्राने धैर्याने केला. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेचे परिणाम गंभीर आहेत. हे आपण अनुभवत आहोत.
कोरोनामुळे 2020 मध्ये महाराष्ट्र दिन साजरा करता आला नाही. या वर्षीसुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साध्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करावा लागणार आहे. राज्यामध्ये कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन व कोरोना विषाणाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने 13 एप्रिलच्या आदेशान्वये 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेले आहेत. कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्व आस्थापना, शासकीय यंत्रणांना महाराष्ट्र दिन साजरा करण्याबाबत निर्देश दिलेल आहेत. या निर्देशांप्रमाणे महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे सूचविले आहे. असे असले तरी शासनाचे कार्य अहोरात्र सुरू आहे. पोलीस दल, महसूल, वैद्यकीय यंत्रणा यासह सर्व प्रशासकीय घटक कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कोरोना काळातही महाराष्ट्र थांबला नाही. गेल्या दीड वर्षात शासनाने विविध क्षेत्रात कार्य केले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी हॉस्पिटल, ऑक्सिजन, तपासणी प्रयोगशाळा आणि मोफत लसीकरणदेखील उपलब्ध करून दिले आहे. महसूल तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. राज्यातील रस्ते झाले. अन्नधान्य वितरणात विक्रम झाला. कौशल्य विकास आणि रोजगार उपलब्ध करण्यात महाराष्ट्र पुढे राहिला. औषधांच्या किमती आणि पुरवठा बाबतीत आरोग्य विभागाने पुढाकार घेतला, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि ‘मी जबाबदार’ ही मोहीम संपूर्ण राज्यात घेतली. त्यामुळेच अन्य राज्यांच्या तुलनेत याबद्दल अधिक जागरूता निर्माण झाली. कोकण विभागाचा विचार झाल्यास गेल्या 60 वर्षांत कोकणचा संपूर्ण कायापालट झाला. सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम उभे राहिले.
महाराष्ट्र दिन कामागार दिन म्हणूनही साजरा केला जातो. राज्यातील कामगारांसाठी शासनाने योजना राबविल्या आहेत.
कोरोनाच्या काळातील हेही दिवस निघून जातील आणि यावर मात करण्यात राज्य निश्चितच यशस्वी ठरेल. महाराष्ट्र दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा देत असताना शासनाच्या निर्णयांना सहकार्य करा आणि आरोग्य सांभाळा!, मात्र मानवतेचे निशाण मिरवून आरोग्यदायी महाराष्ट्र उभा करूया.
-प्रवीण डोंगरदिवे, माहिती सहाय्यक, कोकण विभागीय माहिती कार्यालय, नवी मुंबई