Breaking News

‘चोर मचाये शोर’ @50

गरीब नायक विजय (शशी कपूर) आणि श्रीमंत नायिका रेखा (मुमताज) यांच्या निस्सीम प्रेमाला प्रेयसीच्या खडूस पित्याचा तीव्र विरोध. (शशी कपूरच काय कोणताही कपूर गरीब वाटू शकेल काय? कपूर म्हणजे श्रीमंत खानदान हे घट्ट समीकरण. शशी कपूर तर ऐतबाज) अशा परिस्थितीत नायिकेच्या पित्याला डिवचण्यासाठी नायक व नायिकेचे मित्र मैत्रिणी नाचतात गातात
ले जाऐंगे… ले जाऐंगे दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे
रह जाऐगे…रह जाऐगे पैसेवाले देखते रह जाऐंगे
नायिकेचा पिता यावरून आणखी खवळतो आणि एका खोट्या प्रकरणात नायकाला जेलमध्ये टाकतो. तेथे त्याची राजू उस्ताद इत्यादी कैद्यांबरोबर गैरसमजातून झटापट होते. निरपराध नायक हतबल होऊन एका रात्री कैद्याच्या रूपात गातो,
घुंगरू की तरह बजता ही रहा हू मै… कभी इस पग मे
त्याच्या (खरंतर किशोरकुमारच्या) आवाजातील दर्द ऐकून भलुआ (असरानी), कलुआ (तरुण घोष) आणि राजू उस्ताद (डॅनी डेन्झोपा) यांना गहिवरून येते. ते विजयला मदत करायचे ठरवतात आणि चौघे पद्धतशीर योजनेनुसार जेल फोडून पळतात. आपणास शिक्षा झाली तरी आपली प्रेयसी गप्प या रागातून विजय रेखाला भेटायला येतो. तेव्हा त्याचा गैरसमज दूर होतो आणि हे दोघे आणि ते तिघे कैदी असे पाचजण एका गावात जाऊन राहतात. त्या गावातील जनतेचे मन जिंकतात, गावात सुधारणा करतात, गावच्या शत्रूचा पाडाव करतात वगैरे वगैरे…
एन. एन. सिप्पी निर्मित व अशोक रॉय दिग्दर्शित चोर मचाये शोर (मुंबईत रिलीज 17 मार्च 1974) चित्रपटाची ही गोष्ट. तब्बल पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील. पिक्चर हिट झाले होते हो. मुंबईत अलंकार थिएटरमध्ये रौप्य महोत्सव साजरा.
आज यू ट्यूबवर हा पिक्चर एन्जॉय करताना तुम्ही त्याची तेवढी गाणीच पहाल आणि उर्वरित चित्रपट फास्ट फॉरर्वड कराल, कारण गोष्ट यथातथाच वाटेल. त्या काळात अशा ’स्टोरीज’ पब्लिकला आवडत. एखाद्या गावात जाऊन तेथे सुधारणा करणे, त्या गावाला छळणारा खलनायकाचा पाडाव करणे आणि गावकर्‍यांचे मन जिंकणे अशा गोष्टी अनेक चित्रपटांत दिसत. फक्त त्याचं कव्हर वेगळे असे. नरेंद्र बेदी दिग्दर्शित ’खोटे सिक्के’ वगैरे अनेक चित्रपट तसेच होते. पटकथेत कोणता मसाला घालून चित्रपट कसा रंजक केला जातो हे महत्त्वाचे असे. ’चोर मचाये शोर’चे लेखन ध्रुव चटर्जी आणि एस. एम. अब्बास यांचे. मनोरंजनाची भट्टी छानच जमलेली.
शशी कपूर व मुमताज ही जोडी याच पिक्चरमध्ये पहिल्यांदाच एकत्र आली. शशी कपूरने राज खोसला दिग्दर्शित ’दो रास्ते’ (1969) आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित ’सच्चा झूठा’ (1970) या चित्रपटांच्या वेळेस मुमताजला आपली नायिका म्हणून स्वीकारण्यास चक्क नकार दिला होता असा किस्सा प्रसिद्ध आहे. आपली भूमिका असलेल्या श्रीधर दिग्दर्शित ’प्यार किये जा’ (1966)मध्ये मेहमूदची नायिका असलेल्या मुमताजला आपली नायिका म्हणून स्वीकारण्यास शशी कपूरचे मन तयार होत नव्हते. चित्रपटसृष्टीचे असेही एक अंतरंग. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, मुमताजला आपली नायिका म्हणून स्वीकारण्यास जितेंद्र, धर्मेंद्रही सुरुवातीस तयार नव्हते. तिने ज्युनिअर डान्सरपासून सुरू केलेला प्रवास सहनायिकेच्या भूमिकेतून पुढे जात असल्याचा हा टप्पा होता. चाणक्य दिग्दर्शित ’राम और श्याम’मध्ये ती दोनपैकी एका दिलीपकुमारची श्यामची नायिका होती (प्रमुख नायिका वहिदा रेहमान) हा मुमताजच्या वाटचालीतील महत्त्वाचा क्षण. विजय आनंद दिग्दर्शित ’तेरे मेरे सपने’ (1972) आणि देव आनंद दिग्दर्शित ’हरे राम हरे कृष्ण’ (1972)मध्ये देव आनंदची नायिका म्हणून मुमताजची निवड होताच तिच्या मेहनत, गुणवत्ता, नृत्य व सौंदर्याचे महत्त्व अनेकांना पटले. मुमताजने एका मुलाखतीत चक्क म्हटलं, आपणास नायिका म्हणून का स्वीकारत नाही हे शशी कपूरला विचारण्यास ती मेहबूब स्टुडिओतही गेली होती. असा बाणा हवा.
शशी कपूरने ’चोर मचाये शोर’ आणि राज खोसला दिग्दर्शित ’प्रेम कहानी’ (रिलीज 7 मार्च 1975) या चित्रपटात मुमताजला नायिका म्हणून स्वीकारले. ’प्रेम कहानी’ हा म्युझिकल प्रेम त्रिकोण. राजेश खन्ना आणखी एक प्रेमिक नायक. यात मुहूर्ताच्या वेळेस मौशमी चटर्जी नायिका होती. राजेश खन्नाच्या आग्रहाखातर मुमताज या चित्रपटात आली आणि मग लग्न करून तिने चित्रपटसृष्टीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला…
’चोर मचाये शोर’ हा एन. एन. सिप्पी प्रॉडक्शन्सचा चित्रपट. वह कौन थी वगैरे चित्रपटानंतरचा त्यांचा ’चोर मचाये शोर’ आणि याच्या यशानंतर शशी कपूर, असरानी, डॅनी यांना घेऊन सी. पी. दीक्षित दिग्दर्शित ’फकिरा’ची निर्मिती. नायिका शबाना आझमी. त्याशिवाय कालीचरण व मेरी जंग (दिग्दर्शक सुभाष घई), देवता (एस. रामनाथन), सरगम (के. विश्वनाथ), घर (माणिक चटर्जी), फिर वही रात (डॅनी डेन्झोप्पा) वगैरे चित्रपटांची निर्मिती केली. त्यांची स्वतःची चित्रपट वितरण व्यवस्थाही होती. जनता वितरण व सफायर रिलीज या नावाची. मला आठवतंय नाझ इमारतीत त्यांचे ऑफिस होते.
’चोर मचाये शोर’चे दिग्दर्शक अशोक रॉय यांनी कलाबाज (देव आनंद व झीनत अमान जोडी होती), हिरालाल पन्नालाल, कसम खून की, एक और एक ग्यारह इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. एक सर्वसाधारण क्षमतेचा दिग्दर्शक हीच त्याची ओळख राहिली. असे दिग्दर्शक सर्व काळात असतात.
’चोर मचाये शोर ’च्या प्रदर्शनाच्या वेळेस शशी कपूर मनोजकुमार निर्मित व दिग्दर्शित ’रोटी कपडा और मकान’ (रिलीज 18 ऑक्टोबर 1974)च्या शेवटच्या चित्रीकरण सत्रात भाग घेत होता आणि त्याला मनोमन वाटत होते, आपल्याला हिट चित्रपटाची आवश्यकता आहे. आपले सोलो हिरोचे चित्रपट अधिक प्रमाणात लोकप्रिय व्हावेत. यश चोप्रा दिग्दर्शित ’वक्त’च्या यशात बरेच वाटेकरी होते. सुरज प्रकाश दिग्दर्शित ’जब जब फुल खिले’ सुपरहिट होता. तसेच यश त्याला हवे होते. मनोजकुमारने त्याची ही इच्छा ओळखून त्याला शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्याचे सुचवले. त्यानुसार शशी कपूर शिर्डीला गेला. त्याच दिवशी नेमका परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ’दीवार’चा मुहूर्त होता. चित्रपती व्ही. शांताराम, दिग्दर्शक विजय आनंद असे अनेक मान्यवर ’दीवार’च्या मुहूर्ताला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असतानाच शशी कपूर मात्र हजर राहू शकला नाही. त्याचीही बातमी झाली.
’चोर मचाये शोर’ची अशीही एक विशेष आठवण… चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय. दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे (आशा भोसले, किशोरकुमार व कोरस), एक डाल पर तोता बोले (लता मंगेशकर व मोहम्मद रफी) ही गाणी इंद्रजितसिंग तुलसी यांनी लिहीलेली. तर घुंगरू की तरह (किशोरकुमार), पांव मे डोरी (आशा भोसले व मोहम्मद रफी), आगरे से घाघरो (आशा भोसले) ही गाणी रवींद्र जैन यांची. चित्रपटाला संगीत रवींद्र जैन यांचे. छायाचित्रणकार के. एच. कापडिया, तर संकलन वामन गुरी यांचे.
’चोर मचाये शोर’ आणखी एका गोष्टीसाठी कायमच फोकसमध्ये… यशराज फिल्म निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित ’दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (1995 च्या दिवाळीत प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही दक्षिण मध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला सुरू आहेच) हा बहुचर्चित चित्रपट. ’चोर मचाये शोर ’च्या सुपरहिट गाण्याचा मुखडा एका माईलस्टोन चित्रपटाचे नाव आहे तर मग आणखी काय हवे? ले जाऐंगे ले जाऐंगे दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे… गाणे लिहिताना असा एखादा भन्नाट विक्रम होईल अशी अपेक्षा ठेवली गेली असेल असे अजिबात वाटत नाही, यातच सगळे काही आले.
दिग्दर्शक डेव्हिड धवनचाही ’चोर मचाये शोर’ (2002) नावाचा पिक्चर आहे. पडद्यावर आला तोच गेलादेखील. बॉबी देओल (डबल रोलमध्ये होता), शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू, परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे केवळ नामसास्य आहे इतकेच. मूळ चित्रपटाची गंमत यात अजिबात नाही. मूळ चित्रपटात स्टाईलीश शशी कपूर, ग्लॅमरस मुमताज, विनोदाच्या टायमिंगचा असरानी आणि फिट्ट असा डॅनी डेन्झोप्पा आणि झक्कास गीत संगीत व नृत्य होते. त्यात मनोरंजनाची भट्टी छानच जमली होती…

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply