Breaking News

बिबट्याच्या कातडीसह सात आरोपी जेरबंद

Exif_JPEG_420

नागोठणे : प्रतिनिधी

बिबट्याचे कातडे घेऊन जाणार्‍या सात जणांना पनवेलचे संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथक आणि नागोठण्यातील वन विभागाच्या पथकाने कातडे आणि तीन दुचाकींसह मंगळवारी (दि. 1) सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. आरोपींना बुधवारी (दि. 2) दुपारी रोह्याच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, सातही जणांना तीन दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अलिबागचे सहाय्यक वनसंरक्षक संजय कदम यांनी नागोठण्यात येऊन सर्व माहिती जाणून घेतली व अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. ठाणे येथील वन विभागाच्या दक्षता पथकाचे विभागीय वन अधिकारी यांना मंगळवारी नागोठणे-रोहे मार्गावरून रोहे बाजूकडून काही जण बिबट्याचे कातडे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी तातडीने पनवेलच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वनाधिकारी पी. बी. मरले यांना कळविले. मरले यांनी याची दखल घेत आपल्या पथकासह सायंकाळी नागोठणे गाठले व येथील वनाधिकारी किरण ठाकूर यांना माहिती दिली. या दोन्ही अधिकार्‍यांसह पनवेल व नागोठण्याच्या संयुक्त पथकांनी नागोठणे-रोहे मार्गावर भिसे खिंडीत जाऊन ते दबा धरून बसले.काही वेळातच संशयित इसम तेथे येऊन बिबट्याची खरेदी विक्री करीत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सात आरोपींपैकी एक जण जंगलातून पळून गेला होता. मध्यरात्री त्याला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. सुरेश नारायण पाटील (रा. चेंबूर, मुंबई), गणेश बाळकृष्ण काटकर, किशोर महादेव पाटील (दोघे तळवली, अलिबाग), राजेंद्र गजानन ठाकूर (थळ चाळमळा, अलिबाग), मधुकर मनोहर खारकर (भागवाडी, अलिबाग), प्रवीण केशव सावंत (तळवली, अलिबाग) आणि रामचंद्र बाळू हिरवे (बेलवाडी, रोहे) अशी पकडण्यात आलेल्या सात आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचे बिबट्याचे कातडे आणि एक लाख पाच हजार रुपयांच्या तीन मोटारसायकली असा एकूण पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल नागोठणे वन विभागाने ताब्यात घेतला आहे. सातही आरोपींवर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9,39,49,50 व 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply