Breaking News

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय समिती बैठक सोमवारी (दि.15) कर्जतमधील साईकृपा शेळके सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी खासदार बारणे यांनी, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना स्वतःची काळजी घ्यावी. तापमान 41-42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. अशा परिस्थितीत दुपारी बाहेर पडणे टाळून सकाळी व संध्याकाळी प्रचारावर भर द्यावा, अशी सूचना केली.
या बैठकीस भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, भाजप क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, राष्ट्रवादीचे नेते व जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, सहचिटणीस भरत भगत, जिल्हाध्यक्ष हनुमान पिंगळे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, तालुकाध्यक्ष राजेश भगत, नरेश पाटील, प्रवीण मोरे, विजय पाटील, भाई गायकर, शिवराम बदे, पंकज पाटील, संभाजी जगताप, संदेश पाटील, राहुल डाळिंबकर, प्रमोद महाडिक, हिरामण गायकवाड, सचिन कर्णूक, विजय सावंत, महेंद्र निगुडकर, जे.पी. पाटील, भगवान भोईर, भगवान चंचे, संतोष बैलमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्ष कोठेही दिसत नाही. विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे सांगण्यासारखे काहीच नाही. ते केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवाराने मतदारसंघात केलेले एकतरी ठोस काम दाखवावे.
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. राज्यातही जनतेच्या मनात असलेले ओळखून ते देण्याची क्षमता असलेले सरकार आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी मतदारसंघातील सहाही आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल यात शंकाच नाही.
गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात विकासकामे केली आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी धादांत खोटा प्रचार चालवला आहे. खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपर्‍यात काम केलेले असताना त्यांनी कामच केले नाही अशी टीका करणार्‍या विरोधकांना हा मतदारसंघच माहीत नाही, असे म्हणावे लागेल, अशा शब्दांत आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आमदार थोरवे पुढे म्हणाले की, जनतेने मागील निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला मते दिली होती. जनतेच्या कौलाचा आदर ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही आमदार-खासदारांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आता महायुतीचा धर्म आपण सर्वांनी मिळून पाळायचा आहे. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून देऊया. मी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार आहे.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर येऊन तेथील पवित्र माती डोक्याला लावणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी मावळ मतदारसंघातील मावळा दिल्लीला गेलाच पाहिजे, असे प्रतिपादन भाजप नेते बाळासाहेब पाटील यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र पाटील, नरेंद्र गायकवाड, भरत भगत आदींचीही या वेळी भाषणे झाली. या बैठकीला महायुतीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply