Breaking News

खालापुरातील अन्य प्रदूषणकारी कारखान्यांचे काय?

प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका गुलदस्त्यात

खोपोली : प्रतिनिधी 

जलप्रदूषण केल्यामुळे खालापूर तालुक्यातील ‘उत्तम स्टील‘च्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस स्वागतार्ह असली तरी या कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दोन वर्षाचा कालावधी का लागला, याचे उत्तर मिळणे अपेक्षित असून, भू, जल, वायू प्रदुषण करणार्‍या  तालुक्यातील अन्य कारखान्याबाबतही प्रदूषण नियंत्रण  मंडळाने कारवाईची भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. उत्तम स्टील कारखान्याचे सांडपाणी थेट परिसरातील विहीरी आणि ओढ्यात गेल्याने सप्टेंबर 2020 मध्ये जलप्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी खालापूर पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती वृषाली पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यासह  कारखान्यावर हल्लाबोल केला होता. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यावेळी हाताची घडी घालून बसल्याने कोणतीच कारवाई झाली नाही. नदी काठच्या कारखान्यांपैकी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे कारखाने सोडले तर अनेक कारखान्यांची सांडपाणी विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नाही. याशिवाय सांडपाणी नियोजनाची मानसिकता नसलेले कारखाने नदीच्या पाण्यात रासायनीक सांडपाणी सोङून देतात. तर काही काही कारखाने रात्रीच्या वेळी टँकरद्वारे नदीत सांडपाणी सोडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या रासायनीक सांडपाण्यामुळे खालापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या पाताळगंगा नदीच्या पाण्याने प्रदूषणाची परमोच्चता गाठली आहे. पाताळगंगा नदी किनारी असलेली गावे व वाड्या आजही दैनदिंन वापराकरिता लागणार्‍या पाण्यासाठी पाताळगंगेची वाट पकडतात. या नदीतील मासेमारीवर उपजाविका करून जगणारे शेकडो कुटूंबे खालापूर तालुक्यात आहेत. मात्र नदीच्या प्रदुषीत पाण्यामुळे अंगावर पुरळ, खाज यासारखे प्रकार नियमीत घडत आहेत. उग्र वासामुळे गुरेढोरेदेखील नदीच्या पाण्याला तोंड लावत नाहीत.  नदीतील जलचरही धोक्यात आले आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगातून उगम पावलेली पाताळगंगा नदी खोपोलीतील गगनगिरी मठाला वळसा घालून खालापूर, पेण आणि पनवेल तालुक्यातून पुढे खाडीला मिळते. सुमारे चाळीस किलोमीटरचा प्रवास करणार्‍या या नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना उभारल्या आहेत. या पाणी योजनांद्वारे शेकडो गावांत पाताळगंगेचे पाणी पोचते. मात्र जलप्रदुषणामुळे तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पाताळगंगा नदीत रासायनीक सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी वेळोवेळी केली जात असून प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती आहे.  पर्यावरणासाठी अनेक संस्था काम करीत असताना मात्र त्यांचेही पाताळगंगा नदीकडे दुर्लक्ष होत आहे.

पाताळगंगा नदी पात्रात रासायनीक सांडपाणी  सोडण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र पंचनामे करणे, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे या पलिकडे काहीच होत नाही. अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळ अस्तित्वात आहे की, नाही असा प्रश्न पडतो.

-सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ता,चौक, ता. खालापूर

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply