Breaking News

पनवेल कार्यालयात विद्युत मीटरचा तुटवडा

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात नादुरुस्त विद्युत मीटरच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या नादुरुस्त विद्युत मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठविली जातात. हे मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज केले आहेत; परंतु महावितरणच्या पनवेल कार्यालयात नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या पनवेल मंडळात सिडको वसाहती, पनवेल शहर त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि उरणचा समावेश आहे. या ठिकाणी लाखो वीजग्राहक आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामध्ये व्यावसायिक, घरगुती आणि औद्योगिक प्रकारच्या वीजजोडण्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत पनवेल परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटले आहे; परंतु अनेक ग्राहकांना वाढीव देयके येत असल्याच्या तक्रारी आहेत.

कामोठे वसाहतीतील रहिवाशांच्या या संदर्भात अधिक तक्रारी आहेत. या विभागातील 300 ते 400 चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानाला 63 हजार रुपयांचे देयक पाठविल्याची उदाहरणे आहेत. हे प्रतिनिधिक उदाहरण असले, तरी या क्षेत्रात अनेकांना विजेच्या वापरापेक्षा अधिक देयके पाठविली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नियमित विद्युत मीटरची रिडिंग न घेणे, सरासरी देयके पाठविणे आदीमुळे वाढीव देयके पाठविली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, शहरात विद्युत मीटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेही ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. नादुरुस्त मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज केले आहेत; परंतु महावितरणकडे नवीन विद्युत मीटरच नसल्याने याचा फटका ग्राहकांना बसत आहे, त्यामुळे महावितरणच्या अडचणीसुद्धा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करून मागणीनुसार नवीन विद्युत मीटर बदलून मिळावेत, अशी मागणी पनवेल विभागातील ग्राहकांनी केली आहे.

– ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन मीटर उपलब्ध आहेत. विशेषतः सिंगल फेजच्या मीटरचा पुरेसा साठा आहे; परंतु थ्री फेज आणि नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी पुरेसे मीटर नाहीत. त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.

-राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, महावितरण

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply