Breaking News

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान (डॅनी डेन्झोप्पा) हे खौपनाक लुटारु या दरोड्यात बँकेतील नोटा, दागिने बॅगेत भरतात आणि आता ते त्यांची साथीदार कामिनी (सोनिया साहनी) हिच्या गाडीत बसून पुणे शहराकडे पळणार तोच शस्त्रधारी पोलीस येतात. त्यांच्यात व या तीन दरोडेखोर यांच्यात जोरदार चकमक सुरू होते. त्यात कामिनी गाडी घेऊन पळ काढण्यात यशस्वी ठरते, पण हे तिघे पोलिसांवर प्रतिहल्ला करण्याच्या प्रयत्नात गाडीत बसू शकत नाही. लुटीचा पैसा व दागिने कामिनीच्या गाडीत असतात तर आता हे तिघे मिळेल ती गाडी पळवून पोलिसांना चकमा देतात. बराच काळ पोलीस या गाडीचा पाठलाग करतात, पण ते या लुटारुना पकडू शकत नाहीत.
…हे तीन खौपनाक नि विक्षिप्त लुटारु एका वृत्तपत्र संपादक अशोक रॉय (राजकुमार) यांच्या प्रशस्त घरात आश्रयासाठी घुसतात. अशोक रॉय हे आपली पत्नी दीपा रॉय (माला सिन्हा), मुलगी नैना रॉय (परवीन बाबी) आणि शालेय वयातील मुलगा (मा. शैलेश) राहत असतात. त्यांनी चुपचाप रहावे, आपल्या सूचना पाळाव्यात, कामिनीशी संपर्क होईपर्यंत आपण येथेच राहणार असे ते तिघे अशोक रॉयना सक्त ताकीद देऊन सांगतात, यातून जे थरारक नाट्य घडते तो चित्रपट म्हणजे, राज तिलक दिग्दर्शित छत्तीस घंटे हा थ्रीलर चित्रपट. मुंबईत हा चित्रपट 21 जून 1974 रोजी प्रदर्शित झाला. मेन थिएटर अप्सरा होते. चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झालीदेखील, यानिमित्त हा फोकस. हा थरार काहिसा बोथट झाल्यानेच चित्रपटाला अगदीच साधारण यश प्राप्त झाले. दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगला होता, पण पटकथेत फार टर्न आणि ट्विस्ट नव्हते. वा निर्माण करता आले नाहीत. निर्माता व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म यांच्या स्टोरी डिपार्टमेंटने या चित्रपटाचे लेखन केले (पूर्वीच्या अनेक चित्रपटाच्या गोष्टी अशाच जन्माला आणल्या जात. या स्टोरी डिपार्टमेंटमध्ये किती जण कामाला असत, ते टाईपरायटरवर काम करीत काय हे शोध घेऊनही कधीच समजले नाही.) संवाद अख्तर उल इमान यांचे आहेत.
या चित्रपटाची निर्मिती बी. आर. फिल्मच्याच बॅनरखालील. (सुरुवातीस श्रेयनामावलीत तसा उल्लेख आहे). राज तिलक यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. ते बी. आर. चोप्रा यांच्याकडे दास्तान (1972), धुंद (1973), यश चोप्रा यांच्याकडे इत्तेफाक (1969) आणि आदमी और इन्सान (1970) या चित्रपटांच्या वेळेस सहाय्यक दिग्दर्शक होते. हे सर्व बी. आर. फिल्म या बॅनर निर्मित चित्रपट. हे तसेच बी. आर. फिल्मचे बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ’कानून’ (1960), ’हमराज’ (1967) हे रहस्यरंजक चित्रपट. या चित्रपटातील कानून व इत्तेफाक यात एकही गाणे नाही हे विशेषच आणि त्या काळात तर आश्चर्यचकित करणारे. गीत संगीत नृत्य म्हणजे चित्रपटाचा ऑक्सिजन असा तो काळ.
36 घंटे या नावातच वेगळेपण आहे. आणि स्टार कास्टदेखील तगडी. सुनील दत्त खलनायकच्या भूमिकेत हे तर मुहूर्तापासूनच गाजत होते. (या चित्रपटाच्या कलाकारांची निवड होण्याच्या दिवसात सुनील दत्तचा काहीसा पडता काळ होता. कमबॅकसाठी तो धडपडत होता. अभिनेत्री साधना हिने दिग्दर्शित केलेल्या ‘गीता मेरा नाम’मध्ये साधनाची दुहेरी भूमिका असतानाच फिरोझ खान नायक तर सुनील दत्त खलनायक होता.) डॅनी व रणजीत हे त्या काळातील पडद्यावरचे हुकमी बदमाश. त्यांच्यासोबत सुनील दत्त ही आघाडी वा समीकरण काही वेगळेच. तिघांचे गेटअप भयावह आणि डरावने. रणजीत या संधीने विलक्षण खुश होता, असे त्यानेच मला अलिकडेच त्याची इट्स मज्जा या डिजिटल चॅनेलसाठी त्याच्याच जुहूच्या बंगल्यावर मुलाखत शूट केली तेव्हा त्याने म्हटले. आपले खरे नाव गोपाल बेदी. सुनील दत्तने रेश्मा और शेरा या चित्रपटातून रुपेरी पदार्पणची संधी दिली तेव्हा त्यांनीच रणजीत केले हे त्याने प्रचंड उमाळ्याने सांगितले (यू ट्यूबवर ही मुलाखत पाहता येईल) आणि आता पुन्हा सुनील दत्तसोबत खलपुरुष साकारायची संधी, याचा आनंद काही वेगळाच.
36 घंटेचा पूर्वप्रसिद्धीचा जास्त फोकस याच तिघांवर राहिल्याने तेच या चित्रपटाच्या कथेचे नायक वाटू लागले. बनी रुबैन यांनी चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचे तर वसंत साठे यांनी चित्रपटाच्या प्रमोशनचे काम पाहिले. (वसंत साठे यांनीच राज कपूरच्या बॉबीचे लेखन केले. अनेक चित्रपटांच्या पूर्वप्रसिद्धीचे काम ते अतिशय कल्पकतेने, हुशारीने व हौसेने करीत. एक गोष्ट आवर्जून सांगायलाच हवी, हे वसंत साठे आणि त्या काळातील काँग्रेस नेते केंद्रीय मंत्री वसंत साठे या दोन भिन्न व्यक्ती होत्या. त्यांच्यात फक्त नामसाम्य होते इतकेच. सोशल मीडियात तर हा फरक आवर्जून सांगायलाच हवा. वसंत साठे आणि एम. बी. सामंत यांच्या बॉम्बे पब्लिसिटी सर्विस या विश्वासार्ह संस्थेच्या वतीने अनेक चित्रपटांच्या पूर्वप्रसिद्धी व प्रमोशनचे काम करण्यात येई हे मी स्वतः अनुभवलंय.)
आज मी 36 घंटे या चित्रपटाचा विचार करतो तेव्हा माझ्या मनात प्रश्न येतो, यश चोप्रांचा इत्तेफाक सुपरहिट ठरला म्हणून बी. आर. चोप्रा यांनी त्यासारखीच एकाच फ्लॅटमध्ये घडणारा थरार म्हणून 36 घंटेची कथाकल्पना पडद्यावर आणली नाही ना? शक्यता नाकारता येत नाही आणि चोप्रांचे हुकमी कलाकार राजकुमार, सुनील दत्त व माला सिन्हा यांनी चोप्रांसाठीच राज तिलकला होकार दिला असावा. ते सहजी (विशेषत: लहरी राजकुमार) सहजी चित्रपट स्वीकारणारे नव्हतेच. इत्तेफाकचं नाट्य आणि रहस्यरंजकता अखेरपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारी. क्लायमॅक्सला जोर का धक्का धीरेसे लगे असं खरा खुनी समजल्यावर होतं. राजेश खन्नाच्या बेहतरीन अदाकीरीपैकी हा एक चित्रपट. नंदा (साधनाने नकार दिल्यावर नंदाकडे हा चित्रपट आला), बिंदू, इफ्तेखार, सुजीतकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत एका सेटवर झाले होते. 36 घंटेमध्ये अशी नाट्यमयता वा पकड नव्हती. नैना रॉयला तिचा प्रियकर विजय (विजय अरोरा) भेटायला येतो त्यात थ्रिल निर्माण करता आले नाही. राजकुमार असल्याने डायलॉगबाजीवर बराच भर होता. पण जोरदार संवादफेक म्हणजे चित्रपट पुढे सरकतो असे नव्हे. सुनील दत्त, रणजित व डॅनी या तिघांनी खौपनाक खलनायकीत जबरा रंग भरला. डॅनीने बी. आर. चोप्रा दिग्दर्शित धुंद (1973) मधील नकारात्मक व्यक्तीरेखेत आपला जबरदस्त ठसा उमटवून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.
साहिर यांच्या गीतांना सपन चक्रवर्ती यांचे संगीत. सुरुवातीस चित्रपटात असलेल्या चार गाण्यातील दोन रोमॅन्टीक गाणी अडथळा वाटतो म्हणून आठवडाभरात कापण्यात आली. अशोक रॉय आपल्या कुटुंबासह सकाळी देवापुढे भजन गातात हे गाणे श्रवणीय. तीन लोक घर राज तिहारा चार हे ते भजन.
चित्रपटात इफ्तेखार (विजयचे पिता), उर्मिला भट्ट (विजयची आई), रमेश देव (इन्स्पेक्टर वाडेकर) यांसह देवेन वर्मा इत्यादींच्या भूमिका. या चित्रपटाची मूळ कल्पना जोसेफ हेस यांच्या 1954 या कादंबरीत होती, त्यावरुन द डेस्परेट अवर्स (1956) हा अमेरिकन चित्रपट निर्माण झाला. त्यावरुन हिंदी चित्रपट करताना मूळ स्पार्क हरवला. त्यातला थरार बोथट झाला. कदाचित त्या काळातील प्रेक्षकांना तीन लुटारुंनी एका कुटुंबाला ओलीस ठेवणे आवडेल न आवडेल या समजदारीत दिग्दर्शक सापडला असावा. रवि चोप्रा या चित्रपटाच्या वेळेस राज तिलककडे सहाय्यक दिग्दर्शक होता. या चित्रपटाने साधारण स्वरुपाचे यश संपादले. काही वर्षांनी मॅटीनी शोला या चित्रपटाला रिस्पॉन्स मिळत राहिला याचं कारण, अशाच थ्रिल चित्रपटांचा मॅटीनी शोला हुकमी प्रेक्षकवर्ग होता.
दिग्दर्शक राज तिलकनी त्यानंतर मुक्ती (शशी कपूर, संजीवकुमार, विद्या सिन्हा), ’चेहरे पे चेहरा’ (संजीवकुमार, रेखा) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण आपली ओळख निर्माण करण्यात त्याला यश प्राप्त झाले नाही….
36 घंटे हीच काय ती त्याची ओळख नि आठवण.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply