पनवेल ः वार्ताहर
बँकांच्या शाखांवर व एटीएमवर गंभीर हल्ले झाल्याचे विविध माध्यमांकडून कळत आहे. यात काही बँक कर्मचार्यांना आपले प्राण गमावले आहेत तर काही गंभीर झाले आहेत. तसेच बँकांची लाखोंच्या रुपयांची लूट झाली आहे. बँकांची सुरक्षा हा सध्या ऐरणीवरचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक ही ग्राहकांच्या मेहनतीच्या मिळकतीच्या ठेवींची सुरक्षा करणारी विश्वासू संस्था असते. विविध हल्ल्यामुळे बँकेचे ग्राहक व कर्मचारी सध्या भयभीत वातावरणातून जात आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजमेंटने तर तिच्या शाखांमधील व एटीएमवरील सुरक्षाच काढून घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हाच ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रमधील अग्रगण्य असलेली संघटना ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन (ए. आय. बी. ए.) ने आंदोलन पुकारले आहे. काल झालेल्या भारत भरातील 27 झोन्समध्ये 1500 पेक्षा जास्त कर्मचार्यांनी सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले. यात ठाणे येथील झोनल कार्यालयात संघटनेच्या कर्मचार्यांनी तीव्र निदर्शने करून झोनल प्रमुखांना निवेदन सादर केले. याप्रसंगी संघानेचे वरिष्ठ पदाधिकारी सदानंद पेडणेकर, अरविंद मोरे, रविकांत गांजवे, बाबू जाधव, गोपीचंद पाटेकर, सुनील वैती, चंद्रकांत जाधव, संजय भावसार, मधुकर जामदार, जगदीश वाघचवरे, मंगेश भालेराव, गणेश जोशी, सुशांत गुरव, संजय बागुल, अशोक गुरव, मनीष सरोदे, नरेश शिंदे, रमेश डोळस, कमलाकर रोकडे, सुभाष भांगले, विलास खांडगे, उत्तम काशीद, प्रमोद भोईटे, सुधीर चाळके, विलास गरुड, शरयु मानापुरे, वर्षा कसले, प्रगती नारकर, शोभा ठोंबरे, नेहा नांदोस्कर, रेश्मा पुजारी व अमृता सोनार आदी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.