Breaking News

‘1942 अ लव्ह स्टोरी’ 30 वर्षे; …और इस दिल मे कोई नहीं है बस एक तुम हो

एक लडकी को देखा तो ऐसा लगा…. हे सर्वकालीन सदाबहार गाणे जावेद अख्तर यांनी कोणाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले होते माहित्येय? माधुरी दीक्षितला.
होय, 1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटातील रज्जो माधुरी दीक्षितच रंगवणार होती. तसं तिचं फोटोसेशन झाल्याचा फोटो सोशल मीडियात पहायला मिळतोय. (सोशल मीडियातील एक चांगली गोष्ट. दुर्मिळ गोष्टी दाखवतो.) आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्राने तिची निवड केली यात आश्चर्य ते काय? त्यांच्याच परिंदा (1989)मध्ये ती होती. एकमेकांची कामाची पद्धत, क्षमता, शैली एकमेकांना माहीत होती. सगळे जुळून आले तरी डेट प्रॉब्लेम ही मोठीच अडचण असते. त्याच वेळेस माधुरी हम आपके है कौन, याराना या चित्रपटात बिझी होती. त्यातून ‘1942 अ लव्ह स्टोरी’साठी ती वेळ काढणार कशी हा प्रश्नच होता… पडद्यावर यायच्या राहून गेलेल्या गोष्टी अशा फार रंजक.
काही चित्रपट आवडायला नि आठवायला एकच कारण नसते. 1942 अ लव्ह स्टोरी (मुंबईत प्रदर्शित 15 जुलै 1994) असाच. तुम्हालाही माहित्येय, 1942 साली भारतात इंग्रजांविरोधात अतिशय निग्रहपूर्वक चले जाव चळवळ झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर ही नरेंद सिंग अर्थात नरेन (अनिल कपूर) आणि राजेश्वरी पाठक अर्थात ’रज्जो’ (मनिषा कोईराला) यांच्यातील प्रेमकथा.
विधु विनोद चोप्रा परिंदा (1989) या मुंबईतील अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटानंतर कोणता चित्रपट घेऊन येणार याची फार उत्सुकता होती. अंधेरीतील नटराज स्टुडिओतील त्यांच्या प्रशस्त ऑफिसमधून काही खबर लागते का याचा शोध घेताना बातमी फुटत नव्हती. एके दिवशी स्क्रीन साप्ताहिकात बातमी आली, विधु विनोद चोप्रा यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथेची घोषणा केली 1942 अ लव्ह स्टोरी. विधु विनोद चोप्रा म्हणजे आपल्या चित्रपटाचा विषय ठरवण्यासाठी अतिशय खोलवर जाऊन विचार करणारा, त्याच्या अवतीभवतीच्या अनेक गोष्टींचा तपशील जाणून घेणारा, भरपूर पेपरवर्क करणारा, व्यक्तीरेखेनुसार कलाकार निवडणारा, थीमनुसार लोकेशन (शूटिंग स्पॉट) निश्चित करणारा आणि चित्रपट निर्मितीत गुंतत, गुरफटत जाणारा असा फिल्म मेकर… चित्रपट निर्मिती एक सिरीयस बिझनेस हेच यातून अधोरेखित होते.
चित्रपटाचे हिमाचल प्रदेशातील डलहौसी, चम्बा, खजियार, कलाटोप सॅक्युलरी येथे मोठ्याच प्रमाणावर आऊटडोअर्स शूटिंग सुरू असल्याच्या बातम्या रंगू लागल्या. काही दिवस होताहेत तोच स्क्रीन साप्ताहिकात या चित्रपटाबाबत वेगळेच कव्हरेज पहायला मिळाले. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी हुबेहूब असा डलहौसीचा परिसर उभारलाय. (या सेटने नितीन देसाई या नावाभोवती वलय आले. कामच तसे तगडे होते.) या सेटचाच खर्च ऐंशी लाख होता. (त्या काळातील मोठीच रक्कम. महागडा सेट), दिग्दर्शक विजय आनंदने या सेटला भेट दिल्यावर तर याच सेटला विलक्षण ग्लॅमर आले. बरीच चर्चा रंगली. अनिल कपूर व जॅकी श्रॉफने विजय आनंदला त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटात भूमिका करायला आवडेल असे आश्वासनही दिले. (या दोघांसह जुही चावला व रविना टंडनला निवडून त्याने केलेली नवीन चित्रपटाची घोषणा ट्रेड पेपरमधील जाहिरातीपुरती राहिली. अरेरे…)
हा चित्रपट आणि राजश्री प्रॉडक्सन्स निर्मित सूरज बडजात्या दिग्दर्शित हम आपके है कौन (मुंबई रिलीज 5 ऑगस्ट 1994) हे चित्रपट एकाच वेळेस निर्मितीवस्थेत असल्याने दोन्हीची एकाच वेळेस चर्चा रंगू लागली.
…काही गोष्टी कशा घडतात बघा, 1994 ची सुरुवात झाली तीच संगीतकार राहुल देव बर्मनच्या धक्कादायक निधनाच्या वृत्ताने. (4 जानेवारी). आर.डी.च्या अष्टपैलू, चौफेर वाटचालीतील हा अवघड काळ होता. गुणवत्ता असूनही त्याची कळत नकळत व्यावसायिक कोंडी झाली होती (त्या दिवसातील चित्रपटसृष्टीतील राजकारण, बदलते नातेसंबंध हा वेगळाच विषय). आर.डी.च्या निधनानंतर 25 मार्च रोजी पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘1942 अ लव्ह स्टोरी’च्या ध्वनिफीत प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण हाती येताच कुतूहल निर्माण झाले. मी आरडी भक्त असल्याने तो जाता जाता काय देऊन गेला हे ऐकण्याची ओढ होती. ही नेहमीपेक्षा वेगळीच फिल्मी पार्टी असून त्यावर आरडीचं कुठेतरी कळत नकळत सावट आहे याची मला त्यात वावरताना जाणीव झाली. याच सोहळ्यात कविता कृष्णमूर्तीने प्यार हुआ चुपके से ऐकताना आरडीने कायमच आपल्या दर्जानुसार काम केल्याचा पुनर्प्रत्यय आला…
रिदम हाऊस इत्यादी ठिकाणी 1942 अ…ची तबकडी, ध्वनिफीत विक्रीला आली ती विक्रीचा नवीन रेकॉर्ड करण्यासाठी. सिल्व्हर डिस्क, गोल्डन डिस्क, प्लॅटिनम डिस्क असे नवीन उच्चांक होत गेले. जावेद अख्तर व राहुल देव बर्मन यांच्या श्रवणीय गीत संगीताने सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रातील वातावरण ढवळून काढले. एक लडकी को देखा तो (पार्श्वगायक कुमार शानू), प्यार हुआ चुपके से (कविता कृष्णमूर्ती), रिमझिम रिमझिम (कविता कृष्णमूर्ती व कुमार शानू), रुठ न जाना (कुमार शानू), कुछ ना कहो (कुमार शानू व कविता कृष्णमूर्ती), ये सफर (शिवानी चटर्जी) ही सगळीच गाणी कॅसेटपासून इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्सपर्यंत आणि वाद्यवृंदापासून पिकनिकमधील गाण्यांच्या भेंड्यांपर्यंत सगळीकडेच हिट. गाणी लोकप्रिय मग चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत मुलाखती देणे आहे हे फारसं करावे लागत नाही (त्या काळात आम्ही सिनेपत्रकार चित्रपट पाहून झाल्यावर मुलाखती करीत असू याचा चित्रपटाला फायदा होई). रस्तोरस्ती लागलेली या चित्रपटाची लहान मोठी पोस्टर, भव्य दिमाखदार होर्डींग्स हे सगळेच भव्य कलाकृतीचा फिल देत होती. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचवण्यात कल्पकता हवी याचे हे उत्तम उदाहरण. मुंबईतील मेन थिएटर मेट्रोवरील या चित्रपटाचे डेकोरेशन भारी होते. ते पाहण्यातही आनंद होता. त्याच आनंदात आम्ही चित्रपट समीक्षक फर्स्ट डे फर्स्ट शोला बाल्कनीत जाऊन बसलो. (आमच्यासाठी वेगळ्या शोचे आयोजन करण्यापेक्षा फर्स्ट शोच्या उत्साही रसिकांसोबत बसवण्यामागे काही हेतू नक्कीच असे…), पण जेवढा हाईप होता तेवढी उंची चित्रपट गाठू शकला नाही हे जाणवले. तांत्रिक मूल्ये अतिशय दर्जेदार म्हणून चित्रपट भावतो असे नाही. सोप्या शब्दात सांगायचे, तर अपेक्षा नक्कीच जास्त होत्या. काही आठवड्यातच चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करण्यात आल्याने थिएटरवरची गर्दी कायम राहिली. गाणी पाहण्यासाठी अनेकांनी हा चित्रपट पुन्हा पुन्हा एन्जॉय केला…
नरेनच्या भूमिकेसाठी आमिर खानला पहिल्यांदा विचारले. त्याने नाही म्हटल्यावर बॉबी देओलच्या नावाची बातमी चित्रपटसृष्टीच्या आतल्या वर्तुळात पसरली. अनिल कपूरने वजन कमी करतानाच केस छोटे केले. मनिषाकडून विधु विनोद चोप्राला अभिनय काढून वा करवून घ्यावा लागला. त्या दिवसात मनिषा कोईराला संजय लीला भन्साली दिग्दर्शित खामोशी द म्युझिकल, पार्थो घोष दिग्दर्शित अग्निसाक्षी, मणि रत्नम दिग्दर्शित बॉम्बे आणि दिलसे या चित्रपटांतील नाना प्रकारच्या भूमिकांतून विशेष फॉर्मात होती.
जॅकी श्रॉफ (शुभांकर पाठक), चांदनी (चंदा बिस्ट), अनुपम खेर (रघुवीर पाठक, रज्जोचे वडील), डॅनी डेन्झोपा (मेजर बिस्ट), प्राण (अबिद अली बेग), आशिष विद्यार्थी (आशुतोष पाठक), रघुवीर यादव (मुन्ना. नरेनचा ड्रायव्हर), सुषमा सेठ (गायत्री सिंग, नरेनची आई), मनोहर सिंग (दिवाण हरी प्रताप सिंग, नरेनचे पिता) यांच्याही या चित्रपटात भूमिका. हा चित्रपट चूीेीश चरश्रश्रळपसश या कन्नड भाषेतील चित्रपटावर आधारित. कथा कामना चंद्रा, शिवकुमार सुब्रमण्यम यांची, पटकथा शिवकुमार सुब्रमण्यम व विधु विनोद चोप्रा यांची, तर संवाद कामना चंद्रा यांचे. छायाचित्रण बिनोद प्रधानचे, तर संकलन रेणु सलुजाचे. वातावरण निर्मितीत चित्रपट सरस.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील हा एक क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. आणि गाण्यांमुळे तर आजही या चित्रपटाचं अस्तित्व, ओळख, लोकप्रियता कायम आहे. अनेक चित्रपट पडद्यावर येतात नि जातातही, काही कलाकृती विविध कारणास्तव आठवत राहतात. ती आठवण फार सुखकारक असते. 1942 अ लव्ह स्टोरी असाच. तीस वर्षांनंतरही तो आजचा चित्रपट वाटतोय तर मग आणखी काय हवे?

– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply