खोरा बंदरातील सुविधा उद्घाटनाविना; वाहने रस्त्यावर
मुरूड ः प्रतिनिधी
खोरा बंदरात नुकतेच एक कोटींचा खर्च करून 400 गाड्यांच्या क्षमतेच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे, मात्र काम पूर्ण होऊन दीड वर्ष झाले तरी अजून पार्किंगचा ठेका देण्यात आला नाही. परिणामी जागा असूनही पर्यटकांना आपल्या गाड्या रस्त्यावर लावाव्या लागत आहेत. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागून शासनाचा महसूलही बुडतो. या अक्षम्य दुर्लक्षामुळे शासन स्वतःचे नुकसान का करीत आहे? रविवारच्या सुटीत सकाळी शेकडो गाड्या पार्किंगअभावी परत गेल्या. या प्रकाराला जबाबदार कोण बंदर अधिकारी की पार्किंगचे काम घेतलेले ठेकेदार,
असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सलग सुट्यांमुळे महाराष्ट्रातील विविध भागातील पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहण्याला पसंती दिली. स्वतःची वाहने घेऊन बेसुमार गर्दी रविवारी जंजिरा किल्ला परिसरात पाहावयास मिळाली. राजपुरी येथे गाड्या पार्क करून जेट्टीवरून शिडांच्या होड्यांद्वारे पर्यटकांना किल्ल्याकडे नेले जाते. रविवारी सकाळपासूनच गर्दीस सुरुवात झाली. दुपारी 11-12 वाजता गर्दीचा ओघ वाढून लोकांना बोटीत बसण्यासाठी किमान एक दीड तास वाट पाहावी लागत होती.
प्रचंड गर्दीमुळे बोट वाहतुकीवर कमालीचा ताण पडला, परंतु सर्व प्रवाशांची सुखरूपपणे ने-आण केली जात होती. एका दिवसात असंख्य पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली. देश-विदेशासह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणांहून असंख्य पर्यटकही किल्ला तसेच मुरूड समुद्रकिनारी सुटी साजरी करण्यासाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, मुरूड तालुक्यातील काशिद बीच, दत्तमंदिर, गारंबी, जंजिरा किल्ला, ईदगाह हा परिसर आल्हाददायक, शांत आणि रमणीय आहे. मुंबईपासून 200 किमी आत असल्याने या स्थळाला पर्यटकांची पसंती वाढत आहे.