राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पाली स्थानकप्रमुखांना निवेदन
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात एसटी बस गाड्यांच्या फेर्या वाढवून वेळेत बदल करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सुधागड शाखेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच पाली बस स्थानक प्रमुखांना देण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना कार्यालयीन उपस्थितीबाबत आदेश पारित केले आहेत. तसेच 24 फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचार्यांची वेळही सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी करण्यात आली आहे.
सुधागड तालुक्यातील बहुतांश शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी बाहेरून गावावरून ये-जा करणारे आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांना प्रवासासाठी एसटी बसचाच मोठा आधार असतो. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेली एसटी बससेवा आजपर्यंत पुर्ववत झालेली नाही. त्यामुळे सदर कर्मचार्यांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. पाली एसटी स्थानकातून रोज सायंकाळी 6.15 वाजता खोपोली, पेण आणि रोहा या बस सुरू करण्यात याव्यात तसेच अन्य सुधागड तालुक्यातील अन्य गाड्यांच्या फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी या निवेदनाच्या शेवटी करण्यात आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सुधागड शाखेचे अध्यक्ष सचिन वाघ यांनी हे निवेदन पाली बस स्थानक प्रमुखांना दिले. या वेळी सरचिटणीस जाविद जमादार, वालेकर, जयराम राठोड यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.