पाऊस कमी झाल्यावर सुरू होणार काम
चौक ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील आरकसवाडी ते पिरकटवाडी, उंबरणेवाडीदरम्यान असलेल्या धावरी नदीवर पूल नसल्याने एका व्यक्तीची अंत्ययात्रा पाण्यातून घेऊन जावी लागल्याचे वृत्त समोर आले होते. हा पूल आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याने मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजनही झाले आहे, मात्र सातत्याने जाहीर होणार्या निवडणुकांची आचारसंहिता आणि सध्याच्या जोरदार पावसामुळे हे काम रखडल्याची वस्तुस्थिती आहे. पाऊस थांबल्यानंतर नदीपुलाचे काम सुरू होणार आहे.
मोरबे धरण बांधताना आठ महसुली गावे आणि सात आदिवासी वाड्यांच्या जागा संपादित करण्यात आल्या आहेत. या गावांतील व वाड्यांतील त्या वेळच्या खातेदारांना घर बांधणीसाठी प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील आरकसवाडी, पिरकटवाडी आणि उंबरणेवाडी यातील काही घरे पुनर्वसन ठिकाणी आली, तर काहींनी अद्याप जागा सोडल्या नाहीत. आरकसवाडी येथे आजारपणामुळे कमळी बाळू चौधरी (वय 60) यांचा मृत्यू झाल्याने त्यांची अंत्ययात्रा धावरी नदीच्या पात्रातून घेऊन जावी लागली. याच ठिकाणी 70 हेक्टर दळी प्लॉट शेती करून उपजीविकेसाठी पुनर्वसनापूर्वीच देण्यात आला असल्याने तिथे रहाणारे लोक नाचणी, वरी यांच्या पिकाबरोबर भाजीपाला करतात. जवळच माथेरान असल्याने डोंगर चढून कोंबड्या, शेळी, अंडी, दूध यांचा व्यवसाय कायमस्वरूपी मिळत असल्याने हे लोक जागा सोडण्यास तयार नाहीत. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनीही वन हक्क दावा रस्त्यासाठी व या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून या भागाचा पायी दौरा करून पाहणी केली होती. वस्तुस्थिती लक्षात घेऊन अत्यंत गरजेचा असलेल्या साकवाचे काम मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि वनखात्याला जागेसाठी प्रस्ताव सादर केला. जिल्हा परिषद स्वउत्पन्न, जिल्हा परिषद, पंचायत समिती अनुदान, केंद्र व राज्य सरकार योजना, म्हाडा किंवा कोणत्याही योजनेतून काम झाले नाही, अगर घेतले नाही याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून घेतल्यावर लोधिवली ग्रामपंचायत अंतर्गत आरकसवाडी, उंबरणेवाडी, पिरकटवाडी साकव मंजुरीसाठी जिल्हा वार्षिक योजना साकव बांधकाम अंतर्गत प्रस्ताव सादर केला गेला. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयाकडून मान्यता मिळाली. त्यानुसार 48.20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार महेश बालदी यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण काळबागे यांनी देऊन या दुर्गम भागात अन्य कुणीही लोकप्रतिनिधी फिरकला नाही. आमदार महेश बालदी यांनी पायी प्रवास करून माहिती घेतल्यावर येथील वन विभागाची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले असून आचारसंहिता लागल्याने काम होऊ शकले नाही, असे सांगितले. पाऊस कमी झाल्यावर या विभागांतील मंजूर झालेली सर्वच आदिवासी जनतेच्या कामांना सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.
आदिवासी नेते अंकुश वाघ यांनीही आमदार महेश बालदी यांनी या पुलाच्या कामासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले, तर आदिवासी भागात सतत विकासासाठी प्रयत्न करणारे प्रदीप गोंधळी यांनी आपण स्वतः आमदार महेश बालदी यांच्यासोबत फिरून त्यांना समस्या दाखविल्या असून हा पहिलाच आमदार या भागात आल्याचे सांगितले.
लोकसभेची आणि त्याला लागूनच कोकण विधान परिषदेची आचारसंहिता लागल्याने पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही. हा भाग अतिशय दुर्गम असून रस्ता नसल्याने बांधकाम साहित्य घेऊन जाणे शक्य नाही. आचारसंहिता संपल्यावर कामाला सुरुवात होत असताना पोकलन घेऊन जाताना पावसाची सुरुवात झाली आणि पावसात तिथे साहित्य घेऊन जाणे शक्य नाही. पाऊस कमी झाल्यावर कामाला सुरुवात करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता सुदर्शन आगलवे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.