सिनेमा नव्हे दिमाखदार लग्न सोहळा
ठहरो…! यह शादी नही होगी!!
नायक-नायिकेचा लग्न सोहळा सुरू असतानाच कोणीतरी असे मोठ्याने ओरडतो आणि चक्क लग्न सोहळा थांबतो,
फार पूर्वीच्या हिंदी चित्रपटातील हा जणू हुकमी प्रसंग अथवा नायक- नायिकेचे लग्न होते आणि पिक्चर संपतो हे जणू ठरलेले. अधूनमधून नायक अथवा नायिकेला लग्नाचा वेगळा निर्णय घ्यावा लागे इतकेच (बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ‘गुमराह’मध्ये तेच तर होते आणि याच चित्रपटातील कथा कल्पनेत काही फेरफार केलेला यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ही तसाच, नायिकेस लग्नाची वेगळी वाट धरायला लावणारा). यात फरक पडणे आवश्यक होतेच. तो अचानक पडला. असं काही अनपेक्षित होणे आवश्यक असतेच.
ते घडले राजश्री प्रॉडक्सन्सच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ’हम आपके है कौन’ (प्रदर्शन 5 ऑगस्ट 1994) या चित्रपटाने! या चित्रपटाने असे काही घडले/घडवले की त्याचे सुपरिणाम आजही दिसताहेत. आता उच्चभ्रू आणि श्रीमंत खानदानातील लग्न म्हणजे मेगा इव्हेन्टस झालाय, उपग्रह वृत्तवाहिनीवर त्याचे लाईव्ह कव्हरेज असते. रूपेरी पडद्यावर जे पेरले ते असे उगवलंय.
याच ’हम आपके….’ला चक्क तीस वर्षे कधी बरे पूर्ण झाली हे समजलेच नाही. हीच तर यशस्वी चित्रपटाची गंमत असते. ते पडद्यावरून उतरले तरी कधी लोकप्रिय गाण्यांमुळे, तर कधी टाळीबाज जोरदार दमदार संवादाने, तर कधी एकाद्या खमंग गॉसिप्सने सतत डोळ्यासमोर असतात. विशेष म्हणजे ज्या लिबर्टी चित्रपटगृहात या चित्रपटाने खणखणीत शंभरपेक्षा जास्त आठवडे यशस्वी मुक्काम केला, त्याच लिबर्टीत हा या चित्रपटाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचा ग्लॅमरस सोहळा तशाच झगमगाटात साजरा झाला. अगदी सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, मोहनीश बहेल (हा आपली पत्नी एकतासोबत), दिग्दर्शक सूरजकुमार बडजात्या, संगीतकार राम लक्ष्मण असे सगळेच या विशेष खेळास हजर होते. त्या चित्रपटाबाबत त्यांच्या व या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक लहान मोठा कलाकार, तंत्रज्ञ तर झालेच, पण रसिकांच्याही आठवणी खूप. अर्थात हे सगळेच प्रचंड उत्साहात होते. अशा प्रकारचा इव्हेन्टस ही आजच्या चित्रपटसृष्टीतील दुर्मिळ गोष्ट, म्हणूनच महत्त्वाची. जॉन मॅथ्यूज मथान दिग्दर्शित सरफरोश (मुंबईत रिलीज 30 एप्रिल 1999)ला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तच्या जुहूच्या एका मल्टीप्लेक्समधील इव्हेन्टस मी अनुभवला. असे अनेक चित्रपटांच्या पंचवीशी/पन्नाशीचे इव्हेन्टस व्हायला हवेत. तेवढीच फ्लॅशबॅकमध्ये जाण्याची संधी.
पूर्वी अशा पद्धतीने लोकप्रिय चित्रपट तब्बल शंभर आठवड्याचे यश संपादत ही आजच्या पिढीसाठी कुतूहल निर्माण करणारी गोष्ट. आणि एक महत्त्वाचे, पूर्वी चित्रपटाच्या गुणवत्तेवर चौफेर आणि खोलवर लिहिले जाई, गुण दोषांचे मूल्यमापन होई. आज चित्रपट रिलीज होतोच तोच त्याने किती कोटीची कमाई केली याच्या ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्यात. अशा परिस्थितीत ‘हम आपके है कौन ’सारख्या चित्रपटाचा त्या काळात कसा सामाजिक/सांस्कृतिक/माध्यम क्षेत्रावर प्रभाव होता याची आठवण करून देण्याची संधी महत्त्वाची आहे.
’हम आपके है कौन’ म्हणजे, सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक/वैवाहिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा. हा फक्त चित्रपट नव्हे, तर अनेक पद्धतीने समाज ढवळून काढणारी सकारात्मक, उत्स्फूर्त गोष्ट, शानदार सोहळा आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासावर फोकस टाकताना रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ (प्रदर्शन 15 ऑगस्ट 1975) पूर्वीचा आणि नंतरचा चित्रपट असा विचार होतो अथवा तसाच तो करावा लागतो (या मताशी चित्रपट अभ्यासक/विश्लेषक नक्कीच सहमत होतील. जनसामान्यांपर्यंत पोहचलेल्या चित्रपटाचा अभ्यास तसा अवघड, कारण ते चित्रपट लोगों के दिल मे कायमच आठवणीच्या व्याजासह असतात) आणि त्यानंतरचा महत्त्वाचा चित्रपट ’हम आपके है कौन’ (प्रदर्शन 5 ऑगस्ट 1994). याच्यापासून हिंदी चित्रपटात चकचकीतपणा आलाय, चित्रपटगृह संस्कृतीत बदल होत गेला. त्यानंतर काही वर्षातच मल्टीप्लेक्स युग अवतरले आणि मग ते स्थिरावलेही. आता आपण ओटीटीपर्यंत येऊन पोहचलोय. ‘तरी हम आपके…’ची जादू कायम.
‘हम आपके….’ला यशस्वी वाटचालीला खणखणीत तीस वर्षे पूर्ण झाली असली तरी तो अनेक बाबतीत आजही आजच्या काळाचा चित्रपट आहे आणि हे या चित्रपटाचे खूपच मोठे यश आहे. जुने दिवस आठवले की… असे जे म्हणतात ते या चित्रपटालाही लागू आहे. आज एखाद्या उपग्रह वाहिनीवर तो अथवा त्यातले दीदी तेरा देवर दीवाना गाणे पुन्हा पुन्हा पाहताना त्याचा आस्वाद अथवा गोडी जराही कमी होत नाही. यालाच सर्वकालीन तजेलदार कलाकृती म्हणतात आणि ‘हम आपके…’लाही त्याचे श्रेय जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया (1957), के. असिफ दिग्दर्शित ’मुगल ए आझम’ (1960), सतराम रोहरा दिग्दर्शित ’जय संतोषी मा’ (रिलीज 30 एप्रिल 1975) आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ (प्रदर्शन 15 ऑगस्ट 1975) यांच्याप्रमाणे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचलेला आणि समाजातील सर्वच स्तरांवर चर्चा झालेला असा ’हम आपके है कौन’ आहे. हे चित्रपट न पाहिलेले चित्रपट रसिक सापडणे अशक्यच आहे आणि हेच या चित्रपटांचे मोठे यश आहे. काही चित्रपट हे न पाहिलेला माणूस हा एक वेगळाच शोध ठरावा.
’मैने प्यार किया’ (1989)च्या यशानंतर कसलीही घाई न करता अतिशय शांतपणे आणि भरपूर पूर्वतयारी करून सूरजकुमार बडजात्याने ’हम आपके… ’च्या निर्मितीची तयारी करेपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. सलमान खान आणि माधुरी दीक्षित ’स्टार’ झाले होते. राजश्री प्रॉडक्सन्सच्या ’अबोध’ (1984)व्दारे माधुरी चित्रपटसृष्टीत आल्याची तिने जाणीव ठेवून या चित्रपटाला होकार दिला तर ’मैने प्यार किया’च्या यशाने आपण ’स्टार’ झाल्याने सलमानचा होकार होता. दोघेही आजही स्टार आहेत. राजश्री प्रॉडक्सन्स कायमच कौटुंबिक वातावरणात चित्रपट निर्मिती करीत आल्याने त्यांना अशा पध्दतीने अनेक कलाकार जोडले गेले. ’हम आपके…’ सेटवर जाईपर्यंत आपल्या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे आले. उपग्रह वाहिनीच्या आगमनाने ’घरात चोवीस तास माहिती आणि मनोरंजनाचे पेव’ फुटले. त्यातून आपली शहरी जीवनशैली बदलायला सुरुवात झाली होती. एखाद्या कलाकृतीचे मूल्यमापन करताना तत्कालिक सामाजिक, सांस्कृतिक स्थितीचाही विचार करणे आवश्यक आहे. या चित्रपटाचे प्रामुख्याने मेहबूब स्टुडिओ आणि फिल्मीस्थान स्टुडिओत दीर्घकालीन शूटिंग सत्र सुरू असताना आम्हा सिनेपत्रकाराना मात्र सेटवर प्रवेश नव्हता. त्या काळात मुंबईतील कोणत्याही चित्रपट स्टुडिओत नवीन चित्रपटाचा मुहूर्त अथवा शूटिंग कव्हरेज वा एखाद्या स्टारच्या मुलाखतीसाठी गेल्यावर तेथे आणखी कोणाचे शूटिंग चाललंय, कोणी कलाकार भेटता येईल का हे जाणून घेण्याची सवयच होती आणि त्यातून काही साध्य होईदेखील, पण ‘हम आपके…’साठी दरवाजे बंद असल्याने ’असं काय बरे चित्रीत होतेय’ याचे विलक्षण कुतूहल होते. इतर वेळी वा इतर चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी तर झालेच, पण आपले रिमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण यांजकडून या चित्रपटाबाबत काही गोष्टी समजल्याने आणखी उत्सुकता वाढे. त्या काळात कलाकार अतिशय मोकळेपणाने आम्हा सिनेपत्रकारांशी बोलत. याचं कारण आम्ही त्यांचे काम पाहिलेले असे.
त्या काळात आपला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला की राजश्री प्रॉडक्सन्सच्या वतीने त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या मीडिया भेटीगाठीसाठी टी पार्टीचे आयोजन केले जाई. त्यामुळे नवीन कलाकारांशी भेटीगाठी होत. ही प्रथा यावेळी टाळून सलमान व माधुरीचे विविध स्टाईलचे आकर्षक दिलखेचक फोटो सुरुवातीला मीडियाला मोठ्या प्रमाणात दिले गेले. आणि असा एक नवीन ट्रेन्ड सुरू झाला. काही दिवसांनी चित्रपटातील फोटो दिले गेले. गाणी प्रकाशित झाली. हळूहळू ती लोकप्रिय झाली. त्याची एकूण संख्या चौदा आहे हे मात्र कुतूहल वाढवणारे होते. या सगळ्यात ’मुलाखतीचा कसलाच मारा’ नव्हता. आपला हा चित्रपटच काय ते बोलले यावर त्यांचा विश्वास आहे हे लक्षात येत गेले. ही रणनीती योग्य होती आणि ती फळलीदेखील.
हा चित्रपट प्रत्येक शहरातील फक्त आणि फक्त एकाच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार हे कुतूहल वाढवणारे होते (मुंबईत लिबर्टी चित्रपटगृह), पण राजश्री प्रॉडक्सन्सच्या वितरण विभागाकडून अशा व्यावसायिक खेळी यशस्वी होत. त्यांनी ’गीत गाता चल’ (1976) असाच मुंबईत फक्त मेट्रो या एकमेव चित्रपटगृहात रिलीज केला आणि यशस्वी ठरल्यावर दहा आठवड्यानंतर प्रिंटची संख्या वाढवली (सचिन पिळगावकर ही आठवण जपून आहे. त्याचा नायक म्हणून हा पहिलाच चित्रपट). ‘हम आपके…’चा आम्हा समिक्षकांसाठी स्वतंत्र शो न करता लिबर्टीच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे महागडे तिकीट दिले. या चित्रपटासाठी अप्पर स्टॉल 75 रुपये, बाल्कनी 100, तर ड्रेस सर्कल 120 रुपये तिकीट दर पाहून हबकलो. हिंदी चित्रपट आता गरीबांची करमणूक राहणार नाही या सामाजिक, सांस्कृतिक बदलाची ही सुरुवात होती. लिबर्टी थिएटरवर उच्चभ्रू आणि नवश्रीमंत वर्गाची गर्दी होती. थिएटरमध्ये चित्रपटातील अनेक गोष्टींच्या प्रतिकृती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. वातावरणात फिल गुड होता. आपला हा चित्रपट सुपर हिट होणारच याची जणू राजश्री प्रॉडक्सन्सला खात्री होती. चित्रपटातील गीत संगीत व नृत्याची भव्य मेजवानीत रसिक गुंतलेत याची कल्पना येत असतानाच ’दीदी तेरा देवर दीवाना…’ गाण्याला पडद्याभोवती दिमाखदार रोषणाई झाली आणि वातावरणात आणखी उत्साह आला. हा चित्रपट अनुभवणे म्हणजे एक प्रकारचा फेस्टीवलच होता. विशेष उल्लेखनीय आठवण, आम्ही चित्रपट समिक्षकांनी दोन मध्यंतरचा ‘हम आपके…’ एन्जॉय केला. चित्रपट पहायला जाईपर्यंत याची काहीच कल्पना नव्हती आणि राजश्री प्रॉडक्सन्सच्या वतीनेही त्याची न्यूज केली नाही. पहिल्याच शोपासूनच हायफाय रसिकांचा हाऊसफुल्ल गर्दीचा प्रतिसाद पाहतानाच चित्रपटाची लांबी जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यातील थोडासा भाग कापून तो एका मध्यंतरचा करण्यात आला…
हा चित्रपट म्हणजे, पडद्यावरच्या कौटुंबिक सोहळ्यात आपण प्रेक्षकांनीही मनसोक्त मनमुराद आनंद घेत रमून जायचे हेच आहे, हे मला एकूणच या अनुभवातून लक्षात आले आणि मग हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरत ट्रेन्ड सेटरही ठरला.
चित्रपट विश्लेषक म्हणून माझे असे मत होते, पण समिक्षक म्हणून ’हा चित्रपट म्हणजे पडद्यावरचे छायागीत तर नाही?’ असा प्रश्न पडला. काही समिक्षकांनी या चित्रपटाला ’लग्नाची व्हीडीओ कॅसेट’ म्हटले, पण प्रेक्षकांनी मात्र हा चित्रपट प्रचंड उचलला आणि मग एकेका गोष्टीची चर्चा रंगली. त्या काळात नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट चोरट्या मार्गाने व्हिडीओवर येई, ही चोरी टाळण्यासाठी असा एकाच थिएटरमध्ये सिनेमा रिलीज केला. राजश्री प्रॉडक्सन्सकडून रात्रीचा खेळ संपल्यावर चित्रपटाची प्रिंट ताब्यात घेतरी जाई आणि दुसर्या दिवशी दुपारी घेऊन येई. ही आयडिया त्यांना निर्माता, दिग्दर्शक आणि वितरक विजय कोंडके यांनी दिली. त्यांनी ’माहेरची साडी’ (1991)च्या वेळेस अशीच काळजी घेतली होती. ‘हम आपके…’ने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आणि मग त्याच्या थिएटरमध्ये वाढ करण्यात आली. खुद्द लिबर्टी थिएटरमध्ये चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी आठवडा गाठला. खरंतर राजश्री प्रॉडक्सन्सच्याच गोविंद मुनिस दिग्दर्शित ’नदिया के पार’ (1982) या चित्रपटाची ही चकाचक शहरी रिमेक होती. मूळ चित्रपट ग्रामीण होता. सचिन पिळगावकर आणि साधना सिंगची प्रमुख भूमिका होती. हिंदी व भोजपुरी भाषेच्या मिश्रणातून रंगलेल्या या चित्रपटाने उत्तर भारतातील छोट्या शहरात घवघवीतपणे यश मिळवले. त्याचा रिमेक करताना ‘हम आपके…’मध्ये गाण्यांची संख्या वाढवली. सगळ्या व्यक्तिरेखा एक प्रकारे गीत संगीताच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात. संगीत नाटकासारखा हा काहीसा संगीत चित्रपट होता. हा तसा धाडसी प्रयोग होता. पण रसिकांना पसंत पडला.
चित्रकार एम.एफ. हुसेन यांनी ’हम आपके…’ तब्बल चाळीस वेळा पाहिला आणि माधुरी दीक्षित ओपन बॅक चोलीमध्ये नखखिशांत सेक्सी दिसते असे एका मुलाखतीत म्हटले आणि ही गोष्ट अशी काही गाजली की चित्रपट पुन्हा चर्चेत राहिला. त्यांना ’माधुरी फिदा हुसेन’ असे म्हटले जाऊ लागले.
या चित्रपटाची क्रेझ आता समाजात दिसू लागली. अनेक लग्न सोहळ्यात नवरा मुलाची चप्पल लपवायचा हुकमी क्षण आला. लग्नाचे बजेट वाढले. गीत संगीत व नृत्य रूजले. आपलेही लग्न ’हम आपके…’सारखा इव्हेन्टस असावा अशी सामाजिक मानसिकता वाढली. एक लोकप्रिय चित्रपट समाजात असा मुरत गेला तसेच युवतींमध्ये ओपन बॅक चोलीची आवड निर्माण झाली. मध्यमवर्गीय कुटुंबातील युवतींनीही हळूहळू आपली भिड चेपली. भारतीय संस्कृतीत लग्न हा महत्वाचा घटक, पण ‘हम आपके…’पासून त्याला ग्लॅमर आले. सगळ्या लग्नात दीदी तेरा देवर… गाणे मस्ट झाले. आता या चित्रपटाची वेगळी दखल घेतली जाऊ लागली.
‘हम आपके…’ विदेशात मोठ्या प्रमाणात रिलीज झालेला पहिला चित्रपट होय. विदेशात राहणारा अनिवासी भारतीयांना हा चित्रपट रूचला. त्यात त्यांना आपली लग्न संस्कृती दिसली.
चित्रपट सुपर हिट झाल्यावर मात्र माधुरीपासून संगीतकार राम लक्ष्मणपर्यंत सगळे मुलाखती देऊ लागले. ‘हम आपके…’च्या यशाने माधुरीचे नंबर वनचे स्थान भक्कम झाले. याच भूमिकेसाठी तिला फिल्म फेअर अवॉर्डस मिळाले. या सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय केलेल्या (राजश्री प्रॉडक्सन्सच्या चित्रपटांचे ते दीर्घकालीन खास वैशिष्ट्य) चित्रपटाची हसत खेळत नाचत रंगलेली आणि अगदी अखेरीस नाट्य निर्माण झालेली गोष्ट तुम्हाला माहीत असल्याने येथे पुन्हा सांगायची गरज नाही. खुद्द त्यातील कलाकारांना मात्र तेव्हाच्या शूटिंगच्या वेळचे अनुभव/आठवणी/किस्से आजही अगदी जसेच्या तसे आठवतात. हे सगळेच त्यांना कालपरवाच घडलयं असे वाटते हेदेखील या चित्रपटाचे यश आहे… यशस्वी चित्रपटाची हीच तर गंमत असते, ते कधीच कालबाह्य होत नाहीत.
’हम आपके…’च्या बाबतीत तर असे आहे की आज उद्योगपती घराणे, स्टार क्रिकेटपटू, सेलिब्रिटीज कलाकार यांच्या प्रचंड श्रीमंतीचे लाईव्ह दर्शन घडवणारी लग्ने म्हणजे याच ‘हम आपके…’ने जे खोलवर रुजवले त्याचे गोडधोड फळ आहे. ते पाहतानाच ‘हम आपके…’ आठवतो, तर मग आणखी काय हवे?
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक