नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएल पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक झाले आहेत. यंदाच्या या स्पर्धेत सलामीचा सामना कोणत्या संघांमध्ये रंगणार याचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. आयपीएलचे वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले नसले तरी ते व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होणार असून, त्यानंतर त्यांना यूएईला पाठविण्यात येणार आहे. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. दुबई, आबुधाबी आणि शारजा या तीन ठिकाणी आयपीएलचे सामने खेळविण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी करून विजेतेपद पटकाविले होते. त्यामुळे यंदा पहिला सामना खेळण्याचा मान त्यांचाच असेल. सलामीचा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होईल, असे म्हटले जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वाजता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही, पण सोशल मीडियावर हे वेळापत्रक चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे वेळापत्रक खरे की खोटे हे बीसीसीआयने अधिकृतरीत्या वेळापत्रक जाहीर केल्यावरच कळू शकणार आहे.