Breaking News

ताल से ताल मिला..; 25 वर्षांनंतरही दिल ये बैचेन वे

गीत, संगीत व नृत्य आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीची जान. अथवा आत्मा आणि आपल्या देशातील जवळपास सर्वच जाती धर्म पंथातील अनेक सणांतील महत्त्वाचा घटक. एक संस्कृतीच! लग्नातही नाचकाम आणि काही समाजात अंत्ययात्रेतही वादन.
गीत, संगीत व नृत्याने भरलेल्या नि भारलेल्या समाजाला अनेक चित्रपट त्यातील गाण्यांमुळे पटकन डोळ्यासमोर येतातच. त्यातील काही चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी सर्वकालीन लोकप्रिय. (असं आजच्या मुव्हीजबद्दल आपण बोलू शकत नाही हो. पडद्यावरचा चित्रपट संपतो आणि अनेकदा तरी त्यातील गाणी विसरली जातात.)
मुक्ता आर्ट्स निर्मित व सुभाष घई दिग्दर्शित ताल (मुंबईत रिलीज 13 ऑगस्ट 1999)मधील अशीच सर्वच्या सर्व गाणी आजही चित्रपटाला पंचवीस वर्ष होऊनही लोकप्रिय. संगीतकार ए.आर. रेहमानचे संगीत असलेले मणि रत्नम दिग्दर्शित रोजा (1992)सारखे मूळ तमिळ भाषेतील चित्रपट हिंदीत डब झाल्याने आपल्यापर्यंत पोहचले. मणि रत्नम दिग्दर्शित बॉम्बे (1995)देखील मूळ तमिळ भाषेतील चित्रपट. ए.आर. रेहमानने हिंदी चित्रपटाला संगीत दिलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट ताल. हा हिंदीत निर्माण होऊन मग तमिळमध्ये डब करण्यात आला.
सुभाष घई हा चित्रपट संगीताचा उत्तम कान व दृष्टी असलेला दिग्दर्शक. आठवा कर्ज, कर्मा, राम लखन वगैरे त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गीत संगीत व नृत्य. त्याच्या या गुणांवर काहीसा मनोजकुमारचा प्रभाव जाणवतो, माझे हे मत काहींना पटेल अथवा नाहीदेखील. ’कर्ज’, ’हीरो’, ’कर्मा’, ’खलनायक’ या चित्रपटातील गाणी एन्जॉय करताना कुठे तरी मनोजकुमार शैली जाणवते…
ताल हा सुभाष घई दिग्दर्शित चित्रपट असला तरी तो पहावासा, ऐकावासा, आठवावासा वाटतो तो ए.आर. रेहमानसाठीच. एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर संगीतकार मात करू शकतो? याचे उत्तर होय असेच द्यायला हवे. (आणखीही असे अनेक चित्रपट आहेत.) पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटात सुभाष घईची आपली एक शैली, आपले स्वतंत्र स्थान, आपलं एक व्हीजन. परदेस या चित्रपटाच्या वांद्य्राच्या पाली हिलवरील आनंद रेकॉर्डिंग स्टुडिओतील मिक्सिंगच्या वेळेस मुलाखतीचा योग आला असता अतिशय फोकस्ड दृष्टिकोनातून आपलं एकेक मत मांडण्याची, आपल्या फ्लॅशबॅकमध्ये जात रंगवून खुलवून एखादी गोष्ट सांगणे ही त्याची पद्धत मला आवडली, पण त्याचा ‘परदेस’नंतर प्रभाव ओसरला. ‘ताल’मध्ये सुभाष घई टच दिसला नाही. त्यानंतर त्याचा ’उतरता प्रवास’ दिसतोय. इंग्लिश मीडियाने त्याला फारच लवकर राज कपूरनंतरचा शो मन म्हटलं (त्या कौतुकाशी राज कपूरच्या दिग्दर्शनाचे चाहते आजही सहमत नाहीत).
‘ताल’ची जान आनंद बक्षी यांची गीते व ए.आर. रेहमानचे संगीत यात आहे. सुभाष घईने ‘ताल’साठी रेहमानची निवड कशी केली याचाही एक किस्सा आहे. आपल्या ‘खलनायक’च्या शूटिंगसाठी बंगळुरू विमानतळावरून हॉटेलमध्ये जात असताना गाडीत ‘रोजा’चे लागलेले गाणे ऐकून सुभाष घईने अतिशय कुतूहल म्हणून ड्रायव्हरला विचारले या गाण्याचा संगीतकार कोण? उत्तर ऐकताच सुभाष घईने ठरवले आपण आपल्या एका चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी रेहमानकडे सोपवायची…
रेहमानच्या मते, ‘ताल’च्या संगीताने त्याला उत्तर भारतातील चित्रपट संगीत शौकीनांपर्यंत नेले (एक चित्रपट काय काय घडवत असतो आणि त्यातील प्रत्येक जण त्याकडे भिन्न दृष्टिकोनातून पाहतो हेच यातून अधोरेखित होतेय.)
रेहमान शक्यतो रात्रीच्या शांततेत आपली गाणी ध्वनिमुद्रित करतो. एखाद्या कलावंताचे हे वेगळेपण आणि चेन्नईत (पूर्वीचे मद्रास) ते करण्यास प्राधान्य देतो. इश्क बिना (पार्श्वगायक अनुराधा श्रीराम, सुजाता मोहन, रेहमान आणि सोनु निगम), इश्क बिना इश्क बिना (कविता कृष्णमूर्ती व सुखविंदर सिंग), कहीं आग लग जाऐ (आशा भोसले, रिचा शर्मा व आदित्य नारायण), करिये ना (सुखविंदर सिंग व अलका याज्ञिक), क्या देख रहे हो तुम (वैशाली सामंत व शोमा), नहीं सामने तू (रिचा शर्मा व सुखविंदर सिंग), रमता जोगी (सुखविंदर सिंग व अलका याज्ञिक), ताल से ताल मिला (सुखविंदर सिंग, अलका याज्ञिक व उदीत नारायण) ही ताल ची सगळीच गाणी सुपर हिट. या गाण्यांचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरणही देखणे. रमता जोगी या गाण्याचे गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत शूटिंग असतानाच मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना सेटवर शूटिंग रिपोर्टिंगसाठी बोलावले असता काही विशेष गोष्टी दिसल्या. शामक दावरच्या नृत्य शाळेतील विद्यार्थी अनिल कपूर व ऐश्वर्य रॉयच्या सभोवार नृत्य सादर करत होते आणि त्यात एक होता शाहिद कपूर. (यू ट्यूबवर हे गाणे पाहताना तुमच्या हे नक्कीच लक्षात येईल. तोपर्यंत तो कोण आहे याला काहीच ओळख नव्हती). काही वर्षातच तुझे मेरी कसम (2004) या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुखच्या मुलाखतीचा योग आला असता तो मला म्हणाला, ‘ताल’च्या फिल्मीस्थान स्टुडिओतील शेड्युलला मी सुभाष घईकडे सर्वात तळाचा सहाय्यक दिग्दर्शक होतो…
एक चित्रपट आणि त्यात किती गोष्टी. ‘ताल’चे कथालेखन सुभाष घईचे. पटकथालेखन सचिन भौमिक व सुभाष घईचे. संवाद जावेद सिद्दीकीचे, तर संकलनही सुभाष घईचे.
उद्योगपती जगमोहन मेहता (अमरीश पुरी) एका जागेच्या खरेदीसाठी एका गावात गेले असता त्यांचा मुलगा मानव (अक्षय खन्ना) याची नजर पावसात चिंब चिंब भिजून गीत संगीत व नृत्यात रमलेल्या मानसी शंकर (ऐश्वर्य रॉय) हिच्यावर पडते. त्याला ती आवडते… पुढे अनेक वळणे घेत घेत चित्रपट पुढे सरकतो आणि त्यात मानसीच्या आयुष्यात विक्रम कपूर (अनिल कपूर) येतो. प्रेम त्रिकोणाची थीम आपल्यासमोर येते.
ऐश्वर्य रॉयसाठी हा चित्रपट खूपच महत्त्वाचा. विश्व सुंदरीचा मुकुट पटकवणारी ऐश्वर्य काय नि सुश्मिता सेन काय (आणि नंतरच्या सेलिना जेटली, लारा दत्तादेखील आल्याच) या तर प्लॅस्टिकच्या बाहुल्या, यांना अभिनय तो काय येणार नि समजणार असा एक तद्दन फिल्मी समज. तो मोडायचा तर तशी दिग्दर्शकांनी चांगलीच संधी द्यायला हवी. ऐश्वर्याला ती संजय लीला भन्साली दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम (मुंबईत रिलीज 18 जून 1999) आणि सुभाष घई दिग्दर्शित ताल या चित्रपटात मिळाली. तिने जणू कात टाकली आणि अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख मिळवली. ‘ताल’ म्हणूनही महत्त्वाचा. छायाचित्रणकार कबीर लालने ऐश्वर्य रॉयचं अद्भूत सौंदर्य, तिची मोहकता, प्रसंगानुरूप मादकता आणि तिने साकारलेला अभिनय हे छान पडद्यावर दाखवले.
मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांसाठी स्वतंत्र खेळाचे आयोजन न करता मेन थिएटर मेट्रोत फर्स्ट डे फर्स्ट शोचे बाल्कनीचे तिकीट दिले. आमच्या आजूबाजूचा रसिक प्रेक्षक मला तरी ताल पाहताना फार उत्साही दिसला नाही, कारण चित्रपटच यथातथाच. म्हणून तर यशाला मर्यादा पडल्या. त्यात जान होती ती ए.आर. रेहमानच्या जबरदस्त परफॉर्मन्समध्ये. पाश्चात्य मेलडी, पॉप संगीत व भारतीय लोकसंगीत यांचे फ्युजन त्याने अप्रतिम केले.
मास्टरपीस अल्बम म्हणून ‘ताल’ ओळखला जातोय… ताल म्हणजे संगीत, संगीत म्हणजे ताल असे आपले म्हणणे ए. आर. रेहमानने कृतीतून दाखवून दिले. नही सामने तू हे आनंद बक्षी यांचे गाणे तसे एकदम साधेच, पण रेहमानने त्याचं जणू सोने केले. सत्तर व ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपट संगीतालाच पुन्हा साकारणे रेहमानला मंजूर नव्हतेच. त्याला असलेले बदलत्या काळाचे भान त्याने
कृतीतून घडवले.
ए.आर. रेहमानच्या हिंदी चित्रपटांच्या संगीताचा खूपच मोठा चाहतावर्ग आहे. त्यात त्याचे सर्वोत्कृष्ट पाच हिंदी चित्रपट सांगायचे तर, रामगोपाल वर्मा दिग्दर्शित रंगीला (1995), मणि रत्नम दिग्दर्शित दिलसे (1998), सुभाष घई दिग्दर्शित ताल (1999), आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान (2001) आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित स्वदेस (2004) हे चित्रपट.
ताल तर ए.आर. रेहमानसाठीच आठवणीत. विक्रम कपूरच्या भूमिकेसाठी गोविंदाची निवड नक्की झाल्यावर त्यालाच साक्षात्कार झाला की या चित्रपटात अक्षय खन्ना हीरो असून आपण जर ही भूमिका साकारली तर चित्रपटसृष्टीत आरडाओरड होईल की आपण सेकंड हिरोची भूमिका साकारू लागलोय आणि मग अशाच दुय्यम भूमिका आपल्या वाटेला येतील. त्याने पळ काढताच अनिल कपूर सुभाष घईच्या मदतीला धावला. व्यावसायिकता म्हणजे काय हे अनिल कपूरकडून शिकावे.
‘ताल’च्या आठवणी या अशा अनेक. पिक्चरला पंचवीस वर्ष पूर्ण झालीदेखील तरी त्याच्या गाण्याचा गोडवा क्या कहने? इश्क बिना क्या जिना यारों…

-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply