Breaking News

कुपोषित मुलीला अधिकार्याकडून मदत

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

कर्जत तालुक्यातील अरवंद येथील रुक्मिणी शिवराम पवार या अतितीव्र कुपोषित श्रेणीतील चार वर्षीय आदिवासी मुलीच्या मदतीला एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी सरसावले असून, राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे औचित्य साधत रुक्मिणीसह तिच्या आई व इतर भावंडांना नवीन कपडे, व महिनाभर पुरेल एवढे धान्य प्रत्यक्ष घरी जाऊन देण्यात आले.

कर्जत हा कुपोषण संख्या जास्त असलेला तालुका आहे. शासनाकडून कुपोषण कमी करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबर महिना देशभर राष्ट्रीय पोषण माह म्हणून शासन स्तरावर साजरा केला आहे. त्या अनुषंगाने कर्जत येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प-1चे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांनी अरवंद येथील अंगणवाडीमधील रूक्मिणी शिवराम पवार या अतितीव्र (सॅम) श्रेणीतील कुपोषित मुलीला दत्तक घेतले असून, या मुलीला साधारण श्रेणीत आणेपर्यंत शक्य तितकी वैयक्तिक स्वरूपात मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. विधवा आणि अपंग आई, विधवा आजी व तीन भावंडे, स्वत:चे पक्के घर नाही, आधार कार्ड व जातीचा दाखला नसल्यामुळे इतर शासकीय योजनांचा लाभ नाही. अशातच कोरोना महामारीत रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या रुक्मिणी व तिच्या कुटुंबीयांना पालकर यांनी महिनाभर पुरेल एवढे धान्य व नवीन कपड्यांची मदत प्रत्यक्ष वाडीवर जाऊन दिली. पालकर यांच्या मदतीने रूक्मिणी व तिच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे. यापूर्वी पालकर यांनी मूळगाव येथील दहावीत शिकणार्‍या मधुमेहग्रस्त विद्यार्थिनीला औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली होती.

राष्ट्रीय पोषण माहचे औचित्य साधून रुक्मिणी या कुपोषित मुलीला दत्तक घेतले असून, यापुढेही तिला नियमितपणे वैयक्तिक स्वरूपात मदत करणार आहे. तसेच शासनाच्या इतर योजनांचाही लाभ देण्यासाठी प्रयत्न करीन.

-अनिकेत पालकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी

रुक्मिणीचे आधार कार्ड बनविणे, घराखालील जागा मिळवून घरकुल लाभ देणे यासाठी आमच्या संस्थेकडून आम्ही प्रयत्न करीत आहोत. पालकर यांच्याप्रमाणेच जर तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय अधिकार्‍याने एक एक मूल दत्तक घेतले, तर निश्चितच तालुक्यातील कुपोषण प्रश्नाची तीव्रता कमी होऊ शकेल.

-अशोक जंगले, कॅन प्रकल्प समन्वयक

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply