Breaking News

‘हाथ की सफाई’ @ 50 वर्षे

राज कपूरच्या ‘दो उस्ताद’च्या रिमेकमध्ये रणधीर कपूर रंगला

दिग्दर्शक प्रकाश मेहरा याने ‘हाथ की सफाई’ (1974)चे शूटिंग सुरू होण्याअगोदर रणधीर कपूरसाठी हा चित्रपट ज्या चित्रपटाची रिमेक आहे त्या तारा हरीश दिग्दर्शित दो उस्ताद (1959) या चित्रपटाच्या खास ट्रायलचे आयोजन केले त्याचा हा गाजलेला रंगतदार किस्सा. या पिक्चरमध्ये रणधीर कपूरला नेमके काय करायचेय हे समजावे हाच त्यामागचा हेतू. ‘दो उस्ताद’मध्ये राज कपूर, मधुबाला व शेख मुख्तार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट राज कपूरच्या अगदी लहानपणीच्या वयातील भूमिका रणधीर कपूरने केली. तेव्हा तो अगदी दहा वर्षांचा होता. ट्रायल संपल्यानंतर रणधीर कपूर त्याच्या नेहमीच्या शैलीत गंमतीत म्हणाला, माझे डॅडी कशा कशाही स्वरूपाच्या चित्रपटात भूमिका करत. काहीही करत. यावर पटकन प्रकाश मेहराने म्हटलं, त्यांनी अशा चित्रपटातून कामे केली म्हणून आपल्या कपूर कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तम केला…
हा किस्सा त्या काळात बराच गाजला. राज कपूरच्या चित्रपटात ‘दो उस्ताद’वर कधीच फारसा फोकस पडत नाही, कारण तो ऑल्सो रनचा मसालेदार मनोरंजक चित्रपट म्हणून गणला जातो. दोन्ही नायक गुन्हेगार असा फंडा. याच ‘दो उस्ताद’वरून बनलेल्या हाथ की सफाई (मुंबईत रिलीज 30 ऑगस्ट 1974) चित्रपटाच्या प्रदर्शनास चक्क 50 वर्ष पूर्ण झालीदेखील.
सध्या अ‍ॅन्ग्री यंग मॅन या लघुपटामुळे छान फोकसमध्ये असलेल्या पटकथा व संवाद लेखक सलिम जावेद यांनीच ‘हाथ की सफाई’ लिहिला. अर्थात ‘दो उस्ताद’चे मध्यवर्ती कथासूत्र घेऊन लिहिला. हा एक रिमेक आहे आणि हिंदी चित्रपटाच्या यशस्वी पटकथाकारांच्या वाटचालीवर फोकस टाकताना दिसतेय, सलिम जावेद यांनी अनेकदा तरी जुन्या चित्रपटाची गोष्ट नवीन आकर्षक वेस्टनात मुद्देसूदपणे मांडली. उत्तम व्यक्तिरेखा रेखाटन आणि बोलके संवाद ही आपली वैशिष्ट्ये पूर्ण क्षमतेने वापरली. एका तमिळ भाषेतील चित्रपटावरूनच ‘हाथी मेरे साथी’ (1971) लिहिण्याच्या निमित्ताने त्यांना राजेश खन्नाने एकत्र आणले. त्यांनीच तापी चाणक्य दिग्दर्शित राम और श्याम (1967)वरून रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सीता और गीता’ (1972) लिहिला. मूळ नायकप्रधान चित्रपट त्यांनी नायिकाप्रधान केला. बी.आर. चोप्रा निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ (1965)वरून नासिर हुसेन दिग्दर्शित ‘यादों की बारात’ (1973) लिहिताना त्यांनी चित्रपटाला नवीन रूपडं दिलं. ती त्यांची विशेष खासियत, कसब व कौशल्य. कॉपी करायची नाही, तर मूळ चित्रपटांवरून प्रभावित व्हायचे. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (1975)च्या अतिशय बंदिस्त पटकथेचे कायमच विशेष कौतुक केले जाते. याच ‘दीवार’ची मुळे कशात आहेत? मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ची करारी आई आणि नितीन बोस दिग्दर्शित ‘गंगा जमुना’मधील भिन्न स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे भाऊ या सगळ्याचे आधुनिक मिश्रण म्हणजे ‘दीवार’, तर रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (1975)ची पाळेमुळे अकिरा कुरोसावा दिग्दर्शित सेव्हन समुराई आणि राज खोसला दिग्दर्शित मेरा गाव मेरा देश ( 1971) या चित्रपटात आहेत हे सर्वज्ञात आहे… ही हिट लिस्ट अथवा उदाहरणे अशीच आणखी वाढवता येईल. सत्तरच्या दशकातील सामाजिक व्यवस्थेवरचा राग अथवा उद्रेक त्यांच्या नायकात असे हे उल्लेखनीय. तोच तो अ‍ॅन्ग्री यंग मॅन. त्याच सलिम जावेद लिखित ‘हाथ की सफाई’.
दिग्दर्शक प्रकाश मेहराने ‘जंजीर’ ( मुंबईत रिलीज 11 मे 1973) प्रदर्शित होताच निर्माता आय.ए. नडियादवाला यांच्यासाठी सलिम जावेद लिखित ‘हाथ की सफाई’चे चित्रीकरण सुरू केले.
रणधीर कपूरचे हे चलतीचे दिवस. ‘जवानी दीवानी’, ‘रामपूर का लक्ष्मण’ सुपर हिट झालेले आणि चक्क हेमा मालिनी त्याची नायिका. तोपर्यंत हेमा मालिनीने राज कपूरची ‘सपनों का सौदागर’ची नायिका (तो तिचा पहिलाच चित्रपट), शम्मी कपूरची नायिका (रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘अंदाज’), शशी कपूरची नायिका (समीर गांगुली दिग्दर्शित ‘अभिनेत्री’) अशी कपूर नायकांची नायिका साकारली होतीच. (शशी कपूरसोबत त्यानंतर त्रिशूल वगैरे अनेक चित्रपटांत काम केले.) ‘हाथ की सफाई’पासून ती नवीन पिढीतील कपूरांची नायिका झाली (काही वर्षांनी सुखवंत दढ्ढा दिग्दर्शित एक चादर मैली सी या पंजाबी लोककथेवरील चित्रपटात तिने ऋषि कपूरसोबत काम केले.)
‘हाथ की सफाई’त चोर कथा रंगली. राज कपूरने चोर साकारावा याचे रणधीर कपूरला आश्चर्य वाटले असेल? आणि राज कपूरचं व्यक्तिमत्व पाहता ते खरेच आहे. त्या काळात हिंदी चित्रपटात पाकिटमारपासून हिर्‍याची अथवा महागड्या जुन्या मूर्तीची चोरी अशा गोष्टीत पटकथाकार, दिग्दर्शक यांना फार रस असे, सगळा चोरांचाच बाजार. चित्रपट रसिकही अशा पिक्चर्सना हाऊसफुल्ल गर्दीने प्रतिसाद देई.
लहानपणी हलवलेले भाऊ हादेखील त्या काळातील एक हुकमी फंडा. पिक्चरच्या पहिल्याच रिळात ते हरवत आणि क्लायमॅक्सला एकमेकांना ओळखत भेटत. दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याकडे जणू याचे पेटंट होते. याही पिक्चरमध्ये दोन भाऊ लहानपणीच हरवतात. त्यातला राजू (रणधीर कपूर) हा मुंबईतील एका पाकिटमाराकडे लहानाचा मोठा होतो (योगायोग बघा, ‘दो उस्ताद’मध्येही राज कपूरचे नाव राजू हेच असते. सलिम जावेद रिमेक चित्रपट लिहिताना केवढे साम्य ठेवत बघा.) हा गुन्हेगारी विश्वात राजू ताडदेव या नावाने ओळखला जातो. दुसरा भाऊ शंकर (विनोद खन्ना) देखील गुन्हेगारी क्षेत्रात. हिर्‍यांची चोरी, स्मगलिंग वगैरेत कार्यरत, तर कामिनी चोप्रा (हेमा मालिनी) ही एका श्रीमंत खानदानातील युवती काही कारणास्तव घरातून पळून मुंबईत आलेली असते आणि तिला शोधून देणार्‍यास बक्षीस अशी वृत्तपत्रात आलेली जाहिरात नेमका राजू ताडदेव पाहतो आणि पैशाच्या लालसेने तो कामिनीचा शोध घेतो. तिच्याशी प्रेमाचे नाटक करत तिला तो तिच्या काकांकडे घेऊन जातो. ते करताना तो तिच्याकडच्या किमती हिर्‍याची चोरी करतो. कामिनीचा काका तिचं लग्न गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रणजित (रणजित) हिच्याशी करू इच्छितोय म्हणून कामिनी पुन्हा घरातून पळते. आता ती नेमकी शंकरला भेटते. राजू ताडदेवला आता कामिनीबद्दल खरोखरचे प्रेम वाटू लागते आणि कामिनीची शंकरच्या तावडीतून सोडवू इच्छितोय… पडद्यावर हे रंगलेय हो. रणजितचे नाव रणजितचं आहे. मध्यंतरी त्याच्या जुहूच्या बंगल्यावर त्याच्या दीर्घ मुलाखतीचा योग आला असता तो मला म्हणाला, माझ्या भूमिकेला वेगळे नाव देता आले नाही तर अनेकदा रणजित असेच ठेवत, असे म्हणत तो छान हसला. या चित्रपटात मुश्ताक मर्चंट, सत्येन कप्पू, गोगा कपूर यांच्याही भूमिका. पुष्पा पिक्चर्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली.
मूळ चित्रपटातील स्टोरी अधिक रंगतदारपणे पटकथा व संवादात मांडण्यात सलिम जावेद नेहमीच यशस्वी ठरले. प्रकाश मेहरा यांनी अतिशय प्रभावीपणे हा चित्रपट पडद्यावर साकारला. ते पब्लिकला पडद्यावरील घटनांत गुंतून ठेवण्यात यशस्वी ठरले. मसालेदार मनोरंजक चित्रपटाच्या मांडणीत प्रकाश मेहरा अनेक चित्रपटांत यशस्वी. मग काय विचारता? फर्स्ट शोपासूनच पिक्चर सुपर हिट. मुंबईतील सुपर थिएटरमध्ये पिच्चरने रौप्यमहोत्सवी यश संपादले आणि त्यात गीत संगीताची धमाल. ती तर हवीच.
गुलशन बावराची गाणी आणि कल्याणची आनंदजीचे संगीत यांनी पिक्चरच्या मसालेदार मनोरंजनात मस्त भर घातली. तुमसे मोहब्बत हो गयी (पार्श्वगायक किशोरकुमार व लता मंगेशकर), पिने वालो को पिने का बहाना चाहिए (किशोरकुमार व लता मंगेशकर), तू क्या जाने बेवफा (लता मंगेशकर), वादा करले साजना (मोहम्मद रफी व लता मंगेशकर) ही गाणी लोकप्रिय. वादा करले… रफीच्या चाहत्यांचे फेवरेट. विशेष उल्लेखनीय गोष्ट, हेमा मालिनीच्या तू क्या जाने या या क्लब डान्स गाण्यावरून फार उलटसुलट चर्चा रंगली. हेमा मालिनीने अशा गाण्यावर नृत्य करू नये असं म्हणण्यामागे एक प्रकारची आपुलकीच होती. काय दिवस होते हो ते. 50 वर्षांपूर्वीचे चित्रपट चाहते अशा सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या आवडत्या कलाकाराकडे पाहत.
तरी एक प्रश्न आहेच, जंजीर आणि हाथ की सफाई सुपर हिट ठरूनही प्रकाश मेहराने सलिम जावेदच्या पटकथेवर त्यानंतर चित्रपट का दिग्दर्शित केला नाही? आपल्या पटकथेत सगळेच बारीक सारीक तपशील असल्यानेच दिग्दर्शकाला त्यावर करायला फार काही नसतेच अशा सलिम जावेद यांच्या वक्तव्यावर प्रकाश मेहरा व मनमोहन देसाई यांनी प्रत्युत्तर देताना रोखठोकपणे म्हटले, तसे असेल तर देश मुखर्जी दिग्दर्शित ‘इमान धरम’ का सुपर फ्लॉप ठरला?
सलिम जावेदना निरूत्तर करणारी ही गोष्ट हो. (मनमोहन देसाई यांनीही एकमेव ‘चाचा भतिजा’नंतर सलिम जावेदसोबत काम केले नाही.) रणधीर कपूर व हेमा मालिनी जोडीही पुन्हा एकत्र आली नाही. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘चाचा भतीजा’मध्ये धर्मेंद्र व हेमा मालिनी आणि रणधीर कपूर व योगिता बाली अशी जोडी होती.
हाथ की सफाई हा सलिम जावेद यांचा एक सुपर हिट चित्रपट तसाच प्रकाश मेहरा यांचाही. 50 वर्षांनंतरही तेवढाच मसालेदार मनोरंजक. पहा तर एकदा. आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या काळात जगभरातील अनेक प्रकारचे चित्रपट एन्जॉय करीत असलेल्यांना कदाचित प्रश्न पडेल, 50 वर्षांपूर्वी असे चित्रपट रसिकांना आवडायचे? ही काय आवड होती?
याचे उत्तर होय असेच आहे. पिक्चर देखते वक्त टेन्शन नही ले ने का, टाईमपास करने का अशा वृत्तीने त्या काळात चित्रपट एन्जॉय केले जात. ‘हाथ की सफाई’ त्यात एकदम फिट्ट बसणारा.
– दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply