Breaking News

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकारिता क्षेत्र जनमानसाचा आरसा आहे. पत्रकारिता अत्यंत मानाचे असे क्षेत्र आहे. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात पत्रकारांची भूमिका आणि त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीन, अशी ग्वाही पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
पत्रकार मित्र-सहकार्‍यांच्या आयोजनानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पत्रकार संवाद कार्यक्रम शहरातील मार्केट यार्ड येथे शुक्रवारी (दि. 30) झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया प्रसारमाध्यमांचे पनवेल, उरण, नवी मुंबईतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यासपीठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे, संजय कदम, गणेश कोळी, सूर्यकांत म्हात्रे, साहिल रेळेकर उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांनी या क्षेत्रात काम करताना येणार्‍या अडचणी मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने सदनिका, विमा संरक्षण, पत्रकार भवन किंवा सदन, पेन्शन अशा बाबींचा समावेश होता. त्यावर बोलताना पत्रकारांचे जे काही प्रश्न आहेत ते संघटनांनी एकत्रित येऊन मांडणे गरजेचे असते. आजच्या निमित्ताने पत्रकारांनी आपल्या मागण्या सूचित केल्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही नमूद करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना आश्वासित केले.
काही पत्रकारांनी राजकीय विषयासंदर्भात विषय मांडले. प्रभावी काम करणारे मुख्यमंत्री कोण असा सवाल या वेळी उपस्थित झाला. त्या संदर्भात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, तीन टर्ममध्ये मी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे पाच मुख्यमंत्री पाहिले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे काम नेहमीच प्रभावशाली ठरले. प्रत्येक आमदाराला ते प्राधान्य द्यायचे. त्यांचे संघटन कौशल्य आणि कामाची पद्धत अत्यंत उत्तम व प्रतिभावंत अशी आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे ते नेहमीच पसंतीचे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांचे कार्य आणि मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिदे हेसुद्धा आव्हान स्वीकारून काम करत आहेत आणि राज्याच्या विकासासाठी आवश्यक असे कामकाम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
आणखी एका राजकीय प्रश्नावर बोलताना, सामान्य कार्यकर्ता पदाधिकारी, पुढे नगराध्यक्ष आणि आमदार अशी राजकीय वाटचाल करीत असताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच मौल्यवान ठरले आहे. राजकारणापेक्षा सामाजिक सेवेला महत्त्व देण्याचा त्यांचा नेहमीच आग्रह राहिला आहे. याच शिकवणीतून कार्य करत असताना सर्वसामान्य माणसासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी, तळागाळात काम करताना नेहमीच आनंद होतो आणि यातून पुढील कार्याला प्रेरणाही मिळत असते, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय क्षेत्रातून समाजाची सेवा करता येते, मात्र त्याप्रमाणे वाटचाल करणे महत्त्वाचे असते. त्याच अनुषंगाने जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देता येते, हाच उद्देश घेऊन नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगत जमिनीवर राहून आणि लोकांच्या संपर्कात राहून काम करायला आवडत असल्याचे अधोरेखित केले.
राजकीय क्षेत्रात नसते तर तुम्ही कुठले क्षेत्र निवडले असते, असा एक प्रश्न विचारला गेला असता, कार्यकर्ता, पदाधिकारी असा माझा प्रवास सुरू असताना माझे वडील लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे मला आदेश दिले आणि माझी राजकीय कारकीर्द वेग धरू लागली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शिक्षकी आत्मा, त्यामुळे मला नेहमी विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी आणत असत. माझ्यात वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे राजकारणात नसतो तर साहित्य क्षेत्राकडे वळलो असतो, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक पर्यटनाविषयी उपस्थित प्रश्नावर बोलताना, युरोपसारखे सुंदर देश दिसण्यासाठी आणि पर्यटनासाठी चांगले असले तरी आपला भारत देश भौगोलिकदृष्ट्या व विविध संस्कृतीने नटलेला आहे. आपल्या देशात सर्व जाती, धर्म, पंथ एकसंघ व परिवाराप्रमाणे राहत आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश जगातील सर्वोत्कृष्ट व आदर्श देश आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाटचालीत पत्रकारांचा वाटा असल्याचे सांगत त्यांच्याप्रती आभार व्यक्त केले तसेच डिसेंबर महिन्यात पुन्हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. पत्रकारांनी या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद दिले.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply