पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन; ‘मन की बात’द्वारे साधला जनतेशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आपण सण साजरे करताना आपले शूर सैनिक देशाच्या सीमेवर तैनात आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत. आपण सण साजरे करीत असताना त्यांची आठवण जरूर ठेवावी. भारतमातेसाठी सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देणार्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा प्रज्वलित करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले. विजयादशमी म्हणजेच दसर्यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (दि. 25) आपल्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
मी जवानांना सांगू इच्छितो की, तुम्ही भलेही सीमेवर असाल, पण संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही कायम सुरक्षित राहावे, हीच आमची प्रार्थना आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी पाठविले त्यांना मी नमन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचेदेखील पर्व असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना ‘व्होकल फॉर लोकल’चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवून त्याचा आग्रह धरा, असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले आहे.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. ऑक्टोबर 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद साधतात. रविवारी या कार्यक्रमाचा 70वा भाग होता.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा आपण सण-उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो तेव्हा सर्वांत अगोदर मनात हेच येते की बाजारात कधी जायचे, काय खरेदी करायची? विशेषतः मुलांमध्ये यासाठी मोठा उत्साह असतो. सणांचा हा उत्साह आणि बाजारातील चमक एकमेकांशी जोडलेली आहे, मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी बाहेर जाल, तेव्हा ‘व्होकल फॉर लोकल’चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना आपल्याला स्थानिक उत्पादनांनाच प्राधान्य द्यायचे आहे.
तसेच आज तुम्ही सर्व जण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरे करीत आहात. त्यामुळे कोरोनाविरोधात जी लढाई आपण लढत आहोत, त्यात आपला विजयदेखील निश्चित आहे. पूर्वी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत होती, मात्र यंदा असे होऊ शकले नाही. पूर्वी दसर्याला मोठमोठ्या जत्रा भरत असत, मात्र यंदा त्यांचे स्वरूपदेखील वेगळेच आहे. रामलीलाच्या उत्सवाचेही मोठे आकर्षण होते, मात्र त्यावरही अनेक निर्बंध आले आहेत. पूर्वी नवरात्र काळात गुजरातच्या गरब्याचा आवाज सर्वत्र येत होता, मात्र यंदा मोठमोठे आयोजन सर्वत्र बंद आहेत. आता पुढेही आणखी उत्सव येणार आहेत. ईद, शरद पौर्णिमा, वाल्मिकी जयंती, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, गुरुनानक जयंती आदी उत्सव आहेत, मात्र कोरोनाच्या या संकटकाळात आपल्याला संयमानेच वागायचे आहे. मर्यादेतच राहायचे आहे, असेही त्यांनी देशवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केले.