दुबई : वृत्तसंस्था
भारताचा अंडर-19 संघ आशिया कप चॅम्पियन बनला आहे. दुबईत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने डीएलएस पद्धतीनुसार श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. यासह ज्युनियर इंडियन टीम इंडियाने विक्रमी आठव्यांदा अंडर-19 आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला. अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पावसामुळे व्यत्यय आला आणि सामना 50 षटकांवरून 38 षटकांचा करण्यात आला. पाऊस येईपर्यंत श्रीलंकेच्या डावातील 32 षटके पूर्ण झाली होती आणि विश्रांतीनंतर त्यांना फक्त 6 षटके खेळायला मिळाली, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यांना निर्धारित 38 षटकांत 9 गडी गमावून केवळ 106 धावा करता आल्या. 32 व्या षटकापर्यंत श्रीलंकेने 7 विकेट गमावल्या होत्या. 1989 पासून, अंडर-19 आशिया चषक 9 वेळा खेळला गेला, त्यापैकी भारताने आठवेळा विजेतेपद पटकावले.