पनवेल : प्रतिनिधी
शेतकर्यांवर अन्याय होऊन नैना प्रकल्प होऊ देणार नाही, या भूमिकेचा पुनरूच्चार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 26) परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या विचार मंच कार्यक्रमात केला. या वैचारिक कार्यक्रमात शेकाप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून नैना क्षेत्रातील गावांचे सीमांकन करून गावठाण विस्तार व नैना टीपी स्कीम याबाबत अॅड. प्रल्हाद कचरे व अॅड. के.टी. खांडेकर यांच्याबरोबर संवाद साधण्याचा विचार मंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी नैना प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, शेतकर्यांवर अन्याय होऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही. टीआयपीएलला जरी कामाचा ठेका मिळाला असला तरी मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेतकर्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत कोणाही ठेकेदारला इथे एकही वीट लावू देणार नाही, असे स्पष्ट केले. तुमचे समाधान होईपर्यंत आम्ही रस्त्यावर तुमच्यासोबत थांबू. नैनाच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या गोष्टी नसल्या तर नैना हवी की नैनाच नको, ग्रामस्थांना हा प्रकल्प हवा की नको याबाबत त्या गावात ग्रामसभा घेऊन तसा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण पत्र दिलेले आहे. आपण कोणाची घरे पाडण्यासाठी हे पत्र दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शेतकर्यांचे पूर्ण समाधान झाले पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक गावाची सर्वपक्षीय कमिटी बनवा. आम्ही सगळे तुमच्याबरोबर असू. सिडकोच्या अधिकार्यांना एक पाऊल टाकू न देण्याची काळजी आपण घेऊ, कारण ही आपली जमीन आहे. आमच्या जागेत सिडको असे नियोजन करू शकत नाही हे सर्वांनी एकमुखाने म्हटले पाहिजे, असे नमूद करून गावांचे सीमांकन करून गावठाण विस्तार करण्याबाबत किरण पाटील यांनी चळवळ उभी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नैना प्रकल्पाला विरोध करताना आपल्या भाषणात आपण वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला, पण या सरकारने काहीच केले नाही. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल ते याबाबत निर्णय घेईल, असे सांगितले होते. त्याचा समाचार घेताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी 2019मध्ये महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही हे निदर्शनास आणून दिले.
संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील प्रस्ताव मांडत असताना शेकापच्या कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केल्याने गोंधळ झाला. त्याला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कचरे यांचे भाषण झाल्यावर प्रश्न विचारण्यासाठी माईक पाहिजे म्हणून पुन्हा गोंधळ झाला. या वेळी पोलिसांनी सभागृहात येऊन गोंधळ थांबवला. शेकापच्या गोंधळामुळे अॅड. के.टी. खांडेकर यांना आपले भाषण दोन मिनिटांत संपवावे लागले.
या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील, वामन शेळके, किसन नेरूळकर यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …