विनाभाडे पोहोचविणार साधनसामुग्री

सोलापूर ः प्रतिनिधी
फनी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांतील नागरिकांना मदत करण्याचा ओघ वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील सामाजिक संस्था, संघटना व अन्य लोकांकडून दिली जाणारी मदत विनाभाडे रेल्वे प्रशासन संबंधित लोकांपर्यंत पोहचवणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली आहे.
दरम्यान, 3 मे रोजी पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेशातील काही गावांना फनी वादळाचा तडाखा बसला. या वादळात या तिन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. परिणामी अनेक कुटुंबे रस्त्यावर आली, तर काही लोकांचे स्थलांतर करण्यात आले. अशा बेघर झालेल्या लोकांना पैसे, कपडे, जेवण, संसारोपयोगी साहित्य आदी प्रकारची मदत विविध राज्यांतून देण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील गावे, शहरातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी मदत रेल्वे विभागाकडून विनाभाडे संबंधित राज्यांना पोहच केली जाणार आहे. ही सुविधा 4 मेपासून सुरू करण्यात आली असून, 2 जूनपर्यंत ही सुविधा चालू राहणार आहे.
देशामधील सर्व सरकारी संस्था, सामाजिक संघटना यांच्याकडून मिळालेली साहित्यरूपातील मदत ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांना रेल्वेकडून विनामूल्य पाठवण्यात येणार आहे. तरी सोलापूर मंडलातील स्वयंसेवी संस्था व इतर लोकांनी आपल्याकडील मदत साहित्य सोलापूर मंडल रेल्वे विभागाकडे जमा करून सहकार्य करावे़. ही सर्व मदत पार्सल व्हॅन यात्री गाडीने पाठवण्यात येणार आहे़
-प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर
स्वतंत्र कोचमुळे जलद पोहचणार मदत
फनी वादळग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार्या मदतीसाठी स्वतंत्र कोचची निर्मिती करण्यात आली आहे. जमा झालेले साहित्य नेहमीच्या दैनंदिन पार्सल व्हॅनमध्ये न पाठवता स्वतंत्र कोचमधून पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे वादळग्रस्तांसाठीची मदत वेळेत आणि जलदगतीने पोहचण्यास मदत होणार आहे. या सामुग्रीवर कोणत्याही प्रकारचे शुल्क लावण्यात येणार नसल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली. तरी जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी वादळग्रस्तांसाठी मदत द्यावी, असेही आवाहन हिरडे यांनी केले आहे.
केरळ पूरग्रस्तांसाठीही मदतीचा हात
केरळच्या पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून गेल्या 15 दिवसांत 9.26 टनाची औषधे, कपडे, अन्न अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली होती. केरळमध्ये पुरात लाखो घरे वाहून गेली़ आहेत. असंख्य लोकांचा मृत्यू तसेच जनजीवन विस्कळीत झाले होते. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेल्वेच्या माध्यमातून मदत पोहचवण्याचे काम हाती घेतले होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वेनेदेखील अन्न, औषध, कापड आणि पाणी या सार्या मदतीची वाहतूक मोफत केली होती. त्यावेळी केरळ पूरग्रस्तांसाठी सोलापूर विभागाने जास्तीत जास्त मदत केली होती. सोलापूर विभागातून 9,600 कर्मचार्यांनी आपला पगार पूरग्रस्तांसाठी दिला होता.