Breaking News

बंधारा झाला गाळमुक्त

नेरळमधील तरुणांचे श्रमदान

कर्जत : बातमीदार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नेरळ गावातील काही तरुण एकत्र झाले आणि त्यांनी 15 वर्षापासून माती आणि दगडाने पूर्ण भरून गेलेल्या बंधार्‍यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.त्यामुळे या बंधार्‍याने मोकळा श्वास घेतला असून, कोमलवाडीमधील पाणी टंचाई काही प्रमाणात दूर होण्यात मदत होणार आहे.

नेरळ गावातील मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते आणि काही तरुणांनी ग्रामपंचायत हद्दीमधील कोमलवाडीमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती ग्रामस्थांकडून घेतली. तेंव्हा वाडीच्यामागे असलेल्या ओहोळातील बंधारा दगड, माती आणि गाळाने भरला असल्याचे स्थानिक कार्यकर्ते सुनील कांबडी यांनी सांगितले. त्यानंतर मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते प्रमोद डबरे, विकास कराळे, दीनकर बदे, रोहित गोरे, जगदीश साळुंके, सोनू शेख, कमलेश कराडकर, जयेश कदम, रविंद्र खांबल आणि रविंद्र मिसाळ यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेवून बंधार्‍यातील गाळ काढण्यासाठी शनिवारी (दि. 25)  श्रमदान सुरू केले. प्रमोद डबरे यांनी श्रीफळ वाढवून श्रमदानास सुरुवात केली.

दिवसभर श्रमदान करून काढण्यात आलेली माती आणि दगड स्थानिक कार्यकर्त्यांनी डंपरमधून टाकून नेले. त्यामुळे 15 वर्षापूर्वी पावसाळ्यात माती आणि दगडात गाडला गेलेला सिमेंट बंधारा पुन्हा मोकळा झाला आहे. या बंधार्‍यातून किमान 20 डंपर माती बाहेर काढण्यात तरुणांना आणि स्थानिक आदिवासींना  यश आले आहे. त्यामुळे दरवर्षी पाणी वरच्यावर वाहून जाणार्‍या या सिमेंट बंधार्‍यात यावर्षी पाण्याचा साठा होणार आहे. त्याचा परिणाम या बंधार्‍याच्या खाली असलेल्या कोमलवाडी ग्रामस्थांच्या विहिरीत पाणी साठा अधिक प्रमाणात होणार आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply