Breaking News

नवीन बसेसची देखभाल खाजगी कंपनीकडे

पुणे ः प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल होणार्‍या 400 सीएनजी बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे देण्याचे विचाराधीन आहे. देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे बसेसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, तांत्रिक बिघाड यामुळे दररोज सुमारे पाच हजार फेर्‍या रद्द होतात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत आहे. परिणामी नवीन येणार्‍या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे दिल्यास बस मार्गावर येण्याचे प्रमाण तुलनेने चांगले राहील, असा विश्वास ‘पीएमपी’तील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2000 बसेस असून त्यापैकी 1372 बसेस पीएमपीच्या मालकीच्या आहेत, तर 577 बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. पीएमपीच्या मालकीच्या बसेसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम आगारांमधील वर्कशॉपमध्ये होत असते. बसचे इंजीन किंवा मोठे काम असल्यास स्वारगेट येथील मध्यवर्ती वर्कशॉपमध्ये बस आणल्या जातात. पीएमपीचे अधिकारी व कर्मचार्‍यांवर बसच्या दुरूस्तीची जबाबदारी असते, तर खासगी बसची संपूर्ण देखभाल ठेकेदारांकडेच आहे, मात्र जुन्या बस, अनेक अप्रशिक्षित कर्मचारी, सुट्या भागांची कमतरता आणि देखभाल-दुरूस्तीमध्ये सातत्य नसल्याने ब्रेकडाऊनवर नियंत्रण मिळविण्यात पीएमपी प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी मार्गावर 1450 ते 1500 बसेस धावतात. त्यातही दररोज सुमारे 150 बसेस मार्गावरच बंद पडतात. शेकडो बसेस विविध तांत्रिक कारणांमुळे आगारातच उभ्या असतात. प्रशासनाकडून अधिकाधिक बसेस मार्गावर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न सातत्याने फोल ठरत आहेत. एक ते दीड महिन्यातून एका बसला आग लागत आहे.देखभाल-दुरूस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे बस उत्पादक कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘पीएमपी’नेही आता देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीला देण्याचा विचार सुरू केला आहे. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच नवीन 400 सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. या सर्व बसेसची देखभाल खासगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव आहे.‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीची पाहणी केली होती. दिल्लीमधील 90 टक्के बसेस आगारातील बसच्या देखभालीचे काम खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. त्यामुळे तेथील बस मार्गावर येण्याचे प्रमाण 90 ते 95 टक्के एवढे आहे. या तुलनेत पीएमपी जवळपासही नाही.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्लीप्रमाणे पुण्यातही हा प्रकल्प हाती घेण्याचा विचार सुरू केला आहे. नवीन येणार्‍या बसेस काही ठरावीक आगारांमध्येच देऊ़न या आगारांचे देखभालीचे काम खासगी कंपनीकडे सुपूर्द केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्याने हे आगार आणि अन्य आगारांचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल. त्यातून परिस्थिती समोर येईल. हे काम कोणत्या कंपनीला द्यायचे, त्याची रचना कशी असेल आदी मुद्द्यांवर अद्याप निर्णय झाला नाही.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply