Breaking News

मोरबे धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात आमदार महेश बालदी यांची मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत चर्चा; लवकरच बैठक

चौक : प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी मोरबे धरणग्रस्तांच्या आंदोलनाला भेट देऊन समस्यांच्या सोडवणुकीसंदर्भात मदत व पुनवर्सनमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधले असून शुक्रवारी (दि. 6) मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासोबत विचारविनिमय केला. या वेळी मंत्री पाटील यांनी विधिमंडळाचे अधिवेशन संपताच स्वतंत्र बैठका घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
मोरबे धरणग्रस्त कुटुंबासह 27 जूनपासून धरणावर उपोषणाला बसले होते. यावर तोडगा न निघाल्याने 34 वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या धरणग्रस्तांनी आक्रमक होत गुरुवारी नवी मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा बंद पाडला. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासन अधिकारी, रायगड उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण अखेरच्या लढाईत आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. याची गांभिर्याने दखल घेत रात्री उशिरा आमदार महेश बालदी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोरबे धरणग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात मुंबई येथे विधानसभा कक्ष कार्यालयात आमदार महेश बालदी यांनी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. धरणग्रस्तांच्या संपादित जमिनीचा दर, पंचनामे, वाढीव गावठाण, शिल्लक जमिनीचे वाटप, 13 नागरी सुविधा, नोकरी आणि प्रकल्पग्रस्त दाखला यावर त्यांनी मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले.
मंत्री अनिल पाटील यांनी अधिवेशन संपताच रायगडचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि कृती समिती यांची एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, तर दुसरी बैठक माझ्यासह पालकमंत्री, धरणग्रस्त कृती समिती, नवी मुंबई महापालिका आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांची होईल, असे आश्वासन या वेळी दिलेे. त्यामुळे मोरबे धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply