Breaking News

व्यापक समुपदेशनाची गरज

वैद्यकीय महाविद्यालयांतील रॅगिंगची गंभीर समस्या डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणाने चर्चेत आली आहे. मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षणाचा उत्तम दर्जा व तेथे मिळणारा बहुमूल्य अनुभव यामुळे या महाविद्यालयांना वैद्यकीय विद्यार्थी आत्यंतिक प्राधान्य देतात. त्यांच्या करिअरमधील दीर्घकालीन यशाच्या दृष्टीने हे सारेच महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांचा कल सारे निमूट सहन करण्याकडेच असतो.

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी या अवघ्या 26 वर्षांच्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टरांच्या छळातून केलेली आत्महत्या ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. डॉ. पायल तडवी मूळच्या जळगावच्या आदिवासी समाजातील होत्या. आपल्या वरिष्ठ आपल्याला वारंवार रुग्णांसमोर घालून-पाडून बोलतात, ऑपरेशन थिएटरमध्ये पाय ठेवू देणार नाही असे धमकावतात अशी तक्रार तिने वारंवार आपल्या आईवडिलांकडे केली होती. वरिष्ठांच्या या छळामुळे ती व्यथित असल्याचे पाहून तिच्या आईवडिलांनी पोलिसांकडेही तक्रार नोंदवली होती. आत्महत्येच्या दिवशीही ती घरी फोन करून चिक्कार रडली होती. आईने तिची समजूत काढून तिला धीर धरण्यास सांगितलेे. परंतु त्याच व्यथित मन:स्थितीत तिने टोकाचे पाऊल उचलले असावे. गेल्या बुधवारी होस्टेलमधील खोलीतच गळफास लावून घेऊन तिने आत्महत्या केली. या रुग्णालयांतील कामाचा प्रचंड ताण, वरिष्ठांचा दबाव यांमुळे हा काळ त्यांची परीक्षाच पाहणारा असतो. अशात विशिष्ट परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्याला रॅगिंगलाही तोंड द्यावे लागते हे संबंधित व्यवस्थेतील आजी-माजी विद्यार्थी व वरिष्ठ सारेच मान्य करताना दिसतात. डॉ. तडवी यांच्या प्रकरणाला त्यांच्या आदिवासी असण्याची पार्श्वभूमीही आहे. त्यांच्या वरिष्ठ डॉक्टर या उच्च वर्णीय असल्याकडेही निर्देश केला गेला आहे. वैद्यकीय प्रवेशातील पराकोटीच्या स्पर्धेमुळे आरक्षणाविरोधातला रोषही वाढतो आहे. तिथला कामाचा ताण व हा वाढता रोष या दोन्ही संदर्भात सर्व संबंधितांचे व्यापक मोहिमेतून समुपदेशन होण्याची गरज आहे. डॉ. पायल तडवी प्रकरणी अ‍ॅन्टीरॅगिंग समितीतल्या सदस्यांनीही तसेच मत व्यक्त केले आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी या समितीने केली असून यातील निष्कर्ष संवेदनशील असल्याने तात्काळ उघड करता येणार नाहीत असेही केंद्रीय मार्ड संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. मार्डने यापूर्वीच संबंधित तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांना निलंबित केले आहे तसेच हॉस्पिटल प्रशासनानेही संबंधितांना कारणे दाखवा नोटिस बजावून संबंधित तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांवर निलंबनाची कारवाईही केली आहे. महिला आयोगानेही नायर हॉस्पिटलला नोटिस बजावली असून या प्रकरणी आठ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. ही सारे डॉ. पायल यांच्या मृत्यूनंतर घडते आहे हे मात्र दुर्दैवाचे आहे. तिच्या तक्रारींची वेळीच दखल घेतली गेली असती तर एक उमेदीचे आयुष्य अर्धवट संपले नसते. एकंदरच राज्यात गेल्या दोन वर्षांत रॅगिंगच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसते आहे. 2018मध्ये 56 तर 2017 मध्ये 46 विद्यार्थ्यांनी रॅगिंगची तक्रार नोंदवली. चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 15 विद्यार्थ्यांनी रॅगिंगची तक्रार केली आहे. आता याचा अर्थ रॅगिंगचे प्रमाण वाढते आहे असा घ्यायचा की तक्रार नोंदवण्याविषयी विद्यार्थ्यांना वाढता विश्वास वाटतो आहे असा घ्यायचा, हाही एक प्रश्नच आहे. परंतु एकंदर परिस्थिती लक्षात घेता रॅगिंगचे निराकरण करण्यासाठी व्यापक मोहिमेची गरज आहे हे निश्चित.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply