महाड तालुक्यातील अधिकार्यांची आढाव बैठक
महाड : प्रतिनिधी : टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर किंवा बोअरवेल या सर्व तात्पुरत्या उपाययोजना असून, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करणे गरजेच्या आहे. संबंधीत अधिकार्यांनी छोटे -मोठे बंधारे, विहिरी आणि तलाव बांधण्याचे प्रस्ताव तात्काळ तयार करावेत, अशा सूचना आमदार प्रवीण देरेकर यांनी सोमवारी येथे केल्या.
महाड तालुक्यातील 13 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाऊस वेळेत सुरु झाला नाही, तर तालुक्यातील पाणीटंचाई अधीक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी महाड तहसिलदार चंद्रसेन पवार यांच्या दालनात संबंधित अधिकार्यांची आढाव बैठक घेतली. या बैठकीला भाजप तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, शहराध्यक्ष डॉ. अजय जोगळेकर, गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे, पाटबंधारे विभागाचे प्रकाश पोळ यांच्यासह इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी आमदार दरेकर बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त 13 गावे आणि 60 वाड्यांना 13 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तसेच टंचाईग्रस्त गावांना 64 बोअरवेल मंजूर झाल्या आहेत, मात्र 58,600 रुपयांत त्या मारुन देण्यास खाजगी बोअरवाले तयार नाहीत, अशी माहिती तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी यावेळी दिली. गावात टँकर येतो, मात्र पाणी साठविण्याची व्यवस्था नाही, ही बाब काही ग्रामस्थांनी यावेळी आमदार दरेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. भाजप आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पाच हजारांच्या पाणी साठवण टाक्या उपलब्ध करुन देण्यात येतील. त्या बसविण्यासाठी तहसिलदारांनी गरजवंत गावांची निवड करावी, असे आमदार दरेकर म्हणाले.
महाड शहरासह 22 गावांना पाणी पुरवठा करणार्या कोथुर्डे धरणांची उंची वाढविणे आणि खैरे धरणातून दासगाव परिसरातील गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही आमदार प्रवीण दरेकरांनी यावेळी केल्या.