फळे आणि भाजीपाला ही नाशवंत शेती उत्पादने असून, बाजारात पोहोचेपर्यंत ती खराब होण्यास सुरुवात झालेली असते. खराब मालाला दामही अल्प मिळतो. भारतात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन वाळून जाते किंवा खराब होते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी शीतगृहे शेतकर्याला हितकारक ठरू शकतात. विजेची अल्प किंवा अत्यल्प उपलब्धता असणार्या गावांमधील शेतकर्यांना ही यंत्रणा फायद्याची आहे.
फळे आणि भाजीपाला ही नाशवंत कृषी उत्पादने आहेत. भारतात एकूण बागायती उत्पादनांमध्ये 92.4 टक्के वाटा फळे आणि भाजीपाला पिकांचाच आहे. यातील अवघा 2.1 टक्के भाग प्रक्रिया उद्योगांकडून वापरण्यात येतो. परंतु, गंभीर मुद्दा असा की फळे आणि भाजीपाला उत्पादनांच्या 35 ते 40 टक्के भाग वाया जातो. यामुळे होणारे आर्थिक नुकसान प्रचंड आहे. या नुकसानीचा अंदाज घेणेही अवघड आहे; परंतु ब्रिटनमध्ये एका वर्षात जेवढ्या फळांचे आणि भाजीपाल्याचे उत्पादन होते, तेवढ्या फळांचे आणि भाज्यांचे नुकसान भारतात एका वर्षात होते. ही उत्पादने साठवून ठेवण्याच्या सुविधा आणि वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नसणे ही भारतातील प्रमुख अडचण आहे. त्यामुळे बाजारात पोहोचण्यापूर्वी हा शेतीमाल एकतर खराब होतो किंवा त्याची गुणवत्ता कमी होते. अशा स्थितीत आपल्याला नाशवंत शेती उत्पादनांची साठवणूक आणि वाहतूक या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
फळफळावळ आणि भाज्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. त्यासाठी वावही मोठा आहे. तथापि, त्यासाठी मालाची गुणवत्ता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तापमान आणि आर्द्रता ही फळे आणि भाजीपाल्याचे नुकसान करणारी दोन प्रमुख कारणे होत. ही पिके मुख्यत्वे भौतिक, जैवरासायनिक, जैविक आणि अन्य परिवर्तनांमुळे खराब होतात. तापमानात दहा अंशांचा फरक झाला तर नुकसान दुप्पट किंवा तिप्पट वाढते. फळे आणि भाजीपाल्यातील काही जैविक प्रक्रिया तोडणीनंतरही सुरू राहतात. त्यामुळेच फळे आणि भाज्यांच्या साठवणुकीसाठी थंड हवामान आणि अधिक आर्द्रतेची गरज असते. अधिक तापमान असताना फळांची तोडणी केल्यास ही फळे त्वरित कमी तापमानाच्या क्षेत्रात ठेवावी लागतात. तोडणीनंतर होणार्या जैविक प्रक्रिया यामुळे कमी होतात. बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे कमी तापमान आणि अधिक आर्द्रता निर्माण करून साठवणूक करणे ही एक गुणवत्तापूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी खर्चही कमी येतो.
आपल्या देशात दुष्काळी भाग मोठा असून, सरासरी तापमानही अधिक असते. हे हवामान बाष्पीभवनाद्वारे वातावरण थंड आणि आर्द्र बनविण्यासाठी उपयुक्त ठरते. या प्रक्रियेद्वारे फळे आणि भाजीपाल्याचे ‘शेल्फ लाईफ’ वाढविता येते. आपल्याकडील अनेक खेड्यांमधील ग्रामस्थांना विजेची सुविधा एकतर उपलब्ध नाही किंवा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक दुर्गम खेड्यांना तर आजही वीज उपलब्ध नाही. त्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया घडवून आणून शेतीमाल टिकवून ठेवणे अशा भागांमध्ये कठीण असते. परंतु, दुसरीकडे पृथ्वीला दरवर्षी प्रचंड प्रमाणात सौरऊर्जा मिळत असते. या सौरऊर्जेद्वारे आपण आपल्या या गरजा सहजपणे पूर्ण करू शकतो. आपल्याकडे वर्षातील सरासरी 250 ते 325 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. या काळात ‘सोलर रेडिएशन’ची तीव्रताही अधिक असते. या ऊर्जेचा योग्य वापर करून घेतल्यास आपण गरजेनुसार सौरऊर्जा प्राप्त करून घेऊ शकतो. त्यासाठी आधी आपण मानसिकदृष्ट्या तयार असायला हवे. त्यानंतर उपयुक्त उपकरणे तयार करणे आवश्यक आहे. अर्थातच, यासाठी मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे.
ज्या ठिकाणी सौरऊर्जा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, अशा ठिकाणी बाष्पीभवनाच्या प्रक्रियेसाठी या ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी सूर्यप्रकाशाद्वारे प्राप्त होणार्या ‘डीसी’ ऊर्जेचा वापर ‘डीसी’ संयंत्रे चालविण्यासाठी केला जातो. परंतु ‘डीसी’ संयंत्रांची किंमत अधिक असते. त्यामुळे ‘एसी’ यंत्रांचाच वापर प्रामुख्याने केला जातो, असे दिसून येते. त्यासाठी सौरऊर्जेतून प्राप्त झालेल्या ‘डीसी’ वीजप्रवाहाचे रूपांतर सौर इन्व्हर्टरच्या माध्यमातून ‘एसी’ वीजप्रवाहात करण्यात येते. या प्रक्रियेसाठी खर्चही कमी येतो. या बाबी लक्षात घेऊन सौरऊर्जेवर चालणार्या शीतगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. या शीतगृहांमध्ये कमी तापमानात फळे आणि भाजीपाल्याची साठवणूक केली जाते. शेतकर्याला बाजारपेठेतील गरजेप्रमाणे ताजी फळे आणि भाज्या उपलब्ध करता येतात आणि त्यांना किंमतही चांगली मिळते.
सौरऊर्जेवर चालणार्या या संयंत्रातील एअर कंडिशनर चालविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येतो. त्यासाठी 200 वॉट क्षमतेची आठ सौर पॅनेलची गरज असते. या पॅनेलपासून मिळणार्या डीसी सौरऊर्जेचे रूपांतर 3000 व्होल्ट अॅम्पियरच्या सौर इन्व्हर्टरद्वारे एसी वीजप्रवाहात करण्यात येते. या ऊर्जेच्या साह्याने एअर कंडिशनर चालवून वातावरण थंड आणि आर्द्र राखण्यात येते. या शीतगृहात
सौरऊर्जेद्वारे तापमान नियंत्रित करण्यात येऊन फळे आणि भाजीपाल्याची साठवणूक करण्यात येते. पावसाळ्याच्या दिवसांत सौरऊर्जा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे 12 व्होल्टच्या बॅटरीच्या साह्याने सौरऊर्जा संग्रहित केली जाते. त्याद्वारे शीतकरण केंद्र दिवस-रात्र सुरू राहू शकते. त्यासाठी 150 अॅम्पियरच्या चार बॅटर्यांचा वापर सामान्यतः केला जातो. एप्रिल ते जुलै या तीव्र उन्हाळ्याच्या कालावधीत बाह्य तापमान खूपच जास्त असते. त्या काळातही शीतगृहातील शीतकरण उपकरणाला अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. त्याकाळात 250 ते 300 अॅम्पियर क्षमतेच्या बॅटर्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या काळातही शीतगृहाचे कामकाज सौरऊर्जेच्या साह्याने विनासायास सुरू राहू शकते. शीतगृहातील तापमान रात्री अथवा दिवसाही थंड राखता येते. या शीतगृहातील तापमान बाह्य तापमानाच्या तुलनेत पाच अंशांनी कमी राखता येते. तसेच आर्द्रता सुमारे 60 टक्क्यांपर्यंत वाढविता येते. टोमॅटो, सफरचंद, बटाटे, हिरव्या भाज्या आदी फळे आणि भाज्या या शीतगृहात सुरक्षित राखता येतात. जास्त दिवस भाज्या ताज्या राहिल्यास शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
या तंत्रज्ञानामुळे बहुतांश भाज्यांचे आयुष्य (शेल्फ लाईफ) सुमारे 25 ते 30 दिवसांनी वाढविता येते, असे प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. शेतकर्यांना घरच्या वापरासाठीही हरघडी ताजी फळे आणि भाज्या उपलब्ध होऊ शकतात. तसेच हवे तेव्हा किंवा बाजारात चांगला दर असेल तेव्हा तो फळे आणि भाज्या विक्रीसाठी नेऊ शकतो. ग्राहकांनाही ताजी फळे आणि भाज्या मिळाल्याने ती अधिक भावाने घेताना ग्राहकांना फारसे काही वाटत नाही आणि शेतकर्याचा नफा वाढतो. आपल्याकडे ग्रामीण भागात भारनियमनाची समस्या फार मोठी आहे. अनेक ठिकाणी सहा ते आठ तासच वीज उपलब्ध असते. अशा ठिकाणी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हायला हवा. सौरऊर्जेद्वारे शीतगृह चालविण्याचा खर्च अत्यल्प असून, शेतकर्याने एकदा गुंतवणूक केल्यानंतर त्याला फळे आणि भाजीपाला साठवणुकीसाठी फारसा खर्चही करावा लागत नाही. त्यातही सौर पॅनेलवर सरकारकडून अनुदान मिळते. त्यामुळे एकंदरीने
सौरऊर्जेवार आधारित शीतगृह उभारणे आणि चालविणे शेतकर्यांसाठी हितावह ठरते.
सौरऊर्जेवर संचालित शीतगृह 1.83 मीटर लांब, 1.34 मीटर रुंद आणि 1.98 मीटर उंच असते. याची साठवणक्षमता सुमारे 4.85 घनमीटर एवढी असते. म्हणजेच किमान 1000 किलोग्रॅम फळे किंवा भाज्यांची साठवणूक या शीतगृहात केली जाऊ शकते. पॉलिकॉर्बोनेट शीट आणि गॅल्व्हनाईज्ड आयर्न शीट यांच्यामध्ये ग्लासवूलचे इन्सुलिन भरून हे शीतगृह तयार केले जाते. या सोयीमुळे आतील थंडावा बाहेर पडू दिला जात नाही. हे शीतगृह थंड ठेवण्यासाठी 0.8 टन प्रति 800 वॉट क्षमतेचा एअर कंडिशनर आवश्यक असतो. त्यामुळे आतील तापमान थंड राहते आणि फळे तसेच भाजीपाला प्रदीर्घ काळ टिकवून ठेवता येतो आणि त्याची गुणवत्ताही कायम राहते. शेतकर्यांनी या शीतगृहासाठी एकदा गुंतवणूक केली तर कायम नफा कमावता येणे शक्य असते.
-विठ्ठल जरांडे