पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 36 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी सात नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे आठ, खारघर सात, कळंबोली 13, नवीन पनवेल चार, तळोजा 10 आणि पनवेलमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. कळंबोलीमध्ये सेक्टर 5 पल्लवी सोसायटीतील 63 वर्षीय व्यक्ति, नवीन पनवेल सेक्टर 18 मधील 64 वर्षीय व्यक्ती आणि खारघर सेक्टर 4 ए /3 येथील 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 1016 रुग्ण झाले असून 709 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.78 टक्के आहे. 262 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सोमवारपर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी सात नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. त्यात सुकापुर तीन, उलवे दोन पारगाव आणि खैरणेमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. उसर्लीमधील पाच, सुकापुर आणि भोकर पाडा येथील प्रत्येकी एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
उरणमध्ये सात रुग्ण बरे; एकाची भर
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात सोमवारी (दि. 15) बौधवाडा येथील 57 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे, तर सात रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये तालुक्यातील म्हातवली मधील 20 व 55 वर्षीय महिला, भेंडखळ येथील 37 वर्षीय पुरुष, जेएनपीटी येथील 47 वर्षीय महिला, सोनारी येथील 60 वर्षीय पुरुष, वाणी आळी येथील 24 र्षीय पुरुष, सुर्कीचापाडा येथील 78 वर्षीय पुरुष असे सात रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 182 झाली आहे.
कर्जतमध्ये एकाला लागण; एकाचा मृत्यू
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण थांबत नाही असे दिसून येत आहे. कर्जत शहरात एका महिलेचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 47 झाली असून त्यात सहा जणांचे बळी गेले आहेत.
सावळे गावातील मारामारी प्रकरणी अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात आल्याने 32 वर्षीय पोलीस कर्मचारी यांना कोरोना झाला होता, त्यानंतर त्यांच्या पत्नीचे अहवाल 15 जून रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. तर पोशिर येथील 39 वर्षीय तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला आहे.