Breaking News

रायगडावरील सोहळे आवरा…!

शिवपुण्यतिथी, शिवराज्याभिषेक तारखेचा, तिथीचा अन् शाक्तपद्धतीचा, शिवजयंती अशा अनेक दिनी किल्ले रायगडावर लोटणार्‍या अलोट गर्दीत रायगड गुदमरू लागला आहे. त्याला श्वास घेता येत नाही, गडावरील पर्यावरण अन् पावित्र्य धोक्यात आले आहे. या सोहळ्यांचे आयोजन करणार्‍या आयोजकांना हात जोडून विनंती आहे… हे आता थांबवा अन्यथा किल्ले रायगडचे पावित्र्य आणि अस्तित्वच संपवून टाकलत, म्हणून छत्रपती शिवराय आपल्याला कधीच माफ करणार नाहीत…

अखंड महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान असलेल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध उत्सव आणि सोहळ्यांचा उत आला आहे. या सोहळ्यामध्ये जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे. तुझा सोहळा मोठा की माझा मोठा… तुमच्या सोहळ्यास हजारो आले आणि आमच्या सोहळ्यास लाखो आले. मंत्री, संत्री, व्हीआयपी यांना आणण्याची चढाओड आणि मावळ्यांची दमछाक. पुढारी आणि व्हीआयपीना स्लेशल रोपवे सेवा मात्र शिवभक्तांच्या वाट्याला खडतर पारपीट. हे सर्व कशासाठी? पुढार्‍यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी की किल्ले रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगासमोर नेण्यासाठी? या उत्सवातून नक्की काय साध्य होणार? याचा आम्ही कधी विचारच केला नाही.

मुळात किल्ले रायगडावर हजारो आणि लाखो लोकांची एकत्र येण्याची, राहण्याची क्षमता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले रायगड हे राजधानीचे ठिकाण होते. याची कल्पना आजच्या दिल्ली अथवा मुंबई या राजधानीच्या ठिकाणी केलीत, तर त्यातील महत्त्व आणि गांभीर्य लक्षात येईल, मात्र साडेतीनशे वर्षापूर्वी या राजधानी ठिकाणी केवळ महाराजांचे कुटुंबीय, अष्टप्रधान, सरदार त्याचे अंगरक्षक आणि शे-पाचशे मावळ्यांची सैनिकी तुकडी असा जवळपास पाच हजारांची वस्ती गडावर होती. या वस्तीसाठी लागणार्‍या मूलभूत सुविधा आणि त्यांच्या पिण्याच्या, सांडपाण्याचे योग्य नियोजन केलेले होते. रायगडावरील पर्यावरणाला कुठेही धक्का न लावता किल्ले रायगडावरी कामकाजाचे नियोजन केले जात होते. राजधानीचे संरक्षण करणारी लष्करी छावणी ही पाचाडला होती, तसेच गडावरील दैनंदिन कामासाठी लागणार्‍या कामगारांनाही गडावर राहण्याची परवानगी नव्हती. सूर्योदयाला गडाचे दरवाजे उघडले जायचे आणि सूर्यास्तानंतर ते बंद केले जायचे. दस्तुरखुद्द महाराजांनाही हे दरवाजे उखडण्याचे अधिकार नव्हते आणि याचे उदाहरण म्हणजे हिरकणी गवळण. महाराजांकडे याचना करूनही किल्ल्याचे दरवाजे उघडले नाही म्हणून तान्ह्या लेकाच्या ओढीने हिरकणी उभा कडा उतरून खाली आली. यानंतर हिरकणीच्या या साहसाचे महाराजांनी कैतुक केले आणि त्या ठिकाणी हिरकणी बुरुज बांधून आहोरात्र पहारे बसविले. रायगडाची मर्यादा तेव्हा पाळली जात होती, मात्र तीच मर्यादा आम्ही पायदळी तुडवत आहोत. राजधानीचे निर्माते हिरोजी इंदुलकर यांच्या नावाच्या पायरीवर पाय ठेवण्याचा मान आणि अधिकार केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच… मात्र आज लाखो पाय निर्दयपणे ही पवित्र पायरी तुडवत आहेत. ‘रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हास माणीक मोती दुसरी दौलत नाही.’ असे अभिमानाने आम्ही म्हणतो आणि त्याच रायगडाची धूळ मस्तकी लावण्याऐवजी पायदळी तुडवतो. प्रत्येक शिवभक्ताने काय तर प्रत्येक भारतीयाने रायगडावर आलेच पाहिजे यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. प्रत्येकाने किमान आयुष्यात एकदा तरी रायगडी यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या कीर्तीचा प्रत्यक्षातील रायगडाच्या चराचरातील सहवास अनुभवावा. शिवरायांच्या कार्याची महती उभा सह्याद्री आणि बलाढ्य रायगड पाहुनच पटू शकते.

किल्ले रायगडाचे हे सामर्थ आणि पावित्र्य टिकवायचे असेल, तर आम्हालाच काही बंधणे घालून घ्यायला हवीत. शिवरायांच्या पराक्रमाचे दिवस प्रत्येकाने प्रत्येक दिनी साजरे करावेत यात दुमत नाही, मात्र त्याच रायगडावर शक्तिप्रदर्शन नको, हीच भावना आहे. किल्ले रायगडावर एकाच दिवशी हजारो, लाखो लोक आल्याने याचा ताण आणि प्रभाव रायगडाच्या पर्यावरणावर होत आहे. या गर्दी आणि मानवी हस्तक्षेपामुळे रायगडावर पुरातन वास्तूंना धोका निर्माण झाला आहे. समुद्रसपाटीपासून 1100 मीटर उंचीवर पाणी आणि इतर सुविधा निर्माण करून देण्यास प्रशासनाला मर्यादा येत आहेत. रायगडावर शौचालयाचा प्रश्न अत्यंत गंभीर होतो आणि या काळात संपूर्ण रायगडाला हागणदारीचे स्वरूप प्राप्त होते. या सोहळ्यातून आम्ही काय साध्य करतो की रायगडाचे पावित्र्य नष्ट करतो याचे आकलन प्रत्येकाला होणे गरजेचे आहे.

रायगडाचे हे पावित्र्य आणि पर्यावरण टिकविण्यासाठी आयोजकांनी काही खास मंडळीच्या उपस्थितीत गडावर राज्याभिषेक अथवा अभिवादन करावे आणि मुख्य कार्यक्रम पाचाड येथे घ्यावेत, जेणे करून रायगडावर अचानक गर्दी होणार नाही. असे केल्याने रागडावरील कार्यक्रमदेखील होतील आणि रायगडाचे पावित्र्य आणि पर्यावरणही अबाधित राहील, तसेच मागील वर्षी महादरवाजा येथे चेंगराचेंगरी होऊन जशी दुर्घटना झाली होती तसे होणार नाही, तसेच पोलीस आणि प्रशासनावरील ताणही कमी होईल. मुळातच रायगड किल्ला हा केंद्रीय भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. पुरातत्त्व कायद्यानुसार रायगडावर सूर्यास्त ते सूर्योदय राहण्यास अथवा वास्तव्यास मनाई आहे. तरीही हा मनाई आदेश झुगारून आपण रायगडाचेच नुकसान करत आहोत ही भावना सर्वांना होणे गरजेचे आहे. गडाचे पावित्र्य राखणे हे सर्वस्वी शिवभक्तांच्या हाती आहे… या पुढे त्यांनी ठरवावे, रायगडाला सुवर्ण सिंहासन हवे, गर्दीचा महापूर हवा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास हवा हे ठरविण्याची अधिकार केवळ आणि केवळ

शिवभक्तांचाच आहे…!

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply