महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात फळे व भाज्या नेपाळमध्ये जात असल्यामुळे राज्यातील व्यापार्यांनाही या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. आजवर युरोप-अमेरिकेतील देश आयात फळभाज्यांची प्रयोगशाळेत बारकाईने तपासणी करून नंतरच प्रवेश देत, पंरतु आता नेपाळने देखील ज्या फळभाज्यांना प्रयोगशाळेत हिरवा कंदील मिळेल, त्यांनाच नेपाळमध्ये प्रवेश मिळेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यापारी व शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासून मेंदूज्वराने थैमान घातले आहे. जवळपास अडीचशे मुले या तापाशी झुंज देत असून बिहारमधील अतिशय बकाल अवस्थेत असलेली आरोग्य यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आरोग्य संकटाला तोंड देण्यात सपशेल अयशस्वी ठरली आहे. आतापर्यंत संपूर्ण बिहारभरात सुमारे 150 मुलांचा या तापाने बळी गेला आहे. बिहारमध्ये लिचीच्या फळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकाचे वटवाघळे, तसेच अन्य कीटकांपासून रक्षण करण्याकरिता पिकांवर अतिशय तीव्र कीटकनाशकांची वारेमाप फवारणी करण्यात येते. या फवारणीचा प्रभाव सर्वसाधारणपणे तीसएक दिवस राहतो. यंदा त्यापूर्वीच लिचीची फळे तोडली गेली व ती राज्यातील मुलांनी खाल्ल्यामुळे त्यांना मेंदूज्वराची लागण झाल्याची चर्चा सुरू आहे. कुपोषित मुलांनी उपाशी पोटी कीटकनाशकबाधित लिची फळाचे सेवन केल्यास त्यांना मेंदूज्वराची लागण होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात. गुराढोरांच्या औषधोपचारात वापरली जाणारी औषधेही पाण्यात मिसळून कीटकनाशकांसारखी लिचीवर फवारली गेली. माणसांनी या औषधांचे सेवन केल्यास ती अतिशय घातक ठरू शकतात हे माहीत असूनही त्यांचा फवारणीसाठी वापर केला गेला. कुठल्याही स्वरूपाच्या कीटकनाशकाची फवारणी प्रमाणात केल्यास त्यातून मनुष्यास बाधा होत नाही, परंतु व्यापार्यांकडून फळ टिकण्यासंदर्भात दबाव येत असल्यामुळे शेतकरी कुठलाही मुलाहिजा न बाळगता पिकावर वारेमाप फवारणी करतात. या औषधांची फवारणी करण्यावर बिहारच्या सरकारने बंदी घालायला हवी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे, परंतु मुझफ्फरपूरमधील घटनेने भारतातील शेतीमधील कीटकनाशकांच्या वापराकडे जगाचे लक्ष जायचे ते गेलेच आहे. यापूर्वी युरोप-अमेरिकेने भारतीय फळे वा भाज्या घेताना कीटकनाशकांच्या संदर्भात तपासणी करून घेण्याची दक्षता बाळगल्याचे ऐकिवात होते, परंतु आता मुझफ्फरपूरमधील घटनेमुळे एकीकडे बिहार सरकारवर टीकेची झोड उठलेली असताना नेपाळसारख्या देशानेही केमिकलयुक्त फळभाज्यांना नेपाळमध्ये नो एंट्री जाहीर केली आहे. भारतातून येणार्या भाजीपाल्यात, तसेच फळांमध्ये रसायनांचा अंश सापडल्यामुळे नेपाळ सरकारने हे कठोर धोरण जाहीर केल्याचे सांगितले जाते. जगभरातील अनेेक प्रगत देशांमध्ये सेंद्रीय खताच्या साह्याने व कुठलीही रासायनिक फवारणी न करता पिकवलेल्या फळभाज्यांची मागणी प्रचंड वाढली आहे, परंतु आपल्याकडे मात्र अद्यापही शेतकरी रासायनिक फवारणीचा आधार सोडण्यास उत्सुक दिसत नाही. सेंद्रीय खताचा वापर प्रभावी होण्यासाठी जमिनीचा कस पुन्हा पूर्ववत होण्याची गरज असते, परंतु रासायनिक खतांची व फवारणीची मदत घेतल्याशिवाय पीक चांगले टिकून भरघोस वाढेल आणि हाती चांगला पैसा लागेल याची खात्री आपल्या शेतकर्यांना अद्यापही वाटत नाही.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …