Breaking News

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी…

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, असे कवी सुरेश भट म्हणतात. हे खरे असल्याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येत असतो. त्यामुळेच राज्यातील सीबीएससी आणि आयसीएसइसह सर्व परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक राहील याकरिता कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधान परिषदेत केली. तेव्हा आता तरी मराठी भाषेला चांगले दिवस येतील असे समजायला हरकत नाही. डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढत आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृध्द केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाही या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,  धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, म्हणणारे आम्ही आज सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावत असताना आपल्याला या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही. मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का? जवळजवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावनाही असेल किंवा कळपातली मानसिकतासुद्धा असेल कदाचित. कधी कधी वाटतं असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोलीभाषा म्हणूनच नाही ना उरणार? किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार? सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय, पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का? असे असंख्य विचार मनात येतात.  

मराठी भाषेचे वय हे साधारणपणे 1500 वर्षे मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते. देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङ्मयात महत्त्वाची भर घातली. वारकरी सांप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखामेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याचे दालन वैविध्यांनी समृद्ध केले. यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांच़ा काळ सुरू झ़ाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झ़ाल्याने मराठी भाषेत ’तारीख’सारख्या अनेक फारसी शब्दांचे आगमन झाले. अशा धकाधकीच्या काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली.

शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. या काळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केल्या. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झाले. याच काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच काळात बखर लेखनाची सुरुवात झ़ाली.

इ. स. 1947नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेच़ा दर्जा दिला. इ. स. 1960मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेच़ा मुकूट प्राप्त झाला. राजा केसिदेवराय याच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख-चामुण्डराजे करवियले हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समज़ूत आता मागे पडली असून तो मान आक्षी शिलालेखाला मिळाला आहे. आक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिण दिशेस पाच किमी अंतरावर अलिबाग- मुरूड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख 1883च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे.

मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते.

भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगढ राज्यांत आणि दमण व दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात असलेले भाग-दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद (गुजरात), बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार (कर्नाटक), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू), वगैरे. 36 राज्ये आणि 72 देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतर अनेक देशांमध्येही मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.

मराठी भाषेच़े वय हे साधारणपणे 1500 शे वर्ष मानले ज़ाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले ज़ाते. मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. ’अमृतासही पैजा जिंके’ अशा शब्दांत ज्ञानेश्वरांनी या भाषेचं कौतुक केलं होतं. जसा काळ बदलतो तसे भाषेमध्येही बदल होतात. बोली भाषादेखील तितक्याच समृद्ध आहेत. त्याची लाज वाटण्यासारखं काहीच नाही. उलट बोली भाषेमुळे आपण विशिष्ट प्रांतांची ओळख मोठी करतोय असं त्याच्याकडे पाहून त्याचा संवर्धन करणं आवश्यक आहे. मराठी भाषेच़ा उदय संस्कृतचा प्रभावाखाली निर्माण झ़ालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झ़ाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेच़ा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीचा यादवांचा काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झ़ाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली ज़ाते. इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. 1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली.महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.

भारताचा राज्यघटनेतील 22 अधिकृत भारतीय भाषांचा यादीत मराठीच़ा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीच़ा वापर शासनाचा सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणार्‍या पत्रव्यवहाराच़े उत्तर मराठीतच़ दिले जाते. असे असले तरी राज्यकारभार आणि पत्रव्यवहार लोकांचा सोयीसाठी इंग्रजीतून केला जातो. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे. मराठी  भाषेचं एक खास वैशिट्य म्हणजे तिच्या बोलीभाषा.  मुंबई, पुणे नाशिक अशा महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये अनेकजण प्रमाण भाषेतील मराठीमध्ये बोलतात पण विविधतेने नटलेल्या आपल्या भारतामध्ये दर 12 कोसानंतर संस्कृती बदलते आणि सोबतच भाषादेखील बदलते. मराठीप्रमाणेच प्रदेशागणिक बदलत जाणार्या बोली भाषेची एक वेगळी ओळख आहे. काही लोकांची त्यावरून थट्टा होते पण आजकाल सिनेमा, टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये बोली भाषेचा वापर वाढल्याने आता प्रांताच्या सीमा पुसट होऊन अनेकांनी ते शब्द नेहमीच्या बोलण्यात वापरायला सुरूवात केली आहे. मराठी ही एक समृद्ध भाषा असली तरीही त्याच्या 13 खास बोलीभाषांची मज्जादेखील काही और आहे.

अमृतातेही पैजा जिंकणार्‍या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसत असताना राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना दिसते  त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.  तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर. अन्य राज्यांचा विचार केला तर तेथे राज्य भाषेला महत्व दिले जाते. शाळा असो नाहीतर सरकारी नोकरी त्यासाठी राज्याभाषा येणे आवश्यक असते. तेथे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असलेला दिसतो. दक्षिणेकडील राज्यात तर ते प्रकर्षाने जाणवते. आपल्या राज्यात मात्र मराठीची सक्ती करावी लागते हा केवढा विरोधाभास आहे.

मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि  मराठी भाषेच्या विकासासाठी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागतात.संवर्धनासाठी चळवळ करावी लागते. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा सक्ती, मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा, मराठी भाषा भवन, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न करावे लागतात हेच दुर्दैव आहे. राज्य शासनाला आपल्या कारभारात मराठीचा वापर करावा यासाठी आठ वेळा अध्यादेश काढावे लागले  मराठीच्या अंमलबजावणीकरता आतापर्यंत सहा परिपत्रके या आधीच्या सरकारने काढलेली आहेत. तर सध्याच्या सरकारकडून दुसर्‍यांदा असे परिपत्रक निघते आहे. शासकीय कर्मचार्‍यांनी मोबाईलवर मराठीचा वापर करावा म्हणूनही  परिपत्रक निघालेले आहे. प्रत्येक विभागात ’मराठी भाषा दक्षता अधिकारी’ यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मात्र अशा अधिकार्‍याच्या निवडीचे निकष आणि असा अधिकारी कधीपर्यंत निवडावा याला काही मुदत, याची कुठलीही ठोस नोंद या परिपत्रकात नाही. थोडक्यात शाळेत ’वर्ग प्रतिनिधी’ निवडतात तसे शासकीय विभागांमध्ये ’मराठी भाषा दक्षता अधिकारी’ निवडले जातील असंच दिसतंय.   

सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतली  जात आहे ही चांगली गोष्ट आहे.पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल? मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची ‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या 24 संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा सक्ती, मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा, मराठी भाषा भवन, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न याबाबत मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचलेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे असे म्हटले आहे.

-नितीन देशमुख

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply