Breaking News

सिडकोमधून हिरेच बाहेर पडतील

अशोक शिनगारे यांचे प्रतिपादन; महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळात गुणवत्ता ठासून भरली आहे, तसेच पैलू पाडणार्‍यांचीही  कमतरता नाही, त्यामुळे यापुढे सिडको महामंडळातून केवळ हिरेच बाहेर पडतील असे गौरवोद्गार सिडको महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांनी रविवारी (दि. 17)  सिडकोच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात काढले.

सिडको सभागृह, सातवा मजला, सिडको भवन येथे अत्यंत उत्साहात व थाटामाटात सिडकोचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नगर नियोजन व विकासाची गौरवशाली परंपरा लाभलेले सिडको महामंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे या समारंभास एक विशेष महत्व प्राप्त झाले होते.

या वेळी मुख्य लेखा अधिकारी  बिवलकर, व्यवस्थापक (वसाहत-1) फैय्याज शेख, सिडको कर्मचारी संघटना अध्यक्ष निलेश तांडेल, उपाध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस जे. टी. पाटील,  बी. सी. एम्प्लॉईज संघटना अध्यक्ष मिलिंद बागूल,  सिडको इंजिनिअर्स असोसिएशन अध्यक्ष, सुरेश ठाकूर होते. बहुसंख्य आजी अधिकारी व कर्मचार्‍यांसोबतच या महत्वपूर्ण सोहळ्यास सिडकोचे माजी अधिकारी-कर्मचारी देखील आवर्जून उपस्थित होते.

अशोक शिनगारे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील इतर प्रदेशात एवढेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही उदा. रायपूर येथे सिडको महामंडळाविषयी एक आत्मियता दिसून येते व सिडकोचे नगर नियोजनातील कौशल्य नेहमीच वाखाणले जाते. मी आजपर्यंत 14-15 वेगवेगळ्या महामंडळात कार्यरत होतो पण स्वत:च्या महामंडळाविषयी एवढी आत्मियता मी फक्त सिडको महामंडळातच बघितली.

 निलेश तांडेल यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीसच सिडकोच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असणार्‍या अनेक आजी-माजी अधिकार्‍यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी सिडकोप्रति केलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, प्रारंभी सिडकोविषयी येथील प्रकल्पग्रस्तांची अतिशय प्रखर भावना होती, पण त्यावेळी हेही मान्य केले पाहिजे की अत्यंत कमीत कमी मालमत्ताकरात देखील सिडको महामंडळाने अतिशय उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा नवी मुंबईतील नागरिकांना पुरविल्या आहेत. सिडको व्यवस्थापनाने जर सहकार्य केले तर भारतातील नामवंत कार्पोरेट कंपन्याशी सिडको महामंडळ स्पर्धा करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस सिडको आर्टिस्ट कंबाईनच्या वतीने गणेश वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर 49व्या वर्धापनदिनानिमित्त अशोक शिनगारे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य केक कापण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले. या कार्यक्रमाला सिडको अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबरच त्यांचे कुटुंबियही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिडको महामंडळाने गेल्या 49 वर्षात 35-40 लाख नागरिकांसाठी निवारा प्रदान करण्याबरोबरच रोजगार, सामाजिक सुविधाही सक्षमतेने उपलब्ध करून दिल्या आहेत. सिडकोतील अधिकारी-कर्मचार्‍यांची मेहनत केवळ शारीरिक स्वरूपाची नसून ते भावनिक व बौद्धिकरित्याही सिडको महामंडळाशी निगडीत झाले आहेत.

-अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply