Breaking News

मान्सूनच्या प्रतीक्षेने चिंता

प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाण्याचे काहिसे उष्ण प्रवाह वाहतात, तेव्हा जी परिस्थिती उद्भवते, तिला एल निनो असे संबोधले जाते. गेल्या वर्षी 9 जूनला मुंबईत मान्सून अवतरला. 2009 खालोखाल मान्सूनला दुसर्‍या क्रमांकाचा विलंब 2016 साली झाला होता. त्या वर्षी मुंबईत 20 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. तेव्हाचाही विलंब एल निनोमुळेच होता. यंदा मुळात केरळात मान्सूनने उशीरा हजेरी लावली आणि त्यानंतर वायु चक्रीवादळामुळेही मान्सूनला आणखी विलंब झाला.

नेहमीपेक्षा विलंबाने आगमन करणार्‍या मान्सूनने अखेर महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला आहे. मराठवाडा, विदर्भात सगळीकडे पावसाने हजेरी लावली असली तरी प्रतिवर्षी साधारणत: 10 जूनपर्यंत मुंबईला हमखास चिंब भिजवणार्‍या मान्सूनने यंदा 25 तारीख उजाडली तरी मुंबईत आगमन केलेले नाही. मे महिन्यात वळीवाची एकही सर मुंबई आणि परिसरात यंदा कोसळली नाही. अवघा मे आणि आतापर्यंतचा जूनही एखाद-दुसर्‍या सरीचा अपवाद वगळता कोरडाच गेल्याने या बदलत्या हवामानाबद्दल लोक धास्तावले आहेत. यंदा मुळातच केरळातही मान्सूनचे आगमन तब्बल सहा दिवस उशीरा झाले. त्यानंतर मजल दरमजल करीत दक्षिण कोकणापर्यंत येऊन पोहोचलेला मान्सून पुढील वाटचालीत मात्र रेंगाळला. मुंबई परिसराला आणखी दोन दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तवले आहे. एकीकडे पावसाला विलंब आणि दुसरीकडे घामाच्या चिंब करणार्‍या धारा यांनी लोक हैराण झाले आहेत. मुंबईच्या समीप अलिबागपर्यंत मान्सून दाखल झाला आहे. तसा नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये देखील पावसाच्या सरींनी सोमवारी काहिसा गारवा निर्माण झाला. परंतु तो पूर्वमोसमी पाऊस असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मुंबईतील मान्सूनचे आगमन हे 25 किंवा 26 जूनला होईल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे मुंबई वा आसपासच्या परिसरात वास्तव्य करून असलेल्या मंडळींनी पावसाला हा इतका विलंब झाल्याचे कधीही पाहिलेले नाही. गेल्या दशकभरातील मान्सूनला होणारा हा सर्वात मोठा विलंब असल्याचे हवामान खात्यानेही म्हटले आहे. मात्र अशा तर्‍हेच्या तुलनेसाठी दहा वर्षांचा काळ अपुरा मानला जातो. गेल्या शंभर वर्षांच्या कालखंडात पाहिले तर मान्सूनला मुंबई परिसरात अवतरण्यास याहूनही अधिक विलंब झालेला आहे, असे तज्ज्ञ सांगतात. 2009 साली मान्सून 27 जूनला मुंबईत दाखल झाला होता. हा विलंब सगळ्यांना ज्ञात असलेल्या एल निनोमुळे होता. खाजगी हवामान कंपन्यांच्या मते मात्र जूनच्या 15 तारखेलाच मुंबई आणि कोकण परिसरात मान्सूनचे आगमन झाले आहे. अर्थात पावसाला मान्सून म्हणायचे वा पूर्व मान्सून याविषयीचे तांत्रिक मतभेद तज्ज्ञांमध्ये असू शकतील. परंतु सामान्य माणसाला तरी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मे-जून महिन्यात नेहमीसारखा पाऊस कोसळताना दिसलेला नाही हेच खरे आहे. त्यामुळे

समाजमाध्यमांवर झाडे लावण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बियांचे चेंडू विकत घेऊन ते माळरानावर फेकण्याची किंवा प्रत्यक्षात कुठेतरी झाडे लावण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करीत आहेत. मान्सूनच्या विलंबामुळे का होईना, निसर्गातील समतोल राखण्याचे, झाडांना जपण्याचे महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच जितके लवकरात लवकर समजेल तितके भलेच आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply