अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मान्सून पूर्व पावसाने रागडकराना दिलासा दिला. परंतु मागील काही दिवसांपासून पाऊसधारा फारशा बरसल्याच नाहीत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. ढगात नाय… पण शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आलायं.., अजून दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास भाताची रोपे करपण्याची शक्यता आहे.
जूनच्या सुरूवातीला धूळ वाफयावर भाताची पेरणी करण्यात आली होती. मान्सूनपूर्व पावामुळे दक्षिण रायगडच्या महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला होता. मान्सून पूर्व पावसामुळे भात रोपे चांगली झाली. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. कडकडीत उन्हात रोप करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. खारेपट्ट्यातील भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. आता रोपांना पावसाची गरज आहे. अजून तीन-चार दिवस पाऊस झाला नाहीतर पुन्हा पेरणी करावी लागेल, यासाठी शेतकरी चिंतातूर झाला आहे.
जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी भात रोपवाटिका तयार करण्याकरिता बियाण्याची पेरणी झालेली आहे. रोप वाटिकेमधील तणांच्या बंदोबस्ताकरिता पेरणीनंतर वाफे ओले होताच प्रति लिटर पाण्यात ऑक्सीदियाराझिल 3 मिली याप्रमाणे 5 लिटर एक आर क्षेत्रावर समप्रमाणात फवारावे. तणांचे प्रभावी नियंत्रण करून जोमदार भातरोपे तयार करण्यासाठी भात रोपवाटिकेत प्रतिहेक्टर 1 टन गिरिपुष्पाचा पाला भात रोपाटिकेमध्ये मोकळ्या जागेत पसरावा आणि शिफारशीप्रमाणे खते द्यावीत. पेरणीनंतर 15 दिवसांनी 1 आर क्षेत्राकरिता एक किलो युरियाचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थितीत रोपवाटिकेकरिता पोषक पाऊस आहे. तथापि पावसात खंड
पडल्यास रोपवाटिकेला पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.