पुणे ः गोवा मुक्ती संग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक मोहन तथा दादा रानडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. काही महिन्यापूर्वी त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरु होता. तसेच त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनदेखील कमी झाले होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकुर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी विशेष लक्ष घातले. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व गोवा सरकारमधील मंत्री यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर कर्वेनगर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रानडे अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मुक्तीसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते, ही रानडे यांची महत्त्वाची ओळख आहे. रानडे यांना पोर्तुगालात 26 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गोव्याच्या मुक्तीनंतरही त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला आणि 1969 मध्ये त्यांची सुटका झाली.
रानडे यांनी शिक्षकी पेशा स्वीकारून गोव्यात प्रवेश केला. पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. बेती येथील पोलिस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आणि 1955 मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची रवानगी पोर्तुगालमध्ये लिस्बन येथे झाली. 1962 मध्ये केंद्र सरकारच्या लष्करी कारवाईनंतर 450 वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून गोवा स्वतंत्र झाला. रानडे यांच्या सुटकेसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आवाज उठविला होता. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती. तामीळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. आण्णादुराई यांनी पोप पॉल यांची व्हॅटिकन सिटीत भेट घेऊन रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. पोपनी हस्तक्षेप केल्यानंतर रानडे यांची सुटका झाली.
रानडे यांचे गोवा मुक्तीसंग्रामातील अनुभवांवर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र तसेच ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा सरकारने ‘गोवा पुरस्कार’ तसेच केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांना गौरविले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper