Breaking News

हिरकणीवाडीतील रस्ता खचतोय!

माती भरावाऐवजी पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

महाड : प्रतिनिधी        

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी परिसरातील जमिनीला 2005पासून सातत्याने भेगा पडत आहेत. पावसाळ्यात या परिसरात दरड कोसळण्याचा तसेच संपूर्ण हिरकणीवाडीच जगाच्या नकाशावरुन गायब होण्याचा धोका असतो. रायगड रोप वेकडे जाणार्‍या रस्त्यावर गेल्या काही वर्षापासून पडलेल्या भेगा आजदेखील वाढत असल्याचा अनुभव स्थानिक ग्रामस्थांना आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने आदळून अपघातात वाढ झाली असल्याची माहिती उपसरपंच गणेश औकीरकर यांनी दिली.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हिरकणीवाडी आहे. याच ठिकाणी किल्ल्यावर जाण्यासाठी रायगड रोप वेची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. एकीकडे किल्ल्याचा उभा डोंगर तर दुसरीकडे दरीचा भाग अशा भौगोलिक स्थितीत हिरकणीवाडी वसलेली आहे. काही वर्षापासून हिरकणीवाडीमध्ये कायम जमिनीला भेगा पडत आहेत. ऐन पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते.   त्यामुळे हिरकणीवाडी ग्रामस्थांना महसूल विभागाकडून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरक्षित जागी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात. रायगड रोप वेकडे जाणार्‍या रस्त्यावर पडलेली भेग आजही दुरुस्त झालेली नाही. या ठिकाणी रस्त्याला तीव्र उतार निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात हा रस्ता असला तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने खचलेल्या जागी मातीचा भराव टाकून रस्तादुरुस्तीचे काम केले होते, तरीदेखील इथला भाग सतत खचत असल्याने तेथे खड्डा तयार होवू लागला आहे. ज्या ठिकाणी भेग पडली होती, तेथील रस्ता खचून गेला असल्याचे स्पष्ट दिसू लागल्याचे माजी सरपंच लहू औकीरकर यांनी सांगितले. रात्रीच्या काळोखात विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणचा रस्ता दिसून येत नसल्याने अपघात होत आहेत. दोन दिवसापूर्वी असाच अपघात होवून पर्यटक जखमी झाल्याचेदेखील लहू औकीरकर यांनी सांगितले.

रायगड रोप वेमार्गावर पडलेली भेग दुरुस्त करताना माती भराव करण्यात आला होता. हा भराव आजदेखील खचत असल्याने तेथे खड्डा तयार होवून अपघात होत आहेत. त्यामुळे येथे माती भरावाऐवजी पुलाची गरज आहे.

 -गणेश औकीरकर, उपसरपंच,  छत्री निजामपूर ग्रामपंचायत, ता. महाड

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply