
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने दररोज हजारो लोकांना जेवण पुरविले जात असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यामुळे जाही लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मोलमजुरी करणारे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून पनवेल परिसरातील 18 हजारांहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे लॉकडाऊन वाढल्यानंतर हातावर पोट असलेले, मोलमजूर तसेच बेघर लोक अन्नावाचून वंचित राहू नयेत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्या वतीने ’मोदी भोजन कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून खारघर, पनवेल, तक्का, कामोठे, कळंबोली येथे दररोज किमान अडीच हजार लोकांना तयार जेवण पुरविले जात आहे. हे अन्न फॉईल कंटेनरमध्ये पॅक करून आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून वाटप केले जात आहे. त्यामुळे गरीब, गरजू लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे या उपक्रमात जातीने लक्ष घालत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहकार्य देत आहेत.