Breaking News

भिडस्त

साध्या गरीब माणसांवर सगळे अन्याय करीत असतात असे आपण म्हणतो. काही माणसांचा स्वभाव भिडस्त असतो. त्याचा गैरफायदा अनेक जण घेत असतात. पण ही माणसे त्याला कसे बोलायचे म्हणून गप्प बसतात. हे पाहून कधी कधी वाटते यांना असेच पाहिजे. अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हणतात ते काही चूक नाही. याचा अनुभव मला एकाच महिन्यात प्रवासात असताना तीन वेळा आला.

काही दिवसापूर्वी महाडहून खेड-मुंबई गाडीतून पनवेलला येत होतो. गाडी संध्याकाळी 6.50 वाजता रामवाडी स्थानकातून निघाली, गाडी पेण रेल्वे स्टेशनजवळ आली आणि एसटीच्या लाईन चेकिंगवाल्यांची गाडी समोर उभी होती त्यांनी गाडी उभी केली. त्या गाडीतील दोघे जण घरी जाण्यासाठी गाडीत चढले. वाहकाच्या शेजारी कोलाडला एक तरूण बसला होता. त्याला वाहकाने ओ तुम्ही इथून उठा, असे त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला म्हणाला, तो तरूण प्रवाशी बिचारा उठला. वाहकाने  मागे बसण्यासाठी चाललेल्या आपल्या व्यक्तिला  साहेब, इकडे या म्हणून आपल्या शेजारी जागा दिली. तो उठलेला प्रवाशी पेण पासून पनवेलपर्यंत उभा होता. खरे तर आपल्या अधिकार्‍याला जागा देण्यासाठी त्याला उठवणे ही वाहकाची चूक होती. त्याने प्रवाशाला उठवून जागा देण्याऐवजी स्वत: उभे राहून आपल्या साहेबाला जागा द्यायला हवी होती. त्या प्रवाशाला पनवेलला उतरताना विचारले तुम्ही का उठलात. तो म्हणाला काय करणार तो वाहकाचा कोणी तरी साहेब होता म्हणून त्याने मला उठायला सांगितले मग काय करणार म्हणून मी उठलो.

 औरंगाबाद-पुणे गाडी नगरला स्टॅन्डला आली असता एक तरूणी गाडीच्या महिला वाहकाजवळ आली तिने आपल्या मोबाईलवर एसटीत अधिकारी असलेल्या वडिलांजवळ त्या महिला वाहकाचे बोलणे करून दिले. तिला मधल्या गावात उतरायचे होते. साहेबाची मुलगी म्हटल्यावर तिच्यासाठी अगोदरच बसून आलेल्या एका गरीब तरूणाला सीटवरून उठण्यास सांगून उभे केले. या मुलीने आपले गाव आल्यावर त्याला जागा न देता दुसर्‍याच व्यक्तिला त्या ठिकाणी बसवून ती उतरून गेली. महिला वाहकाने त्या व्यक्तिला सांगितले की, ही त्या तरूणाची जागा आहे पण त्याने उठण्यास नकार दिला. त्या तरूणीला जागा देण्यासाठी उभा राहिलेला बिचारा तरूण

मात्र पुण्यापर्यंत उभा राहिला.

पनवेल आगाराच्या गाडीच्या एका वाहकाने पनवेलला येताना महाडपासून आपल्या बाजूच्या सीटवर कोणाला बसूनच दिले नाही. कोणी बसायला आल्यास तो त्याला मागे पाठवत होता. गंमत म्हणजे बराच वेळ तो चालकाच्या केबिनमध्ये असलेल्या सीटवर बसून रहात होता त्यामुळे खराब रस्त्यावर त्रास होत असताना ही अनेकांना नाईलाजाने मागे बसावे लागत होते. पण त्याला याबद्दल कोणी विचारले नाही. अशा भिडस्त स्वभावामुळे अन्याय करणार्‍याला आपण बरोबरच आहोत असे वाटते आणि ते गरीब माणसावर अन्याय करीतच राहतात.

अनेक वेळा सामान्य गरीब प्रवाशाला आपल्याला कंडक्टरने गाडीत घेतले म्हणजे खूप उपकार केले असे वाटत असते. त्यात आरक्षण नसताना जागा दिली तर त्याच्या उपकाराच्या दबावाखाली असल्यासारखा तो वागतो. त्यामुळे वाहक सांगेल तसे ते करतात. त्यामुळेच वरील तरूण आपल्याकडे तिकीट असताना ही वाहकाने सांगताच उभे राहिले. प्रवाशी नसल्याने भारमान कमी येत असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात. एसटी तोट्यात असल्याचा अहवाल आहे. प्रवाशी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असताना अगोदरपासून बसून आलेल्या प्रवाशाला आपल्या अधिकार्‍यासाठी उभे करणे कोणत्या नियमात बसते. हा प्रश्न त्या कंडक्टरला तर पडलाच नाही, पण त्या अधिकार्‍याने ही त्याला असे करू नको सांगितले नाही हे विशेष.

-नितीन देशमुख (7875036536)

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply