Breaking News

पावसामुळे शिक्षकांची वाट बिकट माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांचा रस्ता बंद

कर्जत : बातमीदार

माथेरानच्या डोंगरात जुम्मापट्टी गावाच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्याचा रस्ता पावसामुळे खचून गेला आहे. त्यामुळे त्या भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये येणारे शिक्षक हे शाळेत वेळेवर पोहचत नाहीत. या शाळांमधील विद्यार्थी हे शाळेत येतात आणि गुरुजी आले नाहीत म्हणून पुन्हा घरी जातात. दरम्यान, वन जमिनीतून जात असलेला रस्ता प्राधान्याने तयार करावा, अशी मागणी परिसरातील आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.

जुम्मापट्टीपासून किरवली या कर्जतजवळच्या ग्रामपंचायतीपर्यंत 17 आदिवासी वाड्या असून, त्या वाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता  नाही. वन जमिनीवर वसलेल्या त्या आदिवासी वाड्यात जुम्मापट्टी भागाकडून आसलवाडीपर्यंत जाण्याचा रस्ता आहे. हा रस्ता डोंगरच्या कडेने जात असून, त्या रस्त्यात तीन नाले आहेत. माथेरानच्या डोंगरातील पाणी त्या नाल्यातून वाहून येत असते. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे पायवाटेच्या रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे नवीन व्यक्ती त्या रस्त्याने  ये जा करू शकत नाही. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदे शाळेत  शिक्षक पोहचले नाहीत. त्यामुळे मागील काही दिवस आसलवाडी, बेकरेवाडी, नाण्याचा माळ येथील प्राथमिक शाळा भरल्या नाहीत. शाळेत विद्यार्थी आले पण शिक्षक नसल्याने डब्बे खाऊन विद्यार्थी निघून गेले.

शाळेत येताना रस्त्यात काही अडचणी आल्यास शिक्षकांनी आमच्याशी संपर्क करावा, कितीही पाऊस असला तरी आम्ही त्यांना वाडीपर्यंत नेवून शाळा सुरु ठेवू, अशी सूचना आसलचे माजी सरपंच वामन सांबरी यांनी केली आहे.

-आसलवाडी भागातील शाळांमध्ये शिक्षक येत नसल्याची तक्रार तेथील ग्रामस्थांनी केली आहे. त्या शाळेतील शिक्षकाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि ग्रामस्थांच्या तक्रारींवर योग्य निर्णय घेतला जाईल.

बी. एस. हिरवे

प्रभारी गटशिक्षण अधिकारी कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply