Breaking News

भाज्या गटारात धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल ; महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष

महाड : प्रतिनिधी

पावसाळा सुरू झाला आणि बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली. या हिरव्यागार पालेभाज्याकडे ग्राहकदेखील आकर्षित होत आहेत. मात्र गुरुवारी (दि. 4) सकाळी महाडमधील एका रस्त्याकडेला असलेल्या गटारात या भाज्या धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शहरात एकच खळबळ उडाली.

महाडमध्ये ऐन पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात दाखल होतात. पुणे, वाई, भोर या ठिकाणाहून या पालेभाज्या येतात. महाड तालुक्यातील आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणात रानभाज्या शहरात विक्रीसाठी आणतात. गुरुवारी सकाळी यापैकी एका विक्रेत्याने या भाज्या गटारतच धुण्यास सुरुवात केली. बाजूच्या इमारतीमधून कोणीतरी या प्रकारचे चित्रण मोबाईलमध्ये करून व्हायरल केले आणि शहरात एकच खळबळ उडाली. हा व्हिडीओ महाड शहरातील भगवानदास बेकरी परिसरातील आहे.

 मंडई जीर्ण झाल्याने महाड नगर पालिकेने ती मोडून टाकली आहे. त्यामुळे शहरात जागोजागी भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. बहुतांश भाजी विक्रेते गटाराचा आधार घेऊनच भाजी विक्री करतात. उर्वरित भाजी, खराब झालेली भाजी गटारात टाकून देतात. याकडे महाड नगर पालिकेच्या स्वछता विभागाचे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणारे भाजी विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र या व्हिडीओने नगर पालिकेची पोलखोल केली आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

-संबंधित व्हीडिओ चित्रण पाहिले आहे. याबाबत स्वछता विभागाकडून योग्य ती कारवाई केली जाईल.

-जीवन पाटील,

मुख्याधिकारी, महाड

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply