पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेज कॅन्टिनमधून जंकफूड हद्दपार होणार आहे. त्याच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर व वैयक्तिक जीवनावर परिणाम होत असल्याने अन्न सुरक्षा आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांनी प्रभावी कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. जंकफूडमध्ये साखर, मीठ व मैद्याचा समावेश जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे ते चविष्ट लागतात. त्यामध्ये विटॅमिन्स, खनिजे यांची कमतरता असते. त्याच्या अतिसेवनाने विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह आणि हृदयरोग यांसारखे आजार वाढत असल्याने त्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर व वैयक्तिक जीवनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने जंकफूडची शाळा कॉलेज कॅन्टिनमधून विक्री करण्यास 8 मे 2017च्या आदेशाने बंदी घातलेली आहे. सदर बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय अन्न सुरक्षा आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांनी घेतला आहे.
त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या रायगड विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा व कॉलेज कॅन्टिनची तपासणी करण्याचे ठरवले आहे. अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत ही तपासणी करण्यात येणार आहे. त्याबाबत प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना पत्र पाठवण्यात आली आहेत. त्यामध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक व पालकांना आवाहन करण्यात आले आहे की जंकफूडचे दुष्परिणाम लक्षात घेता व भावी पिढीचा विचार करता कॅन्टिनमध्ये जंकफूडची विक्री होणार नाही. पालकांनी मुलांना घरच्या डब्यातही जंकफूड दिले जाणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे, असे पेण येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दी. तु. संगत यांनी सांगितले आहे.