Breaking News

अर्जेेंटिनाची अंतिम फेरीत धडक

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा

ब्राझिलिया ः वृत्तसंस्था
कोपा अमेरिका स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात रंगली. पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने कोलंबियावर 3-2 अशी मात करीत अंतिम फेरीत धडक दिली आहे. अंतिम फेरीत अर्जेंटिना आता ब्राझीलशी टक्कर घेणार आहे. मेस्सी विरुद्ध नेमार अशी ही लढत होणार असून या सामन्याची उत्कंठा वाढली आहे.
पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाने गोल करीत आघाडी घेतली. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीच्या असिस्टवर लोटारो मार्टिनेझने सातव्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. मेस्सीचा हा 150वा सामना होता. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांपर्यंत कोलंबियाने अर्जेंटिनाचे आक्रमण रोखले. मेस्सीचा सहकारी गिवानी लो सेल्सोला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत कोलंबियाच्या जुवान कॉड्राडोला पिवळे कार्ड मिळाले.
सामन्याच्या दुसर्‍या सत्रात कोलंबियाने अर्जेंटिनावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याचेच फलित म्हणून 61व्या मिनिटाला कोलंबियाने लुईस डायझने गोल नोंदवत अर्जेंटिनाशी बरोबरी साधली. 63व्या मिनिटाला कोलंबियाच्या मिगुएल बोर्जाला पिवळे कार्ड मिळाले. चढाओढीच्या प्रयत्नात दुसर्‍या सत्रात दोन्ही संघांना सावधानतेने खेळण्याचा इशारा देण्यात आला. 72व्या मिनिटाला मोनिटेल आणि 87व्या मिनिटाला रॉड्रिगेझ या अर्जेंटिनाच्या खेळाडूंना पिवळे कार्ड मिळाले, तर 75व्या मिनिटाला मुनोझ आणि 86व्या मिनिटाला एडविन कार्डोना या कोलंबियाच्या खेळाडूंना रेफरीने पिवळे कार्ड दाखवले. 88व्या मिनिटाला कोलंबियाला अजून एक पिवळे कार्ड मिळाले.
90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना आघाडी घेता न आल्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत पोहचला. पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाकडून लोटारो मार्टिनेझ, लिएंड्रो पारेडेस आणि लिओनेल मेस्सी यांनी गोल केले, तर कोलंबियाकडून मिगुएल बोर्जा आणि जुआन कॉड्राडो यांनाच गोल करता आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply