Breaking News

राजीनाम्यानंतर पुढे काय?

गांधी घराण्याशी असलेली आपली निष्ठा दर्शवण्याची ही संधी सच्चे काँग्रेस नेते चुकवणार नाहीत. तर हे सारे नाट्य एकीकडे पार पडल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊन कदाचित काँग्रेस अध्यक्ष पदी नव्या व्यक्तीची निवड होईलही. पण हा नवा अध्यक्ष काहीही झाले तरी नामधारीच असणार, हे उघड गुपित आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ते राजीनामा देणार की पक्षाध्यक्ष पदी राहणार यासंदर्भातील तर्कवितर्कांना एकापरीने त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी हा राजीनामा दिला आहे. असा राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी पहिल्यांदा व्यक्त केल्यापासूनच तो चेष्टेचा विषयच अधिक झाला होता. यासंदर्भात जी काही चर्चा होते आहे, त्या अवघ्या चर्चेस काँग्रेस पक्षातील विशिष्ट संस्कृती हीच पूर्णत: जबाबदार आहे. त्यामुळेच राहुल गांधी राजीनामा देतील, पक्षाची कार्यकारिणी हा राजीनामा नाकारील, मग राहुल गांधी आपला राजीनामा मागे घेतील आणि पुन्हा एकदा स्वत:चीच नियुक्ती पक्षाध्यक्ष पदी करतील, अशी अटकळ सर्वसाधारणपणे व्यक्त होत होती. आणि त्याला अनुसरूनच त्यांच्या राजीनाम्याच्या इच्छेची टिंगलटवाळीच अधिक झाली. आता ते राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत. परंतु त्यामुळेही खरेच परिस्थितीत फार फरक पडणार आहे का? पक्षाने तातडीने नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु करावी असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अर्थात तरीही त्या पक्षाच्या काही नेत्यांना राहुल गांधींना पुन्हा पुन्हा राजीनामा मागे घेण्यासाठी गळ घालावेसे वाटणार आणि तशी गळ घालण्याचे प्रयत्न उघडपणे वा पडद्याआडून निश्चितच होणार. म्हणजे हा नवा अध्यक्ष काँग्रेसजनांनी स्वत:हून निवडावा, असे राहुल गांधींनी कितीही म्हटले असले तरी! आता हा नामधारी नेमणुकीने यायचा की पक्षातील कथित लोकशाही संस्कृतीचे दर्शन घडवित निवडणूक घेऊन, हे सारेही तसेच काँग्रेसी पद्धतीने ठरेल. पण अर्थातच तो गांधी घराण्याच्या मर्जीतला असेल. गांधी घराण्याच्या शब्दाबाहेर न जाणारा असेल. या वर्णनात चपखल बसणारा आणि तरीही काँग्रेस पक्षाची फुटलेली बोट तरंगती ठेवू शकणारा कोण आहे बरे, या निकषावर संबंधिताची निवड होईल असे म्हटले तर वावगे ठरू नये. तर असे हे नामधारी पक्षाध्यक्ष पद म्हणजे काटेरी मुकूटच आहे. तारेवरची कसरत करीत, नव्या पक्षाध्यक्षाला गांधी घराण्याची मर्जी सांभाळणे आणि काँग्रेसचे बुडते गलबत हाकत राहणे या दोन्ही जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतील. पण तरीही काँग्रेस नेत्यांमध्ये त्यावरूनही शहकाटशहाचे पट रंगल्याशिवाय राहायचे नाहीत. पक्षाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडायला हवा आहे, असे मतही राहुल गांधी यांनी जाता-जाता व्यक्त केले आहे. परंतु पक्षातील म्हातारी खोडे असे काही बदल खरेच होऊ देतील का? मुळात अनेकांचे या वयातही डोळे बाहेरच्या वाटेकडे लागलेले असतील. अगदीच कुठे काही दार उघडत नाही म्हटल्यावर तिथेच राहिलेले तिथल्या तिथेच आपले वैयक्तिक उखळ कसे पांढरे करून घेता येईल याच्या प्रयत्नात निश्चितच असणार. तर या सार्‍यातून होणार्‍या साठमारीतून काँग्रेस पक्षास नवा अध्यक्ष लवकरच लाभावा!

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply