ऑस्ट्रेलिया संघाला कसोटीत तब्बल 72 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ‘किवीं’ना पराभूत करून टीम इंडियाने ‘10 इयर चॅलेंज’ही यशस्वीपणे पूर्ण केले. आता ‘विराटसेना’ पुन्हा एकदा ‘कांगारूं’शी मायदेशात भिडणार आहे. सध्याचा भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, प्रत्येक खेळाडूला पर्याय उपलब्ध आहे. असे असूनही संघ कधी कधी मोक्याच्या वेळी ढेपाळतो आणि सातत्य राखण्यात अपयशी ठरतो. खेळ म्हटला की हार-जीत आलीच, असे म्हटले तरी आगामी वन डे विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता समतोल संघबांधणीचे आव्हान असणार आहे.
सद्यस्थितीत जागतिक क्रिकेटमध्ये ज्या काही मोजक्या देशांचा बोलबाला आहे त्यात भारतीय संघाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करीत आहे. कुठल्याही संघाशी दोन हात करण्याची क्षमता या संघात आहे. इतकी वर्षे जे जमले नाही ते पराक्रम, विक्रम आताचा संघ करीत आहे. याचा अर्थ आधीच्या संघ व कर्णधारांनी काहीच केले असे नाही. कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1983मध्ये तत्कालीन बलाढ्य संघ वेस्ट इंडिजला नमवून विश्वचषकावर पहिल्यांदा नाव कोरले होते. दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या विंडीजला हरविणे म्हणजे तेव्हा अशक्यप्राय मानले जायचे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून साखळीत हरल्यानंतर त्यांनाच अंतिम सामन्यात अस्मान दाखविण्याचा भीमपराक्रम लढवय्या ‘कपिलसेने’ने करून दाखविला, परंतु त्यानंतर साधारणपणे 90च्या दशकापासून भारतीय क्रिकेटची सारी मदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर असायची. सचिन खेळला तर संघ सामना जिंकण्याची आशा आणि तो लवकर बाद झाला, तर सामना संपल्यात जमा असे चित्र होते. कालांतराने सचिनसोबत सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, अनिल कुंबळे असे चेहरे झळकू लागले. मग हळूहळू भारतीय क्रिकेटचे नवे प्रतिबिंब जागतिक पटलावर उमटू लागले. जबरदस्त प्रतिभेच्या जोरावर गांगुली कर्णधार झाला. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना त्यांच्याच भाषेत उत्तर देत संघाला विजयाची चव चाखवली. पुढे महेंद्रसिंह धोनीने ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक असे मैलाचे दगड रचले. शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रतिष्ठेच्या तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद पटकाविण्याची किमया साधली. आता विराट कोहली व सहकारी एकापाठोपाठ एक मालिका जिंकवून देत आहे. ‘भारतीय शेर परदेशात ढेर’ ही प्रतिमा या शिलेदारांनी पुसून काढत क्रिकेटविश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे.
विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने नुकतीच ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिका विजयाची पताका रोवली; तर ट्वेन्टी-20 मालिका बरोबरीत सुटली. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरविण्याची कामगिरी टीम इंडियाने 1947नंतर प्रथमच केली. ऑसी संघात कर्णधार स्टिव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची कमी प्रकर्षाने जाणवली. चेंडू छेडछाडप्रकरणी असलेल्या बंदीमुळे त्यांना या मालिकेत खेळता आले नाही. म्हणून काही भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी दुर्लक्षित करता येणार नाही. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रिषभ पंत यांनी फलंदाजीत; तर गोलंदाजीत कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, युजवेंद्र चहल यांनी आपली छाप सोडली. मुरली विजय, लोकेश राहुल या सलामीवीरांनी मात्र पुरती निराशा केली. शिखर धवनही चांगल्या सुरुवातीनंतर मध्येच का अडखळतो, हे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत न्यूझीलंड दौरा आव्हानात्मक होता. यापूर्वी 2009मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा वन डे मालिका जिंकली होती; तर 2013-14मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा सपाटून मार खाल्ला होता. केन विल्यमसनचे दमदार नेतृत्व आणि अनुभवी व ताज्या दमाचे मिश्रण असलेले ‘किवी’ भारताला चुरशीची लढत देतील अशी अपेक्षा होती, मात्र पाच वन डे सामन्यांच्या मालिकेवर भारताने 4-1ने कब्जा करून मागील पराभवाची सव्याज परतफेड केली. याचबरोबर 10 वर्षांनी पुन्हा एकदा मालिका जिंकण्याचा करिष्मा केला. चौथ्या सामन्यातील लाजिरवाणा पराभव सोडल्यास या मालिकेवर टीम इंडियाने वर्चस्व राखले. त्यानंतर ट्वेन्टी-20 मालिकेत यजमानांनी कमबॅक केले. दुसर्या सामन्यात भारताने बाजी मारून टी-20तील पराभव संपुष्टात आणला. या मालिकेतील अंतिम सामना रंगतदार झाला. उभय संघातील खेळाडूंनी त्यात चांगला खेळ केला. सरतेशेवटी यजमानांनी बाजी मारून शेवट शब्दशः ‘गोड’ केला.
ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारताच्या दौर्यावर आला आहे. उभय संघांतील मालिकेला ट्वेन्टी-20 सामन्याने रविवार (दि. 24)पासून सुरुवात होत आहे. या मालिकेत दोन टी-20 आणि पाच वन डे अशा लढती आहेत. वर म्हटल्याप्रमाणे भारतीय संघाचे पारडे जड दिसते. त्यामुळे मायदेशी भारताकडूनच पराभव पत्करलेला पाहुणा संघ आता काय रणनीतीने खेळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारताच्या दृष्टीने ही मालिका इंग्लंडमध्ये आगामी काळात होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडीची अंतिम चाचपणी असेल. ते लक्षात घेऊन टी-20 आणि वन डेत वेगवेगळ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारे ‘रोटेशन’ने खेळाडूंना संघात स्थान देण्याची पद्धत टीम इंडियात वर्षभरापूर्वीपासूनच अवलंबिली जात आहे. यामुळे प्रत्येकाला संधी मिळते, शिवाय एखाद्या खेळाडूचे बलस्थान, तसेच कच्चे दुवे ध्यानात येतात. त्यातून प्रमुख स्पर्धांसाठी संघ निवड करणे सुकर होत असले, तरी काही वेळा अतिप्रयोग महागातही पडू शकतात. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कपसाठीचा संघ निश्चित करण्यासाठी निवड समितीचा कस लागेल.
विश्वचषक स्पर्धेपूर्वी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा बारावा हंगाम रंगणार आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, भारतातील लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर पुढील सामन्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा महासंग्रामामुळे याआधी 2009मध्ये संपूर्ण लीग दक्षिण आफ्रिकेत झाली होती; तर 2014 साली आयपीएलचा पहिला टप्पा यूएईमध्ये खेळविण्यात आला होता. यंदा ही स्पर्धा भारतातच होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)ने जाहीर केले आहे, पण देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक पाहता आयपीएलच्या स्वरूपात बदल होऊ शकतात. असो, एकीकडे राजकीय द्वंद रंगणार असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष मैदानावर क्रिकेटमधील रथी-महारथी भिडतील. ते पाहणे रंजक असेल.
‘पुलवामा’चे पडसाद
जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे सुमारे 40 जवान शहीद झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातही पडसाद उमटले. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी या हल्ल्याचा निषेध केला. त्यानंतर येत्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही, याबाबत मतमतांतरे दिसून येत आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकसोबत क्रिकेट नकोच, अशी भूमिका काही क्रिकेटपटूंनी मांडली आहे; तर काहींनी मात्र पाकला हरवून बदला घ्या. सामन्यावर बहिष्कार नको, असे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात बीसीसीआयने सरकारकडे ‘चेंडू’ टोलवला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी संघावर बंदी घालावी, अशी मागणी आयसीसीकडे केली आहे. त्यामुळे अंतिमत: काय निर्णय होतो, याकडे कोट्यवधी क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
-समाधान पाटील (9004175065)