नासा’च्या मंगळ मोहीम संशोधनासाठी निवड
पनवेल : बातमीदार
सायंटिस्ट अस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट प्रणित पाटील या अलिबागच्या सुपुत्राची अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहिमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मूळचे अलिबागचे असलेले पाटील कुटुंब सध्या पनवेलमध्ये वास्तव्यास आहे.
प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली जिद्द, खडतर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सध्या नासा या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रकल्पावर काम करीत आहे. अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर हे प्रणितचे गाव आहे. त्याचा जन्म 27 जून 1989 रोजी आईच्या गावी अलिबाग तालुक्यातीलच मेढेखार येथे झाला. प्रणितचे वडील गजानन पाटील पोलीस खात्यात होते. वडिलांच्या बदलीमुळे सतत भटकंती सुरू होती. 1991मध्ये जुने पनवेलमध्ये आल्यावर प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये झाले. 2009मध्ये आयटी एमजीएम कॉलेज, कामोठे येथे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच अंतराळ व त्या संबंधातील विषयाची त्याला आवड होती. 2010मध्ये घाटकोपर येथील अॅक्सेंचर कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सात ते नऊ महिने त्याने काम केले. त्यानंतर 2010-11मध्ये अमेरिकन अलायन्झ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून तो रुजू झाला. ही कंपनी नासा एन्सापयर सिस्टीममध्ये सिलीका सप्लाय करते. कंपनी नासाची एक वेंडर होती. प्रणित त्याच्यासाठी प्रपोजल मॅनेजमेंट करू लागला.
याच प्रशिक्षणाचा भाग म्हणून गोठण बिंदूखालील (-20) तापमानात 1/3 गुरुत्व बलावर मंगळसदृश सतत लाल वादळी वातावरणात फक्त पावडर खाऊन राहायचे व अंगाला जेली लावून अंग पुसायचे. जगाचा संपर्क बंद. मंगळाच्या वातावरणात
स्वतःचा जीव जगवायचा व नवीन बीजारोपण करण्यासाठी तेथील संयुगे एकत्र करून प्रयोग करायचे. हे आव्हान यशस्वी पेलून हिंदुस्थानचा तिरंगा अभिमानाने नासात फडकवायचा मान प्रणितला मिळाला आहे.
अमेरिकन अलायन्झसोबत काम करीत असताना अंतराळाबद्दल असलेली आवड प्रणितला चांगल्या प्रकारे जोपासता आली. त्यांच्याकडून इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती मिळू लागली. नासा एडिअस जनरल रिडिंगची आवड, रिसर्च पेपर वाचन केले. नासाचे पॉवर पॉइंट अभ्यासले. मग अंतराळाबद्दल शास्त्रीय माहिती घेण्यासाठी ऑक्टोबर 2014मध्ये एज्युकेशन व्हिसा घेऊन अमेरिकेतील अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या एम्री रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रणितने प्रवेश मिळवला. आपले काम सांभाळून तो शिक्षणही घेऊ लागला. सन 2016च्या सप्टेंबरमध्ये थ्री कन्टिन्युइंग एज्युकेशन युनिट (सीइयुस) इन सबऑर्बिटल मिशन सिम्युलेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण केली. यासाठी त्याला साडेपाच हजार अमेरिकन डॉलर खर्च आला. हा खर्च त्याने स्वतः केला. त्यानंतर नासाच्या फ्लाइट अपॉर्च्युनिटीज प्रोग्रॅमच्या प्रोजेक्ट पोसममध्ये त्याची निवड थोडक्यात हुकली. तिसर्या वेळी म्हणजे 2016मध्ये 1602 बॅचमध्ये सायंटिस्ट अॅस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट या पदासाठी त्याची निवड झाली.
जगविख्यात पायलट पॅटी वागस्टाफ यांच्याकडून प्रणितने अॅरोबॅटिक्स प्रशिक्षण घेतले आहे, तसेच साऊदर्न अॅरोमेडिकल इन्स्टिट्यूटमधून डॉ. पॉल बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली अॅडव्हान्स चेंबर प्रोग्रामदेखील पूर्ण केला. तसेच स्विस स्पेस सेंटर आणि ‘ईपीएफएल’मधून स्पेस मिशन डिझाईन आणि ऑपरेशन कोर्स पूर्ण केला आहे. सोबतच तो नासा स्पेस सेंटरचे फिजिकल सायन्स इन्फॉरमॅटिक सिस्टीममध्ये अॅनालिटिकल युजर म्हणूनही कार्यरत आहे.
पनवेल येथील त्याच्या घरी निवृत्त पोलीस असलेले त्याचे वडील गजानन पाटील, आई शोभना पाटील, भाऊ प्रतीक पाटील (एलएलबी करतो) राहतात. त्याची पत्नी रसायनशास्त्रातून पदव्युत्तर पदवीधर (एमएस्सी) आहे. आपली पत्नी अमृता व दोन वर्षांच्या श्रीणा या मुलीसोबत तो अमेरिकेत राहतो. प्रणितचा आदर्श त्याचे वडील आहेत, तर मेंटॉर डॉ. राजेंद्र पाटील आहेत.