Breaking News

महाराष्ट्रात महावसुली सरकार

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. यावरून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण? असा सवाल करत, राज्यात महाविकास आघाडी नव्हे, तर महावसुली सरकार चालवले जात आहे, अशी टीका प्रसाद यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रसाद म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिले, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. जर एका मंत्र्याचे टार्गेट 100 कोटी रुपये आहे, तर इतर मंत्र्यांचे किती असेल?, असा सवाल करत प्रसाद म्हणाले, शरद पवारांनी अनिल देशमुखांचा बचाव केला आहे. जो खोटा ठरला. जर पवारांना त्यांची विश्वसनियता सिद्ध करायची इच्छा असेल तर, त्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा.

मुख्यमंत्री ठाकरे यावर कारवाई करतील, अशी आशा होती, मात्र असे होताना दिसत नाही. दोषींवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांची बदली केली. ही कथित वसुली सरकारसाठी होती, की आघाडीतील पक्षांसाठी (शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस) होती? असा सवाल या वेळी प्रसाद यांनी महाविकास आघाडी सरकारला केला.

कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार -बापट

भाजप खासदार गिरीश बापट यांनीही गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल. येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हे गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणीही बापट यांनी केली आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply